मार्केट ओळखून भाजीपाला  पिकविण्यात हातखंडा 

काहीवेळा अपेक्षित दर मिळत नाहीत. मात्र बाजारपेठेतील मागणी ओळखून केलेली लागवड व त्यातील सातत्य नेहमीच फायदेशीर ठरते. -विष्णू साळुंखे
विष्णू साळुंखे यांचा कांदा बिजोत्पादन प्लाॅट
विष्णू साळुंखे यांचा कांदा बिजोत्पादन प्लाॅट

मांजर्डे (जि. सांगली) येथील विष्णू साळुंखे यांनी कांदा पात, कांदा तरु, मेथी, शेपू यांच्या उत्पादनावरच भर देत त्यात दहा वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. थेट विक्री हे त्यांचे वैशिष्ट्य. हंगाम व बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यानुसार भाजीपाला पिकविण्यात त्यांनी हातखंडा तयार केला आहे. त्यातून कुटुंबाचे  आर्थिक स्थैर्य उंचावले आहे.    सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याचा पूर्व भाग तसा दुष्काळी. मात्र या भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षाची शेती परंपरेने जपली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे वेगवेगळी पिके घेणे मुश्कील झाले आहे. असे असताना गावातील विष्णू साळुंखे मात्र दहा वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा प्रयत्न करताहेत हे विशेष. त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वडील नारायण आणि आई राजाक्का यांनी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून प्रपंच चालवला.  सारा परिवार राबतोय एकत्र  विष्णू, पत्नी स्वाती, मधला भाऊ अरुण, पत्नी सुवर्णा, धाकटा भाऊ अशोक, त्यांच्या पत्नी दीपा  व मुले असा एकूण १५ सदस्यांचा परिवार आहे. सर्वजण शेतात राबतात. एक विहीर आणि कूपनलिका आहे. पाण्याची तशी कमतरता भासत नाही. विसापूर-पुणदी योजनेचे पाणीही आता आले आहे.  भाजीपाला शेती आर्थिक हातभार लावते  दहा वर्षांपासून साळुंखे कांद्याची शेती करताहेत. त्यांचा मुख्य भर कांदा पातीच्या विक्रीवर असतो. ते सांगतात की सुमारे साडेतीन महिन्याचे हे पीक कमी पाण्यात येणारे आहे. मकर संक्रातीच्या दरम्यान कांदा पातीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. सांगली शहराची मोठी बाजारपेठ असून ती गावापासून काही किलोमीटरवर आहे. येथे व्यापाऱ्यांना न देता थेट विक्री करतो. साहजिकच चार पैसे अधिक राहतात. पुरेसे पाणी नसल्याने उपलब्ध पाण्यात येऊ शकणाऱ्या पिकांचीच निवड करतो. शिवाय भाजीपाला म्हणजे खिश्‍यात रोज पैसे देणारे पीक आहे. हाच भाजीपाला आमच्या कुटुंबाची आर्थिक भरभराट करून देतोय.  साळुंखे यांच्या भाजीपाला शेतीची वैशिष्ट्ये 

  • कांदा पात व रोप यांच्या विक्रीतून उत्पन्न 
  • मेथी, कोथिंबीर, शेपू आदींचीही थेट विक्री 
  • त्यामुळे बाजारपेठेत कोणत्या भाजीपाल्यास किती मागणी याचा अभ्यास झाला 
  • बियाणे स्वतःच तयार करण्यावर भर 
  • ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हंगाम पकडल्यास बाजारात पात आणि कांदा रोपे विक्रीस फारशी उपलब्ध नसतात. त्यामुळे दर अपेक्षित मिळण्याची शक्यता 
  • उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने मेथी, कोथिंबीर आणि शेपूची बाजारपेठेत आवक कमी. त्यामुळे चांगले दरही मिळतात. म्हणून त्यांच्या निवडीस प्राधान्य. 
  • कांदा पिकाचे अवशेष रोटरद्वारे शेतातच गाडले जातात. त्याचे खत तयार होते. 
  • रोपांना कायम मागणी  साळुंखे सांगतात, की कांदा रोपनिर्मितीतील दहा वर्षांचा अनुभव आहे. जागेवरच विक्री होते. रोपे खरेदीसाठी सांगली जिल्ह्यातून शेतकरी येतात. यंदा पाण्याची टंचाई आणि दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. यामुळे यंदा कांद्याची रोपे विक्रीसाठी आठवडी बाजाराचा आधार घ्यावा लागतो आहे. पाण्याची टंचाई असली तरी दर्जेदार रोपे मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी कमी झालेली नाही.   

    साळुंखे यांची शेती 

  • एकूण शेती १० एकर 
  • तीन एकर ऊस- वाण फुले २६५ 
  • हरभरा- एक एकर 
  • मका- एकर एकर- वैरणीसाठी 
  • जनावरे- ४ 
  • दोन्ही वेळचे दूध डेअरीला 
  • कांदा पात 

  • अर्धा एकर (हंगामानुसार कमी-जास्त) 
  • पहिल्या लागवडीनंतर दुसरी लागवड आठ दिवसांनी 
  • आठ दिवसांतून एकदा असे दहा वेळा वाफसा पद्धतीने पाणी 
  • उत्पादन- प्रतिगुंठ्यात एकहजार पेंडी 
  • उत्पन्न- ५० ते ६० हजार रु. 
  • उत्पादन खर्च- १५ ते २० हजार रु. 
  • - दर- ४०० रुपयांपासून कमाल ७०० ते ९०० रुपये प्रतिशेकडा (आवकेनुसार कमी-जास्त) 
  • कांदा तरू- एकूण क्षेत्र एक एकर 

  • हंगाम- सप्टेंबर ते फेब्रुवारी 
  • दहा गुंठ्याचे प्लॉट 
  • दोन लागवडींमध्ये आठ ते दहा दिवसांचे अंतर 
  • उत्पादन- प्रतिगुंठ्यात- ८०० पेंडी 
  • एक दिवसाआड असे १५ ते २० वेळा वाफसा पद्धतीने पाणी 
  • दर-५ रुपये ते २० रुपये प्रतिपेंडी (प्रतिपेंडीत १०० ते १५० रोपे) 
  • उत्पादन खर्च- ५० ते ५५ हजार रू (एकरी) 
  •  शेपू- एक एकर 

  • हंगाम- मार्च ते ऑगस्ट 
  • दर- ८०० रुपये. कमाल १२०० रु. पर्यंत प्रतिशेकडा 
  • एकरी खर्च- १५ हजार रुपयांपर्यंत 
  • मिरची रोपे- -देशी वाण- सात गुंठे 

  • हंगाम- जून ते ऑगस्ट 
  • दर- सरासरी साठ ते सत्तर रुपये प्रतिशेकडा पेंडी 
  • उत्पादन खर्च- तीन हजार रुपये. 
  • मुख्य बाजारपेठा 

  • सांगली येथील शिवाजी मंडई 
  • तासगाव, पेड, खानापूर, मांजर्डे येथील आठवडे बाजार 
  •   संपर्क- विष्णू नारायण साळुंखे- ९७६४०२०५३३ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com