रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधार

प्रभुदेसाई यांची रोपवाटिका व विविध रोपे
प्रभुदेसाई यांची रोपवाटिका व विविध रोपे

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने वाहनचालक, गॅरेज, छापखान्यात कंपोझिटर अशी विविध कामे हरचेरी (जि. रत्नागिरी) येथील विनोद विद्याधर प्रभुदेसाई यांनी केली. मात्र पुढे जाऊन कौशल्य व अभ्यास पणास लावून त्यांनी आपली शेती उत्तम प्रकारे सांभाळून रोपवाटिका व्यवसायात चांगली झेप घेतली. आज किमान पंधरा वर्षांच्या अनुभवातून त्यांनी साकारलेल्या रोपवाटिकेत सुमार ४४ पीकवाणांची मिळून वर्षाला एक लाखाच्या संख्येपर्यंत रोपे तयार होतात. राज्यासह परराज्यांपर्यंत त्यांनी आपल्या रोपांना बाजारपेठ मिळवून दिली आहे. हरचेरी (जि. ता. रत्नागिरी) येथील विनोद विद्याधर प्रभुदेसाई यांनी यशस्वी शेतकरी म्हणून नाव मिळवले आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वाहनचालक, गॅरेज, छापखान्यात कंपोझिटर अशी कामे त्यांनी केली. दरम्यान वडिलोपार्जित जमीनच त्यांना खुणावत होती. अशातच १९९० साली कृषी विभागाची रोहयो फळबाग लागवड योजना सुरू झाल्याचे समजले. परिपूर्ण माहिती घेतल्यानंतर १०० टक्के अनुदानातून फळझाडे लागवड करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे १९९० ते १९९२ च्या सुमारास काजू कलमांची टप्प्याटप्प्याने लागवड केली. हे सुरू असताना आंबा खोकापट्टी (पॅकिंग) उद्योग सुरू करून पूरक उत्पन्न मिळवले. रोपवाटिका घरची सुमारे नऊ एकर बाग होती. छोटे व्यवसाय करीत असताना घरच्या काजू व आंबा कलमांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे सुरू होते. त्यातून रोपवाटिका व्यवसायाला चालना मिळाली. तत्कालीन फलोत्पादन उपसंचालक श्री. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार मातृवृक्षांपासून कलम-काड्यांची विक्री पोमेंडी, भाट्ये व निवे येथील शासकीय रोपवाटिकेस विक्रीला सुरू झाली होती. १९९५ च्या दरम्यान कृषी विभागाकडून रोपवाटिकेचा अधिकृत परवाना घेतला. त्यानंतर विविध पिकांची रोपे, कलमे बांधण्यास सुरुवात केली. रोहयोअंतर्गत फळझाडे लागवडीसाठीदेखील विनोद यांच्याकडील रोपांचा उपयोग व्हायचा. रोपवाटिकेतील व्यवस्थापन कलमांची संख्या वाढू लागली. मग पाण्याची उणीव भासू लागल्यामुळे पारंपरिक पाटाच्या पाण्याचे रूपांतर ठिबक सिंचनात करून ग्रॅव्हिटेशन तंत्राचा वापर केला. आंबा, काजू यांचे दर्जेदार मातृवृक्ष तयार करण्यास सुरुवात केली. एकात्मिक कीड व्यवस्थापन, ८० टक्के सेंद्रिय व २० टक्के रासायनिक शेतीचा वापर सुरू केला. याच कालावधीत एका योजनेमध्ये अनुदानासाठी निवड झाली. दरम्यान पुणे येथे सूक्ष्म अन्नद्रव्यांसंबंधी कार्य करणाऱ्या संस्थेत प्रशिक्षण घेतले. त्याचा फायदा दर्जेदार रोपेनिर्मितीसाठी झाला. रोपांचे मार्केटिंग सुरू झाले. हळूहूळू विनोद रोपवाटिका व्यवसायात स्थिर होऊ झाले. रोपांची विविधता

  • आज विनोद यांच्याकडे विविध पिकांच्या वाणांच्या सुमारे ४४ प्रकारांची विविधता पाहण्यास मिळते.
  • हापूस, केशर व अन्य आंब्याच्या जाती आहेत. फणसात कापा, बिनचिकाचा असे प्रकार आहेत.
  • आवळा (बनारसी), कोकम (कोकण अमृता), बहाडोली जांभूळ आदींच्याही मातृवृक्षाची लागवड केली आहे. आज सुमारे दहा एकरांवर रोपवाटिका विकसित केली आहे. शेतीतही नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. फूलशेती, गांडूळखत, भाजीपाला लागवड, पडीक जमिनीवर सामाजिक वनीकरण, वनशेती लागवड यांमध्ये प्रावीण्य मिळविले. गोमूत्र, शेण, काजऱ्याच्या बिया व पाने यांच्यापासून तयार केलेल्या अर्काचा वापर कीड-रोग नियंत्रणासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर कर्धे येथील शेतकऱ्यांकडून तयार केलेल्या जीवामृताचा वापर होतो.
  • दौरे केल्याचा फायदा व्यवसाय वाढवण्यासाठी देशाटनाची गरज असते. त्याचा अनुभव विनोद यांना आला. आपल्या रोपांचे मार्केट विकसित करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक नर्सरींना भेट दिली. कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाऊन तेथील नर्सरी पाहिल्या. रोपनिर्मितीचे तंत्र व कोणत्या रोपांना मागणी आहे, याची माहिती त्यातून झाली. हळूहूळू ग्राहकांची संख्याही वाढू लागली. आज परराज्यांतील ग्राहकही विनोद यांनी मिळविले आहेत. रोपवाटिका व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • सुमारे दहा एकर क्षेत्र 
  • एकूण पीकवाणांचे सुमारे ४४ प्रकार
  • साधारण ५० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल
  • वार्षिक सुमारे चार ते पाच लाखांचे उत्पन्न
  • वर्षाला २५ कामगारांना रोजगार
  • कामगारांचा वार्षिक विमा
  • रोपांना बाजारपेठ- रत्नागिरी जिल्हा, पंढरपूर, सोलापूर, कर्नाटक, बंगळूर, तमिळनाडू, गुजरात
  • दुग्ध व्यवसाय व प्रक्रियेचा प्रयत्न लांजा कृषी विद्यालयात विनोद यांनी दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले होते. त्या आधारे दोन म्हशी घेऊन छोट्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. त्यातून नियमित अर्थार्जन मिळण्यास सुरुवात झाली. पंचायत समितीमार्फत राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत प्रकल्पही सुरू केला. त्यापासून इंधनाची बचत व शेतीला सेंद्रिय खत असा दुहेरी फायदा झाला. मात्र मजूरबळाची मोठी समस्या जाणवू लागली. त्यामुळे नाइलाजाने हा व्यवसाय थांबवणे भाग पडले आहे. विनोद यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत फळप्रक्रिया उद्योगाचेही प्रशिक्षण घेतले. त्याचा फायदा घेऊन छोट्या प्रमाणावर विविध फळांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला. कोकम सरबत, कोकम आगळ, कोकम साल, आंबा लोणचे, मिरची लोणचे, मँगो पल्प असे विविध पदार्थ तयार केले. रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठ देण्याचाही प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात रोपवाटिका व्यवसाय चालवताना प्रक्रियेकडे पुरेसे लक्ष देणे होईना. त्यामुळे तोही व्यवसाय सध्या थांबवला आहे. पुरस्कार

  • जिल्हा परिषदेचा ‘शेतीनिष्ठ शेतकरी’
  • राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार
  • कोकण कृषी विद्यापीठ प्रगतिशील शेतकरी समितीवर नियुक्ती
  • आत्मा रत्नागिरी तालुकाध्यक्ष
  • ‘अ‍ॅग्रिकल्चर ट्रेनिंग मॅनेजमेंट एजन्सी’ सदस्य
  • २००७-०८ मध्ये तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेत सहभाग
  • प्रतिक्रिया नकारात्मक न राहता शेतीत अविरत कार्यरत राहिले तर यश मिळते. ग्राहकांची मागणी ओळखून त्यानुसार विविध रोपांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. काही मसालेवर्गीय पिकांची तसेच नावीन्यपूर्ण फळांचीही रोपे उपलब्ध केली आहेत. शेतीत प्रयोगशीलता ठेवण्याचा प्रयत्न आहे. संपर्क- विनोद प्रभुदेसाई- ९८६०७५७६१८, ९९२३९५४४४५.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com