जुन्या जाणत्या चिंतामणरावांचा अभ्यास सर्वांना भारी

तिडके दांपत्य भाताचे उत्पादन दाखवताना
तिडके दांपत्य भाताचे उत्पादन दाखवताना

आधुनिक शेतीचे वारे वाहत असताना जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचा फारसा विचार होत नाही. मात्र, हा विचार मोडून काढणाऱ्या चिंतामणराव तिडके यांच्या भात शेतीतील नव्या बदलासह अनुभवाचा अभ्यास आज सर्वांवर भारी पडला आहे. भाताचे तब्बल १२८ क्विंटल उत्पादन घेऊन त्यांनी आपले नाव राष्ट्रीय पातळीवर कोरले आहे.

सातवीत असताना आधार असलेल्या आईचे निधन झाले. वर्षभरानेच लग्न करावे लागले. वाढलेल्या जबाबदारीने शाळेला रामराम ठोकून शेतीत उतरले. काही कालावधीतच वडिलांचे छत्र हरवले. अशातच काकांनी चिंतामण तिडके यांच्यावर पूर्ण वेळ शेतीची जबाबदारी टाकली. शेतीची अधिक माहिती नसल्याने शेतीतील खऱ्या अर्थाने कष्टमय प्रवास सुरू झाला होता. मात्र, मनाशी बाळगलेली जिद्द, कष्ट करण्याची वृत्ती आणि मिळालेले मार्गदर्शन यातून भात शेतीतील उत्पादनाचा उच्चांक गाठला. त्याची दखल घेत केंद्र शासनाने चिंतामणराव यांना यंदा कृषी कर्मण पुरस्कारासाठी निवड करून देशपातळीवरचे मानकरी ठरविले आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या वेल्हा तालुक्यात (जि. पुणे) साधारणपणे दीड हजार लोकसंख्येचे रूळे (तिडकेवाडी) गाव आहे. गावात अजूनही पारंपरिक पद्धतीचे घर, भात खाचरं आणि जुन्या जाणत्या विचारांची लोक आहेत. त्यामुळे गावाचं गावपण अजूनही फारसा बदलेल नाही. साधारणपणे ६५-७० वयाचे असलेले चिंतामण साधू तिडके आणि पत्नी सिताबाई या गावात राहतात. त्यांना महेंद्र आणि रमेश अशी दोन मुलं तर मनीषा ही मुलगी आहे. दोन्ही मुलं पुण्याजवळील नांदेड सिटीजवळ छोटेसे हॉटेल व्यवसाय करतात. तर श्री. तिडके हे आजही स्वतः शेतीचा सांभाळ करतात. त्याच्याजवळ सुमारे चार ते पाच एकर शेती असून त्यापैकी दोन एकर शेती लागवडीखाली आहे. डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. उन्हाळ्यात काही प्रमाणात पाणी टंचाई असते. दरवर्षी पावसाळ्यात ते भात पिकाची लागवड करतात. भात काढणी झाल्यानंतर रब्बी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, पावटा, ज्वारी अशी विविध पिके घेतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जात होती. मात्र, तीन ते चार वर्षापासून नवीन तंत्रज्ञानाची कास धरली. मनात जिद्द असल्याने भात लागवडीत बदल करण्यासाठी पुढाकार घेतला. रोपवाटिकेपासून ते विक्री व्यवस्थेपर्यत योग्य ते बदल करून अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. गावात कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत भैरवनाथ शेतकरी विकास गट तयार करण्यात आला होता. सुमारे २० शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक असल्याने त्यामध्ये चिंतामण तिडके हेसुद्धा सहभागी झाले. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांसह, आवश्यक असलेले नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत गेली. त्यालाही प्रतिसाद देऊन मागील पाच वर्षांपूर्वी शेतीत बदल करून भात लागवड केली. गादीवाफ्यावर रोपवाटिका  दरवर्षी दोन एकरावर भात लागवड करत असल्याने त्यानुसार मे महिन्यात रोपवाटिकेचे नियोजन करतात. भात रोपवाटिका तयार करण्यापूर्वी रोपांसाठी सिलिका उपलब्ध होण्यासाठी भाताचा तूस, अवशेष जाळून काळी राख गादीवाफ्यावर टाकली जाते. त्यानंतर चांगली नांगरट करून दोन गुंठे क्षेत्रावर गादीवाफे तयार केले जाते. फुले समृद्धी वाणाचे बियाणे रोपवाटिकेत बीजप्रक्रिया केली. याकरिता दहा लीटर पाण्यामध्ये ३०० ग्रॅम खडा मीठ टाकून त्या द्रावण तयार केले. त्यात भात बियाणे टाकल्यानंतर हलके बियाणे तरंगते. ते बाजूला काढून चांगले असलेले बियाणे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन सावलीत वाळवले जाते. त्यावर प्रतिकिलो दोन ग्रॅम थायरम, ॲझोटोबॅक्टर आणि पीएसबी हे जिवाणू संवर्धके २५० ग्रॅम प्रतिदहा किलो या बीजप्रक्रिया केली जाते. यात जिवाणू संवर्धके बियाणे चिकटण्यासाठी गुळाचे द्रावण १०० ग्रॅम वापरतात. सावलीत गोणपाटावर बियाणे सुकवून ते गादीवाफ्यावर एका रेषेत टाकले जाते. त्यानंतर झारीने पाणी देऊन चार ते पाच दिवसांनी या प्रमाणे तीन ते चार पाणी दिले. रोपे २१ दिवसाचे झाल्यानंतर रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. शेतीची चांगली मशागत  भात शेताची मशागत करण्यापूर्वी ते एकरी एक ते दोन ट्रेलर शेणखताचा वापर करतात. त्यानंतर बैलाच्या साहाय्याने शेताची आडवी व उभी मशागत करतात. गेल्या वर्षीपासून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळ आणि श्रम अशा दोन्ही गोष्टी वाचल्या आहेत. चालू वर्षीही यंत्राच्या साहाय्याने मशागत करून भाताचे उत्पादन घेतले आहे. भात लागवडीपूर्वी चिखलणी भात लागवडीपूर्वी दरवर्षी बैलाच्या साहाय्याने चिखलणी केली जाते. चिखलणीपूर्वी ते शेतात झिंक सल्फेटचा हेक्टरी दहा किलोचा वापर करतात. तसेच गिरीपुष्पाचा वापर केला जातो. यामुळे पिकांना पोषक घटक मिळतात. चार सूत्री पद्धतीचा अवलंब 

  •  भात अवशेषांचा पुनर्वापर
  • गिरीपुष्पाचा वापर
  • नियंत्रण लागवड
  • युरिया ब्रिकेटचा वापर
  • लागवड पद्धत  भात लागवड व काढणीच्या वेळेस सर्व कुटुंब शेतात असते. मागील पाच वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने रोपांची लागवड केली जात होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी चार सुत्री पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ते भात रोपांची २५ बाय १५ सेंटिमीटर अंतरावर लागवड करण्यास सुरुवात केली. लागवड करताना दोन रोपाची लागवड करतात. त्यामुळे हवा खेळती राहून हवेतील नत्र उपलब्ध होऊन फुटव्याची संख्या ४० ते ४५ च्या दरम्यान असते. तसेच एका ओबीमध्ये ३०० ते ३५० दाणे असतात. तर ओबीची लांबी ११ ते १२ इंच, दाण्याचा आकार मोठा असतो. खत व्यवस्थापन भात लागवडीनंतर त्याच दिवशी चार रोपांच्या मध्यभागी युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो. ते पिकाला सावकाश उपलब्ध होत जाते. भात रोपांची वाढ चांगली होऊन खताची बचत होते. खते वाहून जात नाहीत. अनावश्यक वापर टाळणे शक्य होते. पाणी व्यवस्थापन  भात रोपांच्या लागवडीच्या वेळी भाताला पाणी दिले जाते. त्यानंतर चार दिवसांनी रोपांचे पाणी बंद करून पुन्हा चार दिवसांनी पाणी दिले जात होते. निंबोळी अर्काची फवारणी  भात रोपांची लागवड करताना रोपे सशक्त स्वरूपाची असलेल्या रोपांची प्रामुख्याने लागवड केली जाते. त्यामुळे त्यावर कोणताही रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. तरीही रोग किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची लागवडीनंतर एक महिन्याने सलग १५ दिवसाच्या अंतराने फवारणी केली जाते. परिणामी कोणत्याही किडीचा प्रादुर्भावाला आळा बसतो. कृषी विभागामार्फत पीक कापणी  भात लागवडीनंतर साधारणपणे १३५ ते १४५ दिवसाने भात काढणी केली जाते. कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक अविनाश राठोड व अशोक राठोड यांनी मार्गदर्शन केले होते. पीक कापणी करताना उपविभागीय कृषी अधिकारी सी. एस. भोर तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी सतीश महाले, कृषी सहाय्यक अविनाश राठोड, अशोक राठोड, पी आर जोशी, बी. के. घोरपडे, पी एच जंगम, बी. एम. गर्जे आदी उपस्थित होते. त्यावेळी रॅण्डम पद्धतीचा वापर करून दहा बाय दहा मीटरचा प्लॉट टाकण्यात आला होता. त्याला चारही बाजूने काठी व दोरी बांधून तो प्लॉट निश्चित केला होता. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांनी कापणी केली होती. कापणी केलेल्या एका गुंठ्यातील भाताची झोडणी करून त्याचे वजन घेतले. यामध्ये एक हजार दाण्याचे वजन ४० ग्रॅम एवढे आले होते. तर एका गुंठ्यातील भाताचे वजन १२८.६०० किलो प्रति गुंठा एवढे भरले होते. मजुरांद्वारे काढणी  भात काढणी मजुरांच्या सहाय्याने केली जाते. काही वेळेस कुटुंबांतील व्यक्ती असल्याने फारसा मजुरांचा वापर केला जात नाही. भाताची काढणी करण्यासाठी सुमारे पाच ते सहा व्यक्ती आवश्यक असतात. काढणी केल्यानंतर त्याच्या पेंढ्या बांधल्या जातात. त्यानंतर पेंढ्याची झोडणी करून साळ काढली जाते. काढलेली साळ पोत्यात भरून मशीनद्वारे तांदळाचे उत्पादन घेतले जाते. उत्पादन फुले समृद्धी वाणाचे साधारणपणे हेक्टरी ४५-५० क्विंटल एवढे उत्पादनाची क्षमता आहे. मात्र, चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यास त्यापुढेही उत्पादन मिळते. श्री. तिडके यांना प्रति हेक्टरी १२८ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. जात निवडण्याची कारणे 

  • या जातीचे पानांची रूंदी इतर जातीपेक्षा जास्त असल्याने कर्ब ग्रहण करण्याची क्षमता जास्त आहे.
  • त्यामुळे रोप सशक्त व जोमदार वाढते. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते.
  • करपा रोगाला कमी बळी पडते.
  • उंची कमी असल्याने अति पावसामुळे खाली पडत नाही.
  •  मिळालेले बक्षिसे 

  • जिल्हा स्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक (कृषी विभाग)
  • तालुका स्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक (कृषी विभाग)
  • उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार (पंचायत समिती कृषी विभाग)
  •  संपर्क - चिंतामणराव तिडके - ९८८१८५२७६३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com