AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व संघर्षातून सावरले घर अन् शेती

एकानं विस्कटलं, तर दुसऱ्यानं सावरायचं असतं आत्महत्येपूर्वी माझ्याशी एका शब्दाने बोलले असते, तर त्यांना मी सावरले असते, अशी भावना त्या व्यक्त करतात. आज विधवा महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तरीही, संघर्षातून जिद्दीने वैशालीताईंनी वाटचाल सुरू ठेवली आहे
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व संघर्षातून सावरले घर अन् शेती
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व संघर्षातून सावरले घर अन् शेती

अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे राजूर, जि. यवतमाळ  राजूर (जि. यवतमाळ) या आदिवासीबहुल व डोंगरदऱ्यात वसलेल्या गावातील वैशाली येडे यांना पतीच्या आत्महत्येचा मोठा धक्का सहन करावा लागला. पण, खचून न जाता स्वतःच्या हिमतीवर प्रपंच, मुलांची शिक्षणे व शेती सावरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. अविरत कष्ट, संघर्षातून धैर्याने वाट काढत उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे प्रयत्न केले. आज केवळ महिलावर्गच नव्हे, तर शेतकऱ्यांसाठीही त्या प्रेरणेचा स्रोत झाल्या आहेत.    यवतमाळ जिल्ह्यात राजूर हे आदिवासीबहुल जेमतेम लोकवस्तीचे व डोंगरदऱ्यात वसलेले गाव. कोरडवाहू शेती असलेल्या या गावात मजुरीशिवाय रोजगाराचा अन्य फारसा पर्याय नाही. त्यामुळे खरीप हाच मुख्य हंगाम. त्यानंतर रोजगारासाठी स्थलांतर ठरलेले.  तीन एकर शेतीच उदरनिर्वाहाचे साधन  याच गावात येडे कुटुंबीयांची नऊ एकर शेती. सन २००९ साली वैशाली यांचे येडे कुटुंबातील सुधाकर यांच्याशी लग्न झाले. त्या वेळी सुधाकर, त्यांचा भाऊ व आई असे एकत्रितपणे शेती कसत. यातून थोडेफारच पैसे मिळत होते. पाणी, पिके घेण्यावर येणारी मर्यादा, असमाधानकारक दर, अशा कारणांमुळे साडेचार एकर शेतीत समस्या तयार झाल्या. गाठीशी पैसा नसल्याने सावकारी कर्ज घेऊन बियाण्यांची सोय सुधाकर यांनी केली.  पतीची आत्महत्या  शेती कुटुंबाची आर्थिक घडी सावरेल अशी सुधाकर यांना अपेक्षा होती. सन २००९ मध्ये दांपत्याला मुलगा झाला. कुणाल दीड वर्षाचा झाला असताना सन २०११ मध्ये दुसऱ्या बाळंतपणासाठी वैशालीताई डोंगरखेडा येथे माहेरी गेल्या. दुसरी मुलगी झाली. मुलगी एक महिन्याची झाली असतानाच सावकारांकडून पैशाची मागणी होऊ लागली. दुष्काळामुळे शेती पिकली नव्हती. त्यामुळे देणीदारांची देणी कशी द्यावी, असा प्रश्‍न सुधाकर यांना सतावू लागला. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. वैशालीताई त्या वेळी माहेरीच होत्या. ही बातमी कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. सारेच संपल्यागत त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारले.  मुलांनी दिले जगण्याचे बळ  लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच पतीने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. मात्र, दोन मुलांसाठी मला जगावेच लागेल, असा निर्धार वैशालीताईंनी केला. जगण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची सोय करण्याचे आव्हान वैशालीताईंसमोर होते. परंतु, न डगमगता त्यांनी या आव्हानाचा सामना केला. मुलगा १८ वर्षांचा होईस्तोवर जमीन देणार नाही, अशी भूमिका सासरकडील काहींनी मांडली. या माध्यमातून निराशा हाती आल्याने वैशालीताईंचा नाइलाज झाला. मात्र, जगण्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले. मुलगी अवघी एका महिन्याची असल्याने शेतमजुरीदेखील शक्‍य नव्हती. अशा दुहेरी विवंचनेत त्या सापडल्या होत्या.  अंगणवाडी मदतनीस म्हणून मिळाले काम  सन २०१३ पर्यंत आर्थिक ओढाताणीमुळे त्रस्त झालेल्या वैशालीताईंना गावातील अंगणवाडी मदतनीस हे पद रिक्‍त असल्याचे कळले. त्यांनी अर्ज केला. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या परिस्थितीची जाण ठेवत त्यांची या पदावर नियुक्‍ती केली.  चालू लागला संसाराचा गाडा  अंगणवाडीत मदतनिसाचे काम मिळाले. आज वैशालीताई सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत आपली जबाबदारी पार पाडतात. यासाठी महिन्याला साडेतीन हजार रुपये मानधन मिळते. घरचा प्रपंच,  मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च आहेच. त्यामुळे आजही त्यांचा आर्थिक ओढाताणीचा संघर्ष सुरूच आहे.  संस्थेच्या संपर्कातून मिळाली दिशा  सुरवातीला इसार संस्था, मोझरी येथील एकल महिला संघटना व त्यानंतर नाम फाउंडेशनच्या संपर्कात वैशालीताई आल्या. तेथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. नाम फाउंडेशन संस्थेने पंधरा हजार रुपयांची मदत केली. मुलांचे आयुष्य पाहता ही मदत स्वीकारण्याखेरीज अन्य कोणता पर्याय माझ्यासमोर नव्हता, असे त्या पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात. सरकारकडून मिळालेल्या एक लाख रुपयांतील ३० हजार रुपये रोख मदतीचा उपयोग पतीने घेतलेले सावकारी कर्ज फेडण्यावर खर्च झाला. इसार संस्थेकडून उपजीविकेचे साधन म्हणून त्या वेळी शिवणयंत्र मिळाले होते. त्यावर कपडे शिवून मिळणाऱ्या पैशांतूनही फाटलेले आभाळ काही प्रमाणात शिवण्याचा प्रयत्न करते, असे वैशालीताईंनी सांगितले.  ‘तेरवं’तून मांडला जीवनपट  वैशालीताईंच्या संघर्षाची माहिती नाम फाउंडेशनला मिळाली. नामचे विदर्भ समन्वयक हरीश इथापे, दिग्दर्शक श्‍याम पेठकर यांनी रियल लाइफ थिएटरच्या माध्यमातून वैशालीताईंची कहाणी सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. ‘तेरवं’ ही दीड तासाची नाटिका वैशालीताईंच्या आयुष्यावर तयार करण्यात आली. तेरा महिलांनी यात भूमिका साकारली आहे. हे व्यावसायिक नाटक नाही. यातून अपेक्षित उत्पन्नही होत नसल्याने कलाकारांनादेखील मानधन तुटपुंजेच मिळते.  साहित्य संमेलनाने दिली जगण्याची दिशा  नयनतारा सहगल यांचे साहित्य इंग्रजीत असल्याच्या वादानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून कोणीही येण्यास तयार नव्हते. त्याचवेळी शेतकरी विधवेच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करावे, असा सूर निघू लागला. इसार संस्थेचे नीलेश भोयर यांच्याशी त्या वेळी आयोजकांकडून संपर्क साधण्यात आला. त्या वेळी ‘तेरावं’ नाटकाविषयी माहिती कळाली. त्याची व्हिडिओ क्‍लिप पाहिल्यानंतर वैशालीताईंच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले. वैशालीताई सांगतात की, त्या वेळी केलेल्या भाषणातून शेतकरी विधवांचा संघर्ष मी चितारला. माझ्या भाषणामुळे अनेकांचे डोळे पाणावले.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com