पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात कीर्ती, गरनिर्मिती व्यवसायासाठी वाढतेय मागणी

रबडीसाठी अधिक मागणी बाजारामध्ये सीताफळ रबडीसह विविध उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. परिणामी सीताफळ गराचीही मागणी वेगाने वाढत आहे. पूर्वी मोजकीच मंडळी या व्यवसायामध्ये होती. आता मात्र छोट्या- मोठ्या व्यावसायिकांची संख्याही वाढत आहे. व्यापाऱ्यांबरोबरच काही शेतकरी तसेच महिला बचत गटाच्या सदस्याही गराची नियमित खरेदी करतात.
सासवड, पुरंदर भागातील सीताफळे दर्जेदार असल्याने त्यांचा चांगला दर मिळतो.
सासवड, पुरंदर भागातील सीताफळे दर्जेदार असल्याने त्यांचा चांगला दर मिळतो.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच आठवतात ती गोड स्वादाची अंजिरे आणि भल्या मोठ्या आकाराची सीताफळे. या भागात सीताफळ उत्पादकांची संख्या मोठी आहे. साहजिकच सासवड बाजारातील या दर्जेदार फळांचा गोडवा गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांपर्यंत पोचला आहे. कोल्हापूर, मुंबई, नाशिकसह विविध शहरांमध्येही सासवडच्या सीताफळांना चांगली मागणी आहे. अलीकडील वर्षांत रबडी व अन्य प्रक्रिया उद्योगांसाठी सीताफळांचा गर काढण्याचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या दर्जाच्या फळांची त्वरित उचल होणे शक्य झाले आहे. रोख व्यवहारासोबत एकही सीताफळ क्रेट विक्रीशिवाय शिल्लक राहत नाही ही या सासवड बाजाराची वैशिष्ट्ये ठरली आहेत. पुणे जिल्ह्यात पर्जन्यछायेचा प्रदेश अशी पुरंदर तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. तालुक्यात पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील भाग अधिक पावसाचा अर्थातच भाताचा असून उर्वरीत भाग प्राधान्याने पावसावर आधारीत शेतीचा आहे. येथील विहीर बागायतीत किंवा ज्या भागांत संरक्षित पाण्याची थोडीफार सोय आहे अशा पूर्वेकडील पट्ट्यांत सीताफळ, अंजीर आणि पेरू बागा दिसून येतात. यात आंबोडी, सोनोरी, दिवे, पवारवाडी, झेंडेवाडी, पिंपळे, गुरोळी, सिंगापूर, वाघापूर, राजेवाडी, आंबळे आदी गावांचा समावेश होतो. येथील बहुतांश बागायतदारांसाठी सासवड ही प्रमुख बाजारपेठ आहे. सासवडचा फळबाजार सासवडची बाजारपेठ सीताफळासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील शासकीय गोदामाजवळ सीताफळाचा बाजार दररोज सकाळी साडेसहा ते साडेबारा या वेळेमध्ये भरतो. येथे सुमारे २५ व्यापारी आहेत. मालाच्या आवकेनंतर व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून बॉक्स भरण्याची गडबड सुरू होते. राज्य-परराज्यांमध्ये हे बॉक्स रवाना केले जातात. सध्या फळांचा हंगाम असल्याने बाजारात आवक व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या अनुषंगाने बोलताना सोनोरी येथील ओंकार खेडेकर म्हणाले, की माझी सीताफळाची ८५० झाडे आहेत. हंगामात दररोज १० ते १२ क्रेट माल या बाजारात आणतो. प्रति क्रेटमध्ये १५ ते १८ किलो फळे बसतात. गेल्या दोन दिवसांत १२०० रुपये प्रति क्रेट दर मिळत आहे. सुपे येथील व्यापारी अशोक विठ्ठल जगताप म्हणाले, की दररोज ९० ते १०० क्रेट खरेदी करतो. सीताफळाचा दर्जा, मागणी व आवक यानुसार ६०० ते १८०० रुपये प्रति क्रेट दर दिला जातो. कल्याण (मुंबई) येथील व्यापारी रमेश वर्मा आणि मुन्नाप्रसाद गुप्ता दररोज १०० ते ११० क्रेट मालाची खरेदी रोखीने करतात. त्यास ते ९०० ते १२०० प्रति क्रेट दर देतात. त्यांच्याकडे माल देणारे वनपुरी येथील सतीश कुंभारकर म्हणाले, की माझी १३० झाडे आहेत. अन्य व्यवसाय करण्याबरोबरच या पिकाचीही जोपासना करतो. दररोज ४ ते ५ क्रेट सीताफळे बाजारात आणतो. नुकताच प्रति क्रेट १००० रुपये दर मिळाला. मोठी उलाढाल सासवड बाजारपेठेतील व्यापारी बापूराव शेलार म्हणाले, की हंगामात या बाजारात केवळ सीताफळातून ५० लाखांची उलाढाल होते. येथील सर्व व्यवहार पारदर्शक असून व्यापारी मालाची प्रत तपासून शेतकऱ्यांसोबत दर ठरवतात. दर्जा चांगला असल्यास अन्य व्यापाऱ्यांसोबत अनेकवेळा स्पर्धा होऊन वाढीव दर शेतकऱ्याला मिळतो. शेतकऱ्यांना त्वरित रोखीने पैसे दिले जातात. मी दररोज २०० ते २५० क्रेट एवढी खरेदी करतो. पुढे बंगळुरू, गोवा आणि सूरत येथे माल पाठवतो. यंदा दुष्काळी स्थितीचा परिणाम सोनोरी येथील स्थानिक व्यापारी गिरीश काळे म्हणाले, की यंदा दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन कमी आहे. सद्यस्थितीत दररोज ७० ते १०० बॉक्सची मागणी असताना केवळ ४० बॉक्सची पूर्तता करणे शक्य होत आहे. प्रति बॉक्समध्ये २० ते २५ किलो सीताफळ बसते. मी गोवा, अहमदाबाद, सुरत या परराज्यांसह कोल्हापूर, मुंबई, नाशिक या बाजारपेठांमध्येही सीताफळ पाठवतो. फळांच्या दर्जानुसार ६०० रु (३ टक्के), ८५० रु (३३ टक्के), १००० ते १२०० रु. (३७ टक्के), १५०० ते १८०० रु (२७ टक्के) दरांप्रमाणे मालाची खरेदी केली. सासवडमधील सीताफळ आणि आठवडी बाजार या दोन्हीचे टेंडर संजय त्र्यंबक जगताप यांच्याकडे आहे. त्यांच्या वतीने दीपक फराटे यांनी बाजाराविषयी माहिती दिली. दीपक फराटे म्हणाले, की सध्या दुष्काळामुळे आवक कमी आहे. साधारण ४०० ते १००० क्रेट माल येतो. बाजारात शेतकऱ्यांकडून प्रति क्रेट पाच रुपये प्रमाणे पावती घेतली जाते. यामध्ये स्वच्छता, वीजबिल या सुविधा पुरवल्या जातात. सातत्याने दर्जेदार उत्पादन दररोज दर्जेदार सीताफळ बाजारात घेऊन येणारे दिवे येथील संतोष गोकूळ भापकर यांना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रति क्रेट १८०० ते २००० रुपये दर मिळाला. त्यांच्याकडे १०० सीताफळ झाडे आहेत. झाडांची जोपासना करताना शेणखताचा अधिक वापर आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. फळांच्या गुणवत्तेमागील हेच महत्त्वाचे रहस्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पवारवाडी येथील मनोहर पवार देखील उत्तम दर्जाची सीताफळे पिकवण्यात प्रसिद्ध आहेत. आपल्या वाहनातून जेव्हा ते एकाहून अधिक फेऱ्यांत माल घेऊन येतात. त्यांच्या मालाभोवती व्यापाऱ्यांचा गराडा पडतो. मागील आठवड्यात पहिल्या फेरीत १० क्रेटची विक्री १३०० रुपये प्रति क्रेटप्रमाणे झाली. दुसऱ्यावेळी ८ आणि ६ क्रेट होते. प्रत्येकाने बोली लावली. अखेर १४५० रुपये दराने ज्या वेळी त्यांचे सर्व क्रेट दोन ते तीन व्यापाऱ्यांनी खरेदी केले त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान लपू शकले नाही. पवार म्हणाले, की माझ्याकडे दोन हजार सीताफळ झाडे आहेत. हंगामात दररोज २० ते २४ क्रेट सीताफळ बाजारात आणतो. नुकताच १६ क्रेट मालाला प्रति क्रेट २००० रुपये प्रमाणे दर मिळाला. आपल्या डोळ्यादेखत विक्री होते. सर्व रोखीचा व्यहवार असल्‍यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नसते. गर काढणी उद्योगामुळे बदलतोय ट्रेंड अलीकडील काळात मूल्यवर्धनाला महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने सीताफळाच्या गर उद्योगाचे महत्त्व वाढले आहे. साहजिकच सीताफळ बाजाराचा ट्रेंड बदलला आहे. पूर्वी बाजारामध्ये ए व बी दर्जाच्या फळांची खरेदी प्रथम होत असे. त्यानंतर उर्वरित दर्जाचा माल उचलला जाई. मागणी पूर्ण झाल्यास व्यापाऱ्याकडून सी दर्जाच्या मालाला उठाव फारच कमी होत असे. परिणामी या मालाचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्याला पडायचा. अलीकडे मात्र गर काढणी उद्योगा निमित्ताने या सीताफळांना चांगला उठाव आहे. दर्जाप्रमाणे ३५० ते ८०० रुपये प्रति क्रेट दरम्यान गर काढणीसाठी सीताफळाची खरेदी केली जाते. साहजिकच शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होत असून विक्रीविना एकही क्रेट सीताफळ पडून राहत नाही, असे म्हणता येईल. रबडीसाठी अधिक मागणी बाजारामध्ये सीताफळ रबडीसह विविध उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. परिणामी सीताफळ गराचीही मागणी वेगाने वाढत आहे. पूर्वी मोजकीच मंडळी या व्यवसायामध्ये होती. आता मात्र छोट्या- मोठ्या व्यावसायिकांची संख्याही वाढत आहे. व्यापाऱ्यांबरोबरच काही शेतकरी तसेच महिला बचत गटाच्या सदस्याही गराची नियमित खरेदी करतात. व्यापारी रेवन्नाथ अनंता जाधव म्हणाले, की मी भागीदारीमध्ये हा व्यवसाय करतो. गर काढण्यासाठी सुमारे २०० क्रेट सीताफळांची खरेदी दररोज करतो. मागील आठवड्यात ३०० ते ६०० रुपये प्रति क्रेटप्रमाणे त्यांची खरेदी झाली. पिंपळे येथील सीताराम यशवंत खेनट गरासाठी सीताफळ देतात. त्यांची ८०० झाडे आहे. ते दररोज ८ ते १० क्रेट सीताफळ विक्रीस आणतात. सी दर्जाच्या सीताफळाला ५०० रुपये प्रति क्रेट दर त्यांना मिळाला आहे. ढुमेवाडी येथील पृथ्वीराज ऊर्फ मोनाशेठ ढुमे यांचाही गर काढण्याचा व्यवसाय आहे. तेही सध्या सुमारे ६० ते ७० क्रेट सीताफळाची खरेदी करतात. सी दर्जाच्या सीताफळांना प्रति क्रेट सुमारे ३०० ते ८०० रुपये असा दर दिला जातो. सध्या प्रति दिन सुमारे २०० किलो गर काढला जातो. हंगामामध्ये रोज सुमारे २०० ते ३०० क्रेट सीताफळांची खरेदी केली जाते. यापासून सुमारे ६०० ते ७०० किलो गर काढला जात असल्याची माहिती ढुमे यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी सुविधा अपुऱ्या बाजारात आपले सीताफळ घेऊन येणारे बळिराजा शेतकरी संघाचे राज्य संघटक संजयनाना जगताप यांनी सासवड बाजारात शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, की दररोज सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र पाऊस आला तर उभारण्यासाठी साधे शेडही नाही. दुचाकीवर एक- दोन क्रेट घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांपासून छोट्या टेम्पोच्या फेऱ्या करणारे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांच्या गाड्यांची गर्दी पाहता प्रवेशाचा मार्ग अत्यंत चिंचोळा मार्ग आहे. पिण्यासाठी पाणीदेखील बाजारात उपलब्ध नाही. व्यापाऱ्यांसाठीही केवळ पत्र्याचे किंवा प्लॅस्टिकचे तात्पुरते शेड उभारले आहेत. येथे पक्क्या शेडसह शेतकऱ्यांना योग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत. सीताफळाचे वर्षभराचे नियोजन पाण्याच्या उपलब्धतेनुसार सासवड भागातील शेतकरी सीताफळाचे दोन हंगाम पकडतात. ज्यांच्याकडे उन्हाळ्यात पाण्याची सोय आहे असे शेतकरी मेमध्ये पाणी देऊन उन्हाळी हंगाम घेतात. त्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो. परिणामी, दर्जा चांगला राहण्यासोबतच फळे बाजारामध्ये लवकर येतात. साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळी सीताफळे बाजारात येत असल्याने चांगला दर मिळून जातो. पावसावर अवलंबून असलेले सीताफळ ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात बाजारात येते. पुरंदर तालुक्यात पूर्वेकडील भागात पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी संरक्षित प्रमाणात उपलब्ध होते. त्याचा फायदा विहिरींमध्ये पाणी वाढून अनेक शेतकऱ्यांना होत आहे. सीताफळाची एकरी साधारण २०० झाडे बसतात. हंगामाचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापनासाठी एकरी किमान २५ हजार रुपये खर्च होतो. सीताफळ उत्पादक मनोहर पवार आपल्या दोन हजार झाडांपैकी काही उन्हाळी तर काही पावसाळी हंगामाचे असे दोन्ही हंगामात उत्पादन घेतात. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून डिसेंबरपर्यंत माल सुरू राहतो. दोन्ही हंगामात सातत्यपूर्ण माल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळतो. बाजारातील आवक कमी- जास्त होत असली तरी दरही चांगला मिळतो. पवार यांना नुकताच उच्चांकी दर मिळाला. बी दर्जाच्या मालाला (भोगीचा माल) ७५० रुपये प्रती क्रेट दर मिळाला. बाजारामध्ये सीताफळाची वजनानुसार प्रतवारी

  • जंबो - ५०० ग्रॅम व त्यापेक्षा अधिक
  • व्हीआयपी - ४०० ते ५०० ग्रॅम
  • स्पेशल - ३०० ते ४०० ग्रॅम
  • ए दर्जा - १५० ते २५० ग्रॅम
  • बी दर्जा (भोगी) १०० ते १५० ग्रॅम
  •  शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या सीताफळाची व्यापारी पुन्हा प्रतवारी करतात. पुढे विविध बाजारापेठांच्या मागणीनुसार २ ते १५ नगांचे पेटी पॅकिंग, २० ते २५ किलो वजनाचे बॉक्स पॅकिंग आणि क्रेट (२० ते २२ किलो) अशी फळे रवाना होतात. संपर्क - मनोहर पवार - (शेतकरी, पवारवाडी) ८८८८८५०५४१ संतोष भापकर (शेतकरी, दिवे) - ७०५७३७८१३४ संजयनाना जगताप - (शेतकरी) ९१७२०३५८५९ गिरीश काळे (व्यापारी) - ७३८७४९७५९४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com