परदेशातील नोकरी सोडून किरण रमले अवशेषमुक्त शेतीत 

जमिनीची सुपिकता महत्वाची आपल्याकडे अन्न तुलनेने स्वस्त असले तरी त्यातील रसायनांचा वापर यासंबंधीचे मुद्दे वारंवार उपस्थित होतात. पॅकेजिंग, व्यवस्थितपणा यांचाही काहीवेळा अभाव आपल्याकडे दिसतो. शिवाय जमिनीचा खालावणारा पोत ही देखील समस्या आहे. सर्व विचार करतारसायन अवशेषमुक्त शेतीची कास धरली पाहिजे. यापुढे इस्त्रालयच्या धर्तीवरचे तंत्रज्ञान राबविणार असून त्याचा अभ्यास सुरू केल्याचे पाराशरे यांनी सांगितले.
परदेशातील नोकरी सोडून किरण रमले अवशेषमुक्त शेतीत 
परदेशातील नोकरी सोडून किरण रमले अवशेषमुक्त शेतीत 

शेतीशी तसा कुठलाही संबंध नाही. कोणत्या हंगामात काय पिकते अशी प्राथमिक माहितीही नाही. पण जमीन सुपीकता व रसायन अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हे उद्दीष्ट ठेऊन मुंबई येथील किरण यशवंत पाराशरे आज शेतीत रमले आहेत. व्यवसायाने अभियंता असलेल्या पाराशरे यांनी परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी त्यासाठी सोडली. तब्बल सात-आठ देशांमध्ये नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर आज मध्य प्रदेशातील शेती त्यांनी करारावर घेतली आहे. त्यात चांगले उत्पादनही घेण्यास सुरवात केली आहे. शेतीचा हा अनुभव अतिशय सुखावणारा, आत्मिक समाधान देणारा असल्याचे ते सांगतात.  मुंबई (दादर) येथे राहणारे किरण यशवंत पाराशरे यांचे अभियांत्रिकी पदविकेपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. आई-वडिलांसोबत ते भाडेतत्त्वावरील घरात राहायचे. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी राख्या तसेच गणपतीमूर्ती विक्री व्यवसाय करायचे. काचेच्या दुकानातही काम पत्करले. पुढे १९९७ मध्ये ते मुंबईत कुटुंबासोबत आले. येथे ‘व्हीआयटी’ महाविद्यालयात ‘मेकॅनिकल इंजिनिअरींग’ शाखेतून त्यांनी पदवी घेतली. वयाच्या २९ व्या वर्षी मुंबईमधील नामांकित ‘आयटी’ कंपनीत रूजू झाले. कंपनीत कामाची छाप उमटविली. कंपनीने परदेशातील प्रकल्पांचे काम त्यांच्यावर सोपविले. नोकरी करतानाही ‘आयटी’शी संबंधित महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत राहिले. नोकरीत बढती मिळत गेली.  अकरा वर्षांचा परदेशातील अनुभव  सिंगापूर, मलेशिया, हाॅँगकाॅँग, ब्रुसेल्स, ऑस्ट्रेलिया, जपान आदी अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. सुमारे ११ वर्षे नोकरीनिमित्त परदेशातील त्यांचा अनुभव राहिला. ‘सिस्‍टिम इंजिनीअर’पासून आर्थिक व्यवस्थापक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत एका अमेरिकी कंपनीचे उपाध्यक्षपद मिळवण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले. सन २०१६ मध्ये गुरू संत गुलाबबाबा यांच्या भंडारा कार्यक्रमानिमित्त सागर (मध्य प्रदेश) येथे येणे झाले. या वेळी संबंधित ‘ट्रस्ट’ची मोठे शेतीक्षेत्र पडीक असल्याची माहिती समोर आली.  पाराशरे यांना शेतीचा अनुभव नसला तरी मोठी आवड होती. ही इच्छा पूर्ण करण्याची नामी संधी चालून आली होती.  शेतीतील संधी शोधली  मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे ठरवत पाराशरे यांनी ट्रस्टची शेती फुलविण्याचा प्रस्ताव संबंधितांकडे ठेवला. ‘ट्रस्ट’ने सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले. तिथून पाराशरे यांचा शेतीचा प्रवास सुरू झाला. शेतीशी कुटुंबातील कुणाचाही यापूर्वी संपर्क, संबंध नव्हता. पण ‘आयटी’ क्षेत्रात कार्यरत असताना  ज्याप्रमाणे नियोजन, व्यवस्थापन त्यांनी यशस्वी केले. त्याचप्रमाणे शेतीचेही व्यवस्थापन करायला सुरवात केली. सुरवातीला नामांकित कृषी संस्था, कंपन्या यांतील तंत्रज्ञान, पुस्तके या माध्यमांतून विविध माहिती व ज्ञान घेण्यास सुरवात केली. इंटरनेटचीही मदत घेतली. जैविक, रसायन अवशेषमुक्त शेतीबाबत अभ्यास केला. त्यानुसार कार्यपद्धती ठरवून सागर येथील शेती सुरू झाली. खरिपात कडधान्ये, तृणधान्ये आणि रब्बीत गहू, हरभरा पिके घेण्यास सुरवात झाली. यात रासायनिक निविष्ठांचा वापर केला नाही.  शेतीत आशा फुलल्या  सागर येथे लाल व काळी कसदार माती आहे. चार विहिरी आणि मोठा तलाव तेथे आहे. चार सालगडींची मदत शेती व्यवस्थापनासाठी घेतली जाते. यंदा पावसाने साथ दिली. खरिपासह रब्बी हंगाम चांगला हाती आला. यंदाच्या खरिपात भात व तूर घेतली. संत गुलाबबाबा कार्यक्रमातील भंडाऱ्यासाठी कडधान्य, तांदूळ आदी जी सामग्री लागते तेवढी शेतीतून उपलब्ध करण्यापर्यंतची मजल पाराशरे यांनी गाठली आहे.  फळबाग लागवडही उत्साहवर्धक  ‘ट्रस्ट’ची बोईसर (ता. वाडा, जि. ठाणे) येथेही सुमारे ८० एकर शेती आहे. मात्र ती खडकाळ, मुरमाड आहे. या शेतात २०१७ मध्ये आंब्याची व चिकूची प्रत्येकी २०० झाडे लावली आहेत. केळीच्या वेलची वाणांचेही सुमारे ४०० कंद लावले आहेत. लागवडयोग्य जमीन करताना खडक फोडावा लागला. त्यावर मातीची भर घालावी लागली. चांगले कुजलेले शेणखत वापरून त्याचे मातीत मिश्रण करून मग लागवड केली. वर्षभरात झाडांची जोमदार वाढ झाली आहे. रसायन अवशेषमुक्त शेतीसाठी परिश्रम अधिक लागतात. परंतु भविष्यात विविध आजारांचे प्रमाण कमी करायचे असेल, पुढील पिढीला कसदार जमीन द्यायची असेल तर रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर थांबवावा लागेल असे पाराशरे सांगतात.  रसायनमुक्त शेतीचे महत्त्व समजले  किरण म्हणाले, की परदेशात मॉलमध्येच भाजीपाला मिळतो. रस्त्यावर त्या विक्रीस ठेवलेल्या पाहण्यास मिळत नाहीत. अनेक मॉल्स रसायन अवशेषमुक्त फळे, भाज्या विकतात. त्यांचा दर्जा अत्यंत चांगला असतो. पॅकेजिंगवरही त्यांचा भर असतो. तेथे धान्य, भाज्यांना चांगले दर मिळतात. आपल्याकडील अन्नापेक्षा तिथले अन्न महाग आहे. मी जे अन्न किंवा शेतमाल घ्यायचो त्यात रसायनांचा वापर झाला आहे का, किती याची माहिती मिळायची. आपल्याकडे अन्न तुलनेने स्वस्त असले तरी त्यातील रसायनांचा वापर यासंबंधीचे मुद्दे वारंवार उपस्थित होतात. पॅकेजिंग, व्यवस्थितपणा यांचाही काहीवेळा अभाव आपल्याकडे दिसतो. शिवाय जमिनीचा खालावणारा पोत ही देखील समस्या आहे. सर्व विचार करता रसायन अवशेषमुक्त शेतीची कास धरली पाहिजे. यापुढे इस्त्रालयच्या धर्तीवरचे तंत्रज्ञान राबविणार असून त्याचा अभ्यास सुरू केल्याचे पाराशरे यांनी सांगितले.  संपर्क- किरण पाराशरे-७६६६९६३२३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com