अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम, दुग्ध व्यवसायात आघाडी 

माझी साडेतीन एकर शेती असून, त्यापैकी तीन एकर तूती आहे. मला प्रति २०० अंडीपुंजांपासून सुमारे दोन क्‍विंटल चार किलोपर्यंत कोष उत्पादन मिळाले आहे. यापूर्वी ऊस, सोयाबीन, कापूस यासारखी पिके घेत होते. मात्र रेशीम शेती अधिक फायदेशीर ठरल्याने त्यात सातत्य ठेवले आहे. - रोहिदास तायडे, अंबोडा
सुरेश पतंगराव यांचे रेशीम शेड
सुरेश पतंगराव यांचे रेशीम शेड

आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीने नजीकच्या काळात सावरले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य लाभले आहे. परिणामी तुती लागवड क्षेत्रदेखील वाढीस लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आंबोडा (ता. महागाव) हे गावदेखील रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून नावारूपास आले आहे. सोबतच अधरपूस प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेवर व्यावसायिक पिके व दुग्धोत्पादनाही गावाने आघाडी घेतली आहे.    आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची तशी पूर्वीची ओळख होती. आता चित्र बदलू लागले आहे. जिल्ह्यातील शेतकरी काळाचा वेध घेत अधिक ज्ञान घेत पिके व पूरक उद्योगात विविध प्रयोग करताना दिसू लागले आहेत. महागाव तालुक्यातील आंबोडा गावानेही शेती व पूरक उद्योगातून विकासाची कात टाकली आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, हळद यांसारखी पिके गावात घेतली जायची.  रेशीम उद्योगाची सुरवात  शेतीला आर्थिक जोड म्हणून २०१३-१४ च्या दरम्यान आंबोडात रेशीम शेती सुरू झाली. गावातील सुरेश पतंगराव यांनी आपली सासूरवाडी घोडवा, (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे रेशीम शेती पाहिली. त्यावरून ते प्रेरित झाले. त्याचे अर्थकारण पसंतीस उतरल्यानंतर आपल्या शेतातही हा प्रयोग करण्याचे ठरवले. गावातील आपल्या सहकाऱ्यांशीदेखील या शेतीबाबत चर्चा केली. या पाचही जणांनी मग यवतमाळ येथील रेशीम कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील तांत्रिक सहायक मुकुंद नरवाडेय यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिवाय तुती बेणे उपलब्ध करून दिले. सुरेश यांच्यासह रोहिदास तायडे, गजानन दातकर, मनीष हिंगाडे, लक्ष्मण हातमोडे, रवीकांत पतंगराव यांनी प्रत्येकी एक एकरावर तुती लागवडीचा प्रारंभ केला. गावात पूरक व्यवसायाला चालना मिळाली. रेशीम उत्पादकांना ही शेती किफायतशीर वाटू लागली आहे याची कल्पना येऊ लागल्यानंतर गावातील अन्य शेतकरीही त्याकडे वळू लागले. आज गावातील रेशीम उत्पादकांची संख्या २४ वर पोचली आहे. सुरवातीच्या शेतकऱ्यांपैकी मनीष यांच्याकडील तुती लागवड सहा एकरांवर, रोहिदास तीन एकर तर रवीकांत यांची तुती लागवड साडेपाच एकरांवर पोचली आहे.  अशी विकसित झाली रेशीम शेती प्रति रेशीम शेडसाठी अडीच ते तीन लाख रुपये किमान खर्च होतो. रेशीम विभागाकडून अंडीपुंजांचा पुरवठा होतो. प्रति अंडीपुजांपासून सरासरी ८० ते ८५ टक्‍के सरासरी उत्पादकता मिळते. महिन्याला गावाची एकूण अंडीपुंजांची मागणी साडेतीन हजारांवर आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत एकरी दोन लाख ९० हजार ६०० रुपयांचे अनुदान रेशीम संचालनालयाकडून तीन वर्षांच्या कालावधीत दिले जाते.  रामनगरची बाजारपेठ  शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगरची बाजारपेठ उपलब्ध आहे. रेशीम कोषांना प्रतिकिलो २५० रुपयांपासून ते त्यापुढील दर मिळतात. सद्यःस्थितीत दर घसरल्याने तुती लागवड क्षेत्रवाढ मर्यादित झाली आहे. नव्याने लागवड वाढवावी की नको या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे हमीभाव किंवा अनुदानाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंबोडातील रेशीम उत्पादकांची आहे. कर्नाटक राज्यात किलोमागे ५० रुपये बोनस रक्कम दिली जाते. या पर्यायाचादेखील विचार आपल्या राज्यातील शासनाकडून व्हावा, अशी अपेक्षा हे शेतकरी व्यक्‍त करतात.  दुग्धोत्पादनातही आघाडी  अंबोडाची लोकसंख्या पाच हजारांवर आहे. गावातील बहुतांश शेतरकऱ्यांकडे गायी, म्हशी आदी दुधाळ जनावरे आहेत. त्यांची संख्या साडेतीन ते चार हजारांवर असावी. कोणत्याही योजनेपेक्षा स्वखर्चातूनच त्यांची खरेदी झालेली आहे. त्यावरून पूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा असलेला कल दिसून येतो. गावात दोन हजार लिटरहून अधिक दररोजचे दूध संकलन होते. दोन कंपन्या वा संस्थांना दुधाचा पुरवठा होतो. त्यासाठी संकलन केंद्र गावातच आहे.  केळी, ऊस आणि भाजीपाला  अधरपूस प्रकल्पाचे पाणी गावाला कालव्याच्या माध्यमातनू मिळते. बहुतांश बारमाही सिंचन सुविधा झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस, केळी, कापूस, भाजीपाला आदी पिकांवर भर दिल्याचे गावातील अंबादास तायडे यांनी सांगितले. गावात भाजीपाला क्षेत्र वाढत असल्याने महेश व प्रशांत तायडे या कृषी पदविका धारक युवकांनी भाजीपाला रोपवाटिका उभारली आहे.  भाजीपाला शेतीत वेगळेपण  दीपकराव तायडे यांची आठ एकर शेती आहे. त्यात टोमॅटो, वांगी, शेवगा, ऊस यासारखी पिके ते घेतात. महागाव तालुक्‍यात हळद लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या शेतकऱ्यांसाठी बॉईलिंग, पॉलिश आदी प्रक्रिया सुविधा तायडे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता बॉलयरची खरेदी अर्धापूर (नांदेड) येथून दीड लाख रुपयांमध्ये केली. पॉलिशरची किंमत एक लाख २० हजार रुपये आहे. ‘बॉयलिंग’साठी ५० रुपये तर ‘पॉलीशिंग’साठी प्रति क्विंटल १५० रुपये भाडेशुल्क आकारले जाते.  शेतकऱ्यांचे अनुभव 

  • मला रेशीम शेतीतून प्रतिबॅच चांगला नफा मिळतो. भंडारा जिल्ह्यातील एका रेशीम प्रक्रिया उद्योजकाने 
  • गावातील कोष खरेदी केली आहे. सुमारे साडेपंधरा क्‍विंटल कोष त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. 
  • त्यासाठी किलोला २९० ते ३१९ रुपये दर कोषांच्या दर्जानुसार देण्यात आला. खरेदीनंतर गावातच धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना चुकारे करण्यात आले. त्यामुळे बांधावरच शेतकऱ्यांना बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध झाला. रामनगर येथे कोष घेऊन जाण्यासाठी होणारा खर्च यामुळे वाचला. 
  • - रवीकांत पतंगराव संपर्क- ९७६५७८०५७२    किफायतशीर वाटल्याने रेशीम शेतीत काही वर्षांपासून सातत्य ठेवले आहे.  -सुरेश पतंगराव संपर्क - ८८८८०१९९६८  -रणजीत तायडे संपर्क- ९९२१८३८७०७  माझी पाच एकर शेती आहे. रेशीम शेतीचा पर्याय चांगला वाटल्यानंतर त्याचाच विकास केला आहे.  - गजानन दातकर 

    माझी दहा एकर शेती आहे. या वर्षी उसाची लागवड केली आहे. चार एकरांवरुतूती तर दीड एकरावर चारा लागवड आहे. संकरित तसेच पाच देशी गायी व चार मुऱ्हा म्हशी आहेत. मुक्‍त गोठ्याची उभारणी केली आहे. दोन्ही वेळचे दूध संकलन सुमारे ६० लिटर होते. रोजच्या गरजांची पूर्तता दुग्ध व्यवसायातून होत असल्याने ‘एटीएम’प्रमाणेच तो ठरला आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी याच कारणामुळे या व्यवसायावर भर दिला आहे.  - अंबादास तायडे संपर्क - ९०२११२८२९२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com