सरपंचांनो पाणीदार व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी : पोपटराव पवार

पोपटराव पवार
पोपटराव पवार

राज्य भीषण दुष्काळाच्या उंबरठयावर आहे. मात्र सरपंचांनी हीच संधी मानून गावाला उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही पाणीदारपणे कामे केल्यास दुष्काळ हीच संधी ठरेल. शासन, चांगल्या संस्था आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा शब्दात राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्पचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी उपस्थित सरपंच मंडळींना प्रोत्साहित केले.  आळंदीत भरलेल्या सकाळ अॅग्रोवनच्या सरपंच महापरिषदेची सुरवात पोपटराव पवार यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने झाली. ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार, अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण या वेळी व्यासपीठावर होते. “दुष्काळ हा केवळ काही गावांपुरता राहिलेला नसून राज्यव्यापी बनला आहे. अशा स्थितीत सरपंचांनी पुढाकार घ्यावा. टंचाई, दुष्काळ निवारणाच्या कामांचा शोध घ्यावा. रोहयोतून मजुरीची कामे मिळवावीत. ‘वॉटर कप’, ‘नाम फाउंडेशन’ तसेच मोठया कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडामधून दुष्काळाला मदत मिळू शकते. जलयुक्त शिवार, कृषी व जलसंधारण विभागाची कामे करता येतील. मात्र. त्यासाठी तुमचा अभ्यास हवा, असे श्री. पवार म्हणाले.  एकजूट करा  प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा आणि सरकारी धोरणांशिवाय गावे बदलणार नाहीत. पण, तुम्हालादेखील एकजूट करावी लागेल. शिवार फेरी करा, महिला, तरुण, ज्येष्ठ गावकरी, सरकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा, गावचा आराखडा तसेच अर्थसंकल्प तयार करा, असेही श्री. पवार यांनी नमूद केले. वित्त आयोगातून छोटया ग्रामपंचायतींना जादा निधी द्यावा, ‘इ-टेंडरिंग’ न करता पंचायतींना अधिकार द्यावा, सरपंचाला चांगले मानधन मिळावे, मनुष्यबळ मिळावे, असे मला वाटते. त्यासाठी मी स्वतः राज्यातील सरपंचांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देईन, असेही श्री. पवार म्हणाले.  पोपटराव पवार यांचे सरपंचाना मार्गदर्शन.. (Video) सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, प्रकाशने, सामटीव्ही, अॅग्रोवन, तनिष्का ही सकाळची विविध अंगे आहेत. सकाळ समूह केवळ वृत्तपत्र म्हणून काम करत नाही. सामाजिक बांधीलकी म्हणून कृतिशील काम करतो. अॅग्रोवन हा त्याचाच हा एक भाग आहे. शेती आणि ग्रामविकासाची ही चळवळ आहे. अॅग्रोवनच्या सरपंच महापरिषदेतून अनेक सरपंचांनी गावे घडवली, गावासाठी धोरणे, योजना काय आणि कशा असल्या पाहिजेत, याचा आराखडा ही महापरिषद दाखवून देते.  अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनीही सरपंच महापरिषदेचे फलित सांगताना सरपंचांना अशा पद्धतीचे व्यासपीठ पहिल्यांदा अॅग्रोवननेच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. सरपंचांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचे हे व्यासपीठ आहे. शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथांसह अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड पुरस्कारातून त्यांच्यातील आत्मविश्वासही आम्ही जागा करतो, बेरोजगारी आणि शेतीचे घटते उत्पन्न हे सध्याचे दोन प्रश्न गावांसाठी गंभीर झाले आहेत. त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे असे श्री. चव्हाण म्हणाले.  नमुन्यांचा अभ्यास हीच मोठी ताकद  “तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे पंचायतीत येऊन बसलेच पाहिजेत. त्यांच्याशिवाय गावाचा विकास शक्य नाही. सरकारी कर्मचारी गावात असले तरी तुम्ही स्वतः ग्रामपंचायत कामकाजातील १ ते ३३ नमुन्यांचा अभ्यास करा. मग देशातील कोणतीही ताकद तुम्हाला विकासापासून थांबवू शकत नाही, असा मंत्र पोपटराव पवार यांनी या वेळी दिला.  दुष्काळात ३५ फुटांवर पाणी  हिवरेबाजारला आदर्श बनविण्यासाठी गावकरी व आम्हाला अनेक वर्षे लागली. आम्ही बोअरवेल खोदाई बंद केली. पाणी उपसा करणारी ऊस-केळी पिके थांबविली. पायथ्यावर जलसंधारणाची कामे केली. भरपूर जलपुर्नभरण केले. गावचा पाणी अर्थसंकल्प आम्ही मांडतो. त्यामुळे १४ महिन्यांपासून पाऊस नसलेल्या आमच्या गावात ३५ फुटांवर पाणी लागते, असे पोपटराव यांनी अभिमानाने सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com