पाशा पटेल
पाशा पटेल

तुम्ही गाठू शकता विधानसभेची पायरी : पाशा पटेल

‘सरपंचांनो, स्वतःला अजिबात कमी समजू नका. आमदार, खासदार होणे सोपे; पण सरपंच होणे अवघड आहे. मी आमदार झालो आणि आता तर मंत्रिपदाचा दर्जा आहे. पण मी सरपंच बनू शकलो नाही. मात्र हे पद काही सहजासहजी चालून येत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. गावात बसून सर्व तालुक्यांचे लक्ष वेधून विधानसभेची पायरी तुम्ही चढू शकता. सरपंचपदाचे हत्यार तुमच्याकडे आहे. पण कसे वापरायचे त्याचे योग्य आकलन झाले पाहिजे, असा राजकीय सल्ला राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला.

सरपंच महापरिषदेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. श्री. पटेल सरपंच मंडळींना उद्देशून म्हणाले, की ''तुम्ही नशिबवान आहात. सरपंच होणे मामुली गोष्ट नाही. बाभुळगावाचे सरपंच झालेले विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले. पण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. तुम्ही सरपंच म्हणून अभ्यास करावा. गावासाठी काय काय विकासकामे करावीत हे अभ्यास करून शासनापुढे सादर करावे. ज्या दिवशी राज्यकर्त्यांना शेतीचे प्रश्न महत्त्वाचे वाटतील तेव्हाच गावाचे व शेतीचे भले होईल.''

श्री. पटेल म्हणाले, की शेतकऱ्यांनी इंधनजन्य पिकांचाही पर्याय निवडावा. ज्वारी, बांबूपासून इथेनॉल बनते. भारताला आठ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते. हा पैसा इथेनॉल उत्पादक पिकांसाठी वापरता आल्यास शेतीला वैभवाला येईल. खरिपात राज्यातील शेतकरी एक कोटी ४९ लाख हेक्टरमध्ये पेरणी करतात. कापूस आणि सोयाबीन ही दोन पिके मिळून ८२ -८५ लाख हेक्टरवर पेरणी होते. राज्यात ७० टक्के क्षेत्र असलेली ही पिके शेतकऱ्यांचे, गावांचे भले करू शकतात. केवळ नऊ टक्के ऊस पेरा असून सर्वत्र उसाचे चालते. सर्व नेते उसाभोवती फिरतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सोयाबीनचे दर साडेचार हजारांवर जाणार “मी ठरविले आपण कापूस, सोयाबीनसाठी लढले पाहिजे. तेलबिया पिकांना पुरेसा हमीभाव मिळत नाही ही शोकांतिका मी पंतप्रधानांपुढे मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. कारण, शेतकऱ्यांसाठी मी जे प्रस्ताव मांडले त्याला त्यांची मंजुरी असते. मी आयोगाचा अध्यक्ष झालो त्या दिवशी पामतेलाचे आयात शुल्क ७.५ टक्के तर रिफाइंड तेलाचे आयात शुल्क १२.५ टक्के होते. आता ते अनुक्रमे ४४ टक्के आणि ५४ टक्के झाले आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षाही १०० रुपये प्रतिक्विंटल जादा दर मिळतो आहे. पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल साडे चार हजार रुपयांच्या पुढे जातील, अशी शक्यता श्री. पटेल यांनी या वेळी वर्तविली.

मला नातवांची काळजी “आपण झाडे संपविली. त्यामुळे निसर्ग कोपला. आता तुमच्या कलेने पाऊस पडणार नाही. मला माझी, मुलाची नव्हे तर नातवाची काळजी होती. माझ्या वडिलांच्या काळात १०० दिवस तर माझ्या काळात १०० तास पाऊस पडतो आहे. पण नातवाच्या काळात पाऊस ५० तासांवर येईल. त्यामुळे समस्या जास्त वाढतील. तुम्हाला दुष्काळाची सवय करून घ्यावी लागेल. हवामानात मोठे बदल झाले आहेत. काही शास्त्रज्ञ १०० वर्षांनंतर माणूस नावाची जातच पृथ्वीवरूनच नष्ट होईल असे सांगत आहेत. मुळात झाडे ३३ टक्के असल्यावरच वातावरणाचा समतोल राखला जातो. माझ्या लातूर जिल्ह्यात दीड टक्का झाडे आहेत. त्यामुळे दुष्काळ हा देवाची किंवा सरकारची करणी नाही. आपण पर्यावरण नष्ट केले. गावाभोवती झाडे लावल्याशिवाय आता पर्याय नाही असे अभ्यासपूर्ण मत पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

अॅग्रोवन व पाशा यांची भूमिका एकः चव्हाण अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण या वेळी म्हणाले, की "शरद जोशी यांचे पट्टशिष्य असलेल्या पाशा यांना कृषिमूल्य आयोग स्थापन करण्यासाठी अॅग्रोवनच्या बरोबरीने काम केले आहे. आता ते आयोगाचे अध्यक्ष म्हणून केंद्रात अभ्यासपूर्ण पाठपुरावा करतात. देशातील शेतमालाचे धोरणात्मक प्रश्न सोडवून ते करीत आहेत.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com