पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा

अंशुमन पाटील यांचा जोमात आलेला हरभरा
अंशुमन पाटील यांचा जोमात आलेला हरभरा

नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा) येथील अंशुमनभाई गोपाल पाटील केळी, पपई या पिकांबरोबरच हरभरा शेतीतही तज्ज्ञ शेतकरी म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून या शेतीत सातत्य ठेवलेले अंशुमन यांच्याकडे सुमारे १५ एकरांवर हरभरा असतो. पेरणीसंबंधीच्या अंतरात वाढ करण्याबरोबरच बियाणे व रासायनिक खतांचा अल्प वापर ते करतात. ठिबकचा वापर करून पाणीबचत साधताना एकरी १० ते १२ क्विंटलर्यंत उत्पादन घेतात. जमीन सुपीकता व बेवड म्हणून या पिकाचा मजबूत आधार त्यांना होतो.  नंदुरबार जिल्हा मुख्यत्वे केळी, पपई, मिरची आदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. हंगामनिहाय विविध पिकेही जिल्ह्यात होतात. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील अंशुमन पाटील यांची ६० एकर काळी कसदार शेती आहे. वडील गोपाल हे पेशाने डॉक्‍टर. सुरतमध्ये (गुजरात) त्यांनी रुग्णसेवा केली. सन १९९३ च्या दरम्यान ते ब्राह्मणपुरीला आले. अंशुमन यांचे लहान बंधू अमोल अभियंता असून, बेंगळुरूमध्ये एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. अंशुमन हेच आपल्या कुटुंबाच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. त्यांच्याकडे कायमस्वरूपी पाच सालगडी आहेत. सिंचनासाठी आठ कूपनलिका आहेत.  हरभऱ्याची शेती  केळी, पपई ही अंशुमन यांची नियमित पिके आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील त्यांचे हुकमी पीक म्हणजे हरभरा. अनेक वर्षांपासून या पिकात त्यांचा अनुभव तयार झाला आहे. दर वर्षी सरारी १५ एकर या पिकाचे क्षेत्र असते. केळीची काढणी झाल्यानंतर हरभऱ्याचे नियोजन केले जाते.  पूर्वीची शेती  सन १९९८ ते २०११ पर्यंत पारंपरिक पद्धतीने ते हरभरा पेरायचे. जमीन भुसभुशीत केल्यावर दिवाळीनंतर बैलजोडीचलीत अवजाराने पेरणी केल्यावर पाट पद्धतीने सिंचन व्हायचे. अळी, मर रोगाच्या नियंत्रणासाठी सुमारे चार वेळेस फवारण्या व्हायच्या. पाट पद्धतीने सिंचनात सखल भागात पाणी तुंबायचे व पीक पिवळे पडायचे. किमान तीन वेळेस सिंचन करावे लागायचे. त्यासाठी मजूर लागायचे. शिवाय एकरी ४० ते ५० किलो बियाणे पेरणीसाठी वापरले जायचे.  सुधारित शेती  १) सन २०११ पासून सुधारित तंत्राचा वापर सुरू केला. ठिबक सिंचनाचा वापर हरभरा पिकात केला. या भागात असा वापर करणारे अंशुमन हे पहिलेच शेतकरी असावेत. ट्रॅक्‍टरचलीत अवजाराच्या वापराने पेरणी सुरू केली. दोन सऱ्यांमधील अंतर पाच फूट, तर प्रतिसरीत दोन ओळीत हरभरा घेण्यास सुरुवात केली. दोन ओळींमधील अंतर सुमारे २० इंच असायचे. यात २०१४ मध्ये आणखी सुधारणा करून दोन सऱ्यांमधील अंतर सात फूट केले.  २) यंदा जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी १० एकरांत धैंचा घेतला. त्यानंतर रिकाम्या झालेल्या क्षेत्रात व केळीची काढणी पूर्ण झालेल्या पाच एकरांत अशा एकूण १५ एकरांत हरभरा पेरणी केली. पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचलीत अवजार गावातूनच भाडेतत्त्वावर घेतले. त्यासाठी प्रतिदिन ३०० रुपये खर्च केला. एका दिवसात मिनी ट्रॅक्‍टरद्वारे १० एकरांत पेरणी झाली.  ३)अंशुमन सांगतात, की पूर्वी एकरी ४० ते ५० किलो बियाणे लागायचे. आता ते केवळ २२ किलो लागते. घाटे पक्व झाल्यानंतर सिंचनावर मर्यादा आणल्या. रासायनिक खतांवर एकरी केवळ ५०० रुपयांपर्यंत खर्च केला. अलीकडील काळात कमाल तीन फवारण्याच केल्या जातात. उत्पादन खर्च आटोक्यात ठेवण्यात येतो.  उत्पादन  पूर्वी एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळायचे. अलीकडील वर्षांत हेच उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. यंदा थंडीचा परिणाम अधिक जाणवल्याने उत्पादनात थोडी घट येण्याची शक्यता अंशुमन यांनी बोलून दाखवली.  कोल्ड स्टोरेजला ठेवला हरभरा  मागील हंगामात काढणी हंगामात क्विंटलला सुमारे सव्वातीन हजार रुपये दर सुरू होता. त्यामुळे परिसरातील कोल्ड स्टोरेजमध्ये १५ रुपये प्रति ५० किलो पोते या दराने हरभरा ठेवला. सुमारे चार महिन्यांच्या कालावधीनंतर तो पाच हजार रुपये दराने विकण्यात आला. कोल्ड स्टोरेजमुळे दर चांगले मिळण्यास मदत झाल्याचे अंशुमन म्हणाले. शहादा हे हरभऱ्यासाठी चांगले मार्केट असून, तेथेच विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या हंगामात पाच हजार रुपयांपर्यंत दरांची त्यांना अपेक्षा आहे.  हरभरा नियोजनातील काही बाबी 

  • हरभऱ्यानंतर ही जमीन पपई व कापूस पिकांसाठी उपयोगात आणली जाते. त्याचा बेवड पुढील पिकांसाठी उपयुक्त ठरते, असे अंशुमन सांगतात. 
  • शिवाय जमिनीचा पोत राखण्याच्या दृष्टीनेही हे पीक महत्त्वाचे राहते. 
  • पिकाचे अवशेष जमिनीतच गाडण्यात येतात. मळणीनंतर बियाण्यासाठी दोन ते सव्वादोन क्विंटल हरभरा घरी साठविण्यात येतो. त्यामुळे बाजारातून बियाणे आणण्याची गरज भासत नाही. 
  • साठविण्यासाठी प्लॅस्टिक बॅगचा वापर होता. त्या तागाच्या पोत्यात भरून घरातच ठेवल्या जातात. साठवणुकीतील किडींच्या नियंत्रणासाठी उपाय केले जातात. 
  • सात फूट अंतर व ठिबकवरील हरभरा पेरणीच्या प्रयोगाचे अनुकरण यापूर्वी मित्र प्रदीप पाटील यांनीही आपल्या दोन एकरांत केले होते. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रयोगाची प्रेरणा मिळाली आहे. 
  • शिवाय नजीकच्या सुलवाडा, खेडदिगर, औरंगपूरमधील शेतकऱ्यांनी हरभरा प्लॉटला भेट दिली आहे. 
  • केळी, कापूस पिकातही अंशुमन यांनी लागवड अंतर वाढविण्याचे प्रयोग केले. 
  • देशी कापूस लागवडीवर त्यांचा भर असतो. त्याचे एकरी १२ क्विंटल, तर केळीची २२ ते २४ किलोपर्यंतची रास ते घेतात. 
  • यांत्रिक शेतीवर भर दिला असून, बैलजोडीशिवाय ते शेतीचा गाडा हाकतात. 
  • एक गाय व दोन म्हशींचे संगोपन होते. गोठ्यात स्लरी टॅंक आहे. त्यात गोमूत्र, शेण व गुळाचे मिश्रण आंबवून त्याचा वापर केळी, पपई आदी पिकांसाठी उपलब्धतेनुसार होतो. शिवार पाणीदार करण्यासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. 
  • संपर्क- अंशुमन पाटील-९७६३६१२४९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com