दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती 

पूर्व हंगामासाठीचा ऊसबेणे मळा
पूर्व हंगामासाठीचा ऊसबेणे मळा

काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व प्रगतशील शेतकरी भरत माने हे प्रगतशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून दोन ते तीन एकरांत उसाचा बेणेमळा तयार करण्यात सातत्य ठेवत दर्जेदार बेणे शेतकऱ्यांना पुरवण्यामध्ये त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे.    सातारा जिल्ह्यातील काशीळ हे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे सात हजार लोकसंख्येचे गाव. गावात कृष्णा व उरमोडी नद्याचा संगम असून त्याखाली कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. साहजिकच गावास मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने बहुतांशी शेती बागायत आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस, आले, सोयाबीन पिके केली जातात. गावातील भरत तुकाराम माने ‘बीएस्सी’ (इलेक्ट्रॅानिक्स) असलेले प्रगतशील शेतकरी. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ मुंबई येथे नोकरी केली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पंतप्रधान कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयात सहायक खासगी सचिव म्हणूनही जबाबदारी पाहिली. घरच्या शेतीत नवनवे काही करावे अशी प्रचंड आवड होती. पण नोकरी सुरू असल्याने त्याकडे पूर्णवेळ देणे शक्य व्हायचे नाही. पण शेतीची नाळ मात्र कायम ठेवली होती.  ऊस बेणे मळ्याची सुरवात  माने कुटुंबाची सुमारे २५ एकर शेती वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यात सुमारे १५ एकर ऊस वेगवेगळ्या हंगामात असतो. मात्र मुख्य हंगाम आडसाली हाच असतो. परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची गरज भरत आणि मोठे बंधू अंकुश यांनी लक्षात घेतली. सन १९९६ च्या सुमारास परिसरातील साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस बेणे मळ्याचा प्रयोग केला. त्या वेळी बेणेविक्रीतून चांगले उत्पन्न मिळाल्याचेही त्यांच्या लक्षात आले होते. या काळात बेणे विक्री शक्यतो कारखान्यांच्या माध्यमातून केली जात होती. मध्यंतरी माने कुटुंब सोयाबीन, भात, गहू आदींच्या बीजोत्पादनाकडे वळले. त्यात ते यशस्वीही झाले. पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यात पुढे अडचणी येऊ लागल्या. मग पुन्हा २००९ नंतर ऊसबेणे तयार करण्यावरच भर दिला. त्यात आजतागायत म्हणजे सुमारे ९ ते १० वर्षे सातत्य टिकवले आहे.  प्रयोगशीलता जपली  शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे कसे देता येईल यासाठी माने विविध ठिकाणी जाऊन अभ्यास करतात.  यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, उरुळीकांचन परिसरातील तंत्रशुद्ध बियाणे करणारे शेतकरी, सह्याद्री, अजिंक्यतारा, किसनवीर या कारखान्यांच्या ऊस विकास विभागांच्या भेटींचा समावेश आहे.  बेणेमळानिर्मिती- ठळक बाबी 

  • शेतकऱ्यांची विविध लागवड हंगामांची गरज लक्षात घेऊन बेणेमळानिर्मिती 
  • मुख्य वाण को-८६०३२. त्याचबरोबर १०००१, फुले २६५ आदींचाही समावेश 
  • बेणेमळा घेण्यापूर्वी दोन महिने अाधी शेणखत, लेंडीखताचा वापर 
  • बेणे निरोगी असावे यासाठी रासायनिक बीजप्रक्रिया 
  • शिफारशीनुसार रासायनिक खतांचे व अन्य व्यवस्थापन 
  • अर्थशास्त्र  साधारण ८ ते १० महिने बेणेमळा असतो. यात एकरी उत्पादन खर्च ७० हजार रुपयांपर्यंत होतो.  एक एकर क्षेत्रातून को ८६०३२ वाणाच्या लागवडीयोग्य १७०० ते १७५० मोळ्या (प्रती २० उसाच्या) मिळतात. प्रती मोळी २०० ते २२० रुपये याप्रमाणे विक्री होते. खर्च वजा जाता एकरी सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न हाती येते. परिसरातील अनेक ऊस उत्पादक त्यांच्याकडून बेणे घेऊन जातात. 

  • माने यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
  • कारखान्याला जाणाऱ्या आडसाली उसाचे एकरी ९० ते १०० टनांपर्यंत उत्पादन 
  • शेतीकामाच्या सर्व नोंदी संगणकीकृत 
  • शेणखत, लेंडीखत, कंपोस्ट तसेच हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर 
  • ॲग्रोवन , कृषी संदर्भातील असलेली पुस्तके, मोबाईल ॲप आदींच्या माध्यमातून तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीस भेटी देऊन सातत्याने नवनवीन माहिती घेण्यावर भर 
  • शेतीत पुतण्या वैभव, लहान बंधू व उपजिल्हाधिकारी संदीप माने यांचे मोलाचे सहकार्य 
  • सुमारे २५ गुंठ्यात वृक्षलागवड, चिकूची ३२ झाडे, केशर आंबा व बाणावली नारळ लागवड 
  • संपर्क- भरत माने- ९६०४९५९९५९, ७७४१०७५७५०   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com