सासूला सुनेची समर्थ साथ, कष्टाच्या शेतीला यशाचा हात

विजयाताई शिसोदे (मध्यभागी) आपली स्नुषा योगिता (उजवीकडून प्रथम) व महिला मजुरांसह
विजयाताई शिसोदे (मध्यभागी) आपली स्नुषा योगिता (उजवीकडून प्रथम) व महिला मजुरांसह

कुटुंबात शेतीची जबाबदारी प्रामुख्याने पुरुषांवर असते. मात्र नाशिकमधील विजया शिसोदे व त्यांच्या स्नूषा योगिता यांनी आपल्या घरच्या शेतीची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर तोलून धरली आहे. घर, प्रपंच आणि शेती अशी कसरत करीत त्या भाजीपाला व केळीचा मळा फुलवित आहेत. व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहाता ग्राहकांचे संपर्कजाळे तयार करून त्यांनी थेट विक्री व्यवस्था तयार केली आहे.   नाशिक-मखमलाबाद येथील शिसोदे कुटुंबीयांची बोलठाण (ता. नांदगाव) येथे १६ एकर शेती आहे. ती विकसित करून कापूस, मका, बाजरी ही पिके ते घेऊ लागले. कुटुंबातील विजया यांचे पती अशोकराव हे पोलिस खात्यात अधिकारी होते. विजयाताईदेखील काही काळ बँकेत नोकरीला होत्या. मात्र मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी आल्याने त्यांनी नोकरी सोडली. मात्र अभ्यासूवृत्ती कायम होती. शेती, निसर्ग हे त्यांचे आवडीचे विषय. त्यांनी योगा शिक्षक, आयुर्वेद वैद्य व ब्युटीशियन अशी अनेक कामे केली. मुंबईत वास्तव्य होते त्यावेळी हापूस आंबा, गहू, तांदूळ व डाळी तयार करून त्या विक्री करत. पती सेवानिवृत्त झाले त्या दरम्यान मुलगा अजयचा विवाह झाला. शेतीची जबाबदारी शिसोदे यांनी नाशिकजवळील मखमलाबाद येथील मित्राची पडीक असलेली साडेपाच एकर शेती विकसित करण्यास घेतली. त्याची मुख्य जबाबदारी योगीताताईंनी स्नुषा योगिता यांच्या सोबतीने अंगावर घेतली. सन २००८ पासून दोघींचे शेतीतील कष्ट सुरू आहेत. ‘उत्पादनासह थेट विक्री व्यवस्था हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. नाशिकची ओळख द्राक्ष उत्पादक जिल्हा अशी आहे. मात्र येथे केळी लागवडीचा प्रयोग या दोघींनी मागील वर्षी केला आहे. भाजीपाला शेतीवर भर शेतीला सुरुवात केली त्यावेळी अनुभव कमी असल्याने अनेक चढउतार आले. मात्र परिश्रम सुरू ठेवत, प्रयोग करीत त्यांनी सातत्य ठेवले. कोथिंबीर, मेथी, स्वीटकॉर्न, सोयाबीन, भुईमूग अशी विविधता ठेवली. उत्पादन घेतल्यानंतर बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापारी त्याला योग्य दर देत नसल्याचे व कष्टांचे चीज होत नसल्याचे लक्षात येऊ लागले. मग स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. आज मुख्य भर त्यावर असतो. दोन महिला व एक पुरुष कामगार अशा मनुष्यबळाच्या जोरावर शेतीतील वाटचाल सुरू आहे. शेतीची वैशिष्ट्ये

  • साडेपाच एकरांसाठी ५० फूट खोलीची विहीर व बोअरवेल आहे. मात्र पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने केळी व भाजीपाला पिकांत ठिबक करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर.
  • बहुपीक पद्धतीचा अवलंब व पीक फेरपालट
  • जैविक खतांच्या वापरावर भर. रासायनिक अवशेषमुक्त शेतमाल निर्मितीवर भर
  • विक्रीपूर्व हाताळणी व प्रतवारीला प्राधान्य
  • उत्पादन खर्च, उत्पन्नाच्या नोंदीच्या अचूक ताळेबंद
  • केळी लागवड : मागील वर्षी चार एकरांत केळीची लागवड केली. या भागात केळीचा प्रयोग कशा प्रकारे यशस्वी होईल याबाबत कुटुंब उत्सुक होते. चालू वर्षी जानेवारीपासून विक्रीला सुरुवात झाली. केळीची थेट विक्री करणे आव्हान होते. यासाठी योगिता यांनी शहरातील केळी वेफर्स उत्पादकांना भेटून कच्च्या केळीच्या ऑर्डर्स मिळवल्या. उभारलेली विक्री व्यवस्था पेरणीपासून ते काढणी, हाताळणी, प्रतवारी त्याचबरोबर स्वतः विक्री करून सासू-सून अशा दोघींनी शेतीचे अर्थकारण सुधारले आहे. परिसरातील ओझर मिग, पंचवटी, आकाशवाणी, गंगापूर रोड, काठे गल्ली, बोधलेनगर या भागात थेट विक्रीला प्राधान्य दिले. अलीकडे किरकोळ भाजी विक्रेत्यांना योगिता स्वतः पुरवठा करतात. मखमलाबाद- गिरणारे रस्त्यावर शेती असल्याने तेथेच ‘हरितपाने रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला व फळे विक्री केंद्र उभारले आहे. ग्राहकांकडून त्यास चांगली पसंती आहे. केळीची सध्या दररोज एक क्विंटलपर्यंत काढणी होते. घडांचे वजन १५ ते २२ किलोपर्यंत आहे. दररोज कच्च्या केळीची १५ रुपये प्रति किलोप्रमाणे ५० किलोपर्यंत तर पिकवलेल्या केळींची ३० रुपये प्रति डझनप्रमाणे ४० ते ५० डझनांपर्यंत विक्री होते. केळ्यांव्यतिरिक्त कांदापात, द्राक्षे , बेदाणे, शेंगदाणे, दगडी भरडकीवर भरडून तयार केलेली मूगडाळही येथे विक्रीसाठी उपलब्ध असते. दहा रुपये प्रति जुडी दराने दिवसभरात ७० ते ८० कांदापात जुड्यांची विक्री किरकोळ विक्रेत्यांना होते. थेट विक्री करताना कसलाही संकोच वाटत नाही. उलट कष्ट केल्याचे समाधान मिळते असे योगिता अभिमानाने सांगतात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर शेतमाल विक्रीसाठी व्हॉट्सॲपसारख्या माध्यमाचा वापर करून ग्राहकांचे नेटवर्क उभारले आहे. शिवाय ग्राहक घरी येऊनही मालाची खरेदी करतात. व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी ‘हरितपाने ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली असून विजयाताई त्याच्या संचालिका आहेत. या वयातही शिकण्याची उमेद त्यांची कायम आहे. सरकारच्या ॲग्री क्लिनिक व ॲग्री बिझनेस अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला आहे. सातत्याने नवीन प्रयोग तंत्रज्ञान समजून घेण्याबरोबर ॲग्रोवनच्या माध्यमातून नवीन माहिती त्या मिळवत असतात. योगिता यांचेही ‘बीकॉम डीटीएल’पर्यंत शिक्षण झाले असून संभाषण व विक्रीतील कौशल्य महत्त्वाचे ठरले आहे. संपर्क- योगिता शिसोदे- ९६७३०९१६९०v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com