agriculture story in marathi, agrowon, turmeric farming, mahagaon, yavatmal | Agrowon

कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली हरभऱ्याची जोड 
विनोद इंगोले
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत चौधरी यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीशी नाते कायम ठेवले आहे. सहा महिने कालावधीच्या हळदीचा प्रयोग, त्याची पुरेशी बेणेनिर्मिती व त्याआधारे १४ एकरांत त्याची लागवड त्यांनी यशस्वी केली. या प्रयोगामुळे हळदीच्या क्षेत्रात जानेवारीनंतर विविध पिके घेत त्यापासून उत्पन्न घेणे त्यांना शक्य झाले. नेहमीच्या हरभऱ्यापेक्षा दर अधिक मिळवत काबुली हरभऱ्याची शेतीही त्यांनी लाभदायक ठरवली आहे. 
 

महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत चौधरी यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीशी नाते कायम ठेवले आहे. सहा महिने कालावधीच्या हळदीचा प्रयोग, त्याची पुरेशी बेणेनिर्मिती व त्याआधारे १४ एकरांत त्याची लागवड त्यांनी यशस्वी केली. या प्रयोगामुळे हळदीच्या क्षेत्रात जानेवारीनंतर विविध पिके घेत त्यापासून उत्पन्न घेणे त्यांना शक्य झाले. नेहमीच्या हरभऱ्यापेक्षा दर अधिक मिळवत काबुली हरभऱ्याची शेतीही त्यांनी लाभदायक ठरवली आहे. 
 
यवतमाळ जिल्ह्यात महागाव येथील जयंत चौधरी यांची तेथून सुमारे चार किलोमीटरवरील आमनी (खुर्द) शिवारात २४ एकर शेती आहे. पूर्वी या शिवारातील सिंचनासाठी तीन बोअरवेल्स होत्या. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या शिवारात आता ५४ फूट खोल व ४१ फूट रुंद मोठी विहीर खोदली आहे. बारमाही ओलिताची सोय त्यातून झाली. त्यासाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च झाला. 

हळदीची केली निवड 
चौधरी यांचे ‘मेडिकल सेंटर’देखील आहे. हा व्यवसाय सांभाळून ते शेतीही अत्यंत नेटक्या व प्रयोगशील वृत्तीने पाहतात. शेती अधिकाधिक प्रगतिशील व्हावी यासाठी त्यांचा सतत खटाटोप सुरू असतो. पाच वर्षांपूर्वी बिहार राज्यात कुटुंबीयांसमवेत फिरण्यासाठी गेले असता केवळ सहा महिने कालावधीत पक्व होणाऱ्या हळद वाणाविषयी माहिती तेथील शेतकऱ्यांकडून मिळाली. हे वाण घेतल्यास पुढील पिकासाठी क्षेत्र लवकर मोकळे होऊ शकते व पाणी, निविष्ठांची गरजही कमी भासू शकते, असा विचार चौधरी यांनी व्यक्त केला. अधिक अभ्यासाअंती प्रयोग करण्याचे निश्‍चित केले. 

हळदीचा प्रयोग 
सुरवातीला केवळ १५ किलो बेणे आणले होते. त्याच्या प्रयोगानंतर प्रत्येक वर्षी बेणेवृद्धी करण्यास सुरवात केली. पुढे त्यातील चार किलो बेण्याचे नुकसान झाले. तरीही त्याच्या लागवडीतील चिकाटी काही सोडली नाही. असे करीत मागील वर्षीपर्यंत जे बेणे उपलब्ध झाले त्यापासून १४ एकरांपर्यंत या हळदीचे क्षेत्र वाढवणे शक्य झाले. त्याचे एकरी १३५ क्विंटल उत्पादन (ओले) मिळाले. यंदाही काही क्षेत्रात एकरी ६० क्विंटलप्रमाणे, तर काही १४० क्विंटलप्रमाणे व सरासरी ११० ते १२० क्विंटल उत्पादन मिळाले. मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेताला शेतकऱ्यांनी भेट देत नव्या वाणाविषयी जाणून घेतले आहे. सुमारे ४५० क्विंटल बेण्याचे बुकिंग झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. एक क्विंटल हळद ‘पॉलीशिंग’ करून विकली आहे. हळदीसाठी वसमत, नांदेड, हिंगोली या प्रमुख बाजारपेठा आहेत. या ठिकाणच्या दराचे अंदाज घेत पुढील विक्री केली जाणार आहे. 

कमी कालावधीतील हळदीचा फायदा 
चौधरी म्हणाले की, पाच वर्षांपासून हे वाण मी सातत्याने घेतो आहे. जूनमध्ये लागवड केल्यास डिसेंबरपर्यंत काढणी होते. त्यामुळे मागील जानेवारी, फेब्रुवारीत भुईमुगासारखी पिके घेता आली. यंदा गहू, तीळ, मूग आदींची लागवड या क्षेत्रात केली. म्हणजेच एकाच क्षेत्रात दोनवेळा उत्पन्न घेता येते. पाण्याची व अन्य निविष्ठांचाही गरज कमी भासते. वायगाव, सेलम, राजापुरी या वाणांचा परिपक्‍वतेचा कालावधी नऊ महिने ते त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे दुबार पीक घेणे या वाणांमध्ये शक्य होत नाही. ते बिहारी वाणात शक्य होते असे चौधरी सांगतात. 

फेरपालट व शेणखतावर भर 
शेणखत विकत घेऊन त्याचा वापर सुरू केला आहे. यंदा सुमारे ६० ट्रॉली शेणखत खरेदी केले आहे. एस- ९ कल्चर, गांडुळे यांचा वापर करून खताचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न आहे. हळदीची पाने कुजवून वापरण्यासाठीही शेताच्या परिसरात खड्डे केले आहेत. 

काबुली हरभऱ्याची शेती 
सुमारे पाच वर्षांपासून काबुली हरभऱ्याची शेती चौधरी करताहेत. त्याचे दाणे जाड व मोठे असल्याने "छोले भटूरे' या खाद्यपदार्थासाठी मागणी अधिक राहते. नेहमीच्या हरभऱ्यापेक्षा याला सरासरी दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल अधिक दर मिळतो असे ते सांगतात. या भागात काबुली हरभऱ्याखालील क्षेत्र वाढते आहे. चौधरी यांचा यंदा सात एकरांवर हरभरा आहे. एकरी ९ ते १० क्‍विंटल उत्पादन त्यांना मिळते. 

‘कोल्डस्टोरेज’मध्ये हरभरा 
चौधरी यांच्यासह चार ते पाच शेतकऱ्यांनी यवतमाळमध्ये ‘कोल्डस्टोरेज’मध्ये १५ रुपये प्रति क्‍विंटल दराने हरभरा ठेवला आहे. दर व प्रत यानुसार त्याची विक्री केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हळद-कुंकू यासाठी कोचा 
हळदीतील कोचाचा कुंकू उद्योगासाठी वापर होतो. उकळण्याची प्रक्रिया करून त्याला १२ ते १३ हजार रुपये प्रति क्‍विंटल दर मिळतो असे चौधरी सांगतात. अर्थात बिहारी वाण कमी कालावधीचे असल्याने कोचा मिळण्याचे प्रमाण अधिक राहते, असा त्यांचा अनुभव आहे. 

अन्य शेती 
पाडेगाव (जि. सातारा) येथून उसाचे वाण आणून त्याची लागवड केली आहे. दोन गायी आहेत. गोमूत्रचे संकलन केले जात आहे. शेतीकामासाठी दोन बैलही आहेत. शेतीवर नियमित लक्ष राहावे यासाठी आदिवासी कुटुंब तैनात केले आहे. आनंदराव खोकले काही वर्षांपासून येथील शेती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडतात. साहजिकच सर्वांशी भावनिक नाते जुळल्याने पारिवारिक नाते तयार झाले आहे. 

संपर्क- जयंत चौधरी- ९१३०९४८६३३ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
सिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले...हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील...
प्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा...स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी...
विदर्भात यशस्वी खजूरशेती, दहा...नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा...
दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम...सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर...