एकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम सुफलाम 

गावात विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. सध्या सार्वजनिक धोबीघाटचे बांधकाम सुरू आहे. लवकरच तीन ठिकाणी दोन हजार लिटर क्षमतेचे सौरऊर्जेवर पाणी गरम करण्याचे प्रकल्प उभे करणार आहोत. ग्रामस्थांना मोफत गरम पाणी देण्याचा मानस आहे. -रुक्मिणी संपत्ते सरपंच, मावलगाव
भाजीपाला उत्पादनातून दुष्काळी स्थितीतही दररोज शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येत आहे.
भाजीपाला उत्पादनातून दुष्काळी स्थितीतही दररोज शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येत आहे.

लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) गावाने लोकसहभागातून गावाचा कायापालट करण्यास सुरूवात केली आहे. विविध योजना व पर्यावरण पूरक उपक्रम राबवीत गाव सुजलाम सुफलाम बनवले आहे. गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनात ठसा उमठवला आहे. समस्यांचा डोंगर समोर असताना एकत्र येऊन ग्रामविकासाचा वसा हाती घेतल्यास काय घडू शकते याचे प्रत्यंतरच गावात दिसून येते.  राज्यातील अनेक गावे अलीकडील काळात आपला चेहरामोहरा बदलताना दिसताहेत. अनेकांनी विविध उपक्रमांद्वारे राज्यात आपली ओळख तयार केली आहे. यात शासकीय संस्थांबरोबरच ग्रामस्थांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा राहिला आहे. लातूर जिल्ह्यात मावलगाव हे अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावानेदेखील केवळ उद्दिष्टे वा ध्येये कागदावर न ठेवता ती प्रत्यक्षात आणण्यास सुरवात केली आहे.  स्वच्छतेपासून सुरवात  मावलगावाने ग्रामस्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले. ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवण्यासाठी दोन ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा घेण्यात येऊन स्वच्छता समिती स्थापन केली. तेव्हापासून आजतागायत समिती व ग्रामस्थ एकजुटीने विकासासाठी झटत आहेत. दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवली जाते. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी अहमदपूर पंचायत समितीचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.  प्लॅस्टिकबंदी ठराव  सरकारच्या प्लॅस्टिकबंदी निर्णयाला प्रतिसाद देत मावलगाव ग्रामपंचायतीने प्लॅस्टिकबंदीचा ठराव घेतला. पर्याय म्हणून तातडीने कापडी पिशव्या बनवून गावात वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यास कापडी पिशवी भेट देऊन प्लॅस्टिकचा वापर टाळा असा संदेशही देण्यात येतो.  परसबागेत सेंद्रिय भाजीपाला  जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत व शिक्षकांच्या पुढाकाराने भाजीपाला पिकांची परसबाग बनवण्यात आली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यावर भर दिला जातो. शाळेतील मध्यान्य भोजनात त्याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांना भाजीपाला लागवडीचे धडे दिले जातात.  वृक्ष लागवड आणि संवर्धन  मावलगावचे ग्रामस्थ पर्यावरण संतुलनासाठी केवळ वृक्ष लागवड करून थांबले नाहीत. त्यांनी जबाबदारीने वृक्षसंवर्धनही केले आहे. गावातील प्रत्येक घरासमोर, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच परसबागेत सुमारे २५०० झाडांची लागवड व संवर्धन होत आहे. यात आंबा, चिकू, जांभूळ, लिंबू, नारळ आदींचा समावेश आहे. प्रत्येक कुटुंबाकडे संवर्धनाची जबाबदारी आहे. त्यामुळेच गाव हिरवाईने नटलेले दिसते.  करवसुलीचा आदर्श  जे ग्रामस्थ १०० टक्के करभरणा करतील त्यांना मोफत दळण देण्याची संकल्पना २०१५ मध्ये ग्रामपंचायतीने राबवली. ग्रामस्थांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत करवसुलीचे महत्त्वही पटवून दिले. परिणामी १०० टक्के करवसुलीचा पल्ला गाठण्यात यश आले.  या निधीचा उपयोग ग्रामविकासाच्या विविध योजनांवर करण्यात येतो.  लेक वाचविण्यासाठी कंबर कसली  जानेवारी २०१७ मध्ये ‘लेक वाचवा’ अभियान यशस्वी करण्यास गावाने सुरवात केली. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावावर बँकेत दोन हजार रुपयांचे ‘एफडी’ खाते काढण्यात येते. ही रक्कम मुदतपूर्व मोडली जाणार नाही याची काळजी घेण्यात येते. आजपर्यंत १४ मुलींच्या नावे ‘एफडी’ खाते काढण्यात आले आहे.  ई-लर्निंग सुविधा  जिल्हा परिषद शाळेने ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे. लोकसहभागातून त्यासाठी ‘प्रोजेक्टर’देखील घेतला. औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ यांनी तीन संगणक भेट दिले. यातूनच या ठिकाणचा संगणक कक्ष सुसज्ज झाला आहे.  गावावर कॅमेऱ्याची नजर  गाव व्यसनमुक्त झाले व तंटे मिटले तर विकास वेगाने साधला जाऊ शकतो हे ओळखून गावात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे व्यसनाधीनतेला आळा बसला आहेच. शिवाय रस्त्यांवर कचरा टाकल्यासही समजावून सांगण्यात येते.  ‘भूमिपुत्र’ ग्रुप  मूळ गावातील मात्र नोकरी वा व्यवसायानिमित्त बाहेरगावचे व स्थानिक ग्रामस्थांचा व्हॉट्सॲपवर ‘भूमिपुत्र’ ग्रुप तयार केला आहे. त्यातून गावाचा विकास करण्यासाठी विचारविनिमय केला जातो. या माध्यमातून वृक्ष लागवड व ई-लर्निंगसाठी आर्थिक मदत मिळाली आहे.  महिलाराज  २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मावलगाववर महिलाराज आले आहे. येथील सरपंच, उपसरपंच, तलाठी व कृषी सहायक ही गावविकासाची महत्त्वाची पदे महिलांच्या हाती आहेत. ग्रामस्थांचे व अधिकाऱ्यांना त्यांना पूर्ण सहकार्य मिळते.  एक गाव एक स्मशानभूमी  गावात जातीय व धार्मिक सलोखा राहावा यासाठी ग्रामपंचायतीने एक गाव एक स्मशानभूमी संकल्पना राबवली. जागेचे बांधकाम केले. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा फुलझाडांची लागवड केली असून स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले आहे.  भाजीपाल्याचे गाव  मावलगावचे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. पारंपरिक पिकांसोबत ते भाजीपाला अर्धा ते तीन एकर क्षेत्रावर घेतात. बाजारात जे विकते त्याचीच लागवड करण्यावर भर असल्याने दररोज ताजा पैसा हाती येत आहे. अहमदपूर, शिरूर ताजबंद, हळी, चाकूर व किनगाव येथील आठवडी बाजारात थेट विक्री करतात. नांदेड, वर्धा, नागपूर, हिंगणघाट येथील व्यापारी जागेवर खरेदी करतात. दिल्ली, मध्य प्रदेश येथेही विक्रीचे नियोजन होते.  सेंद्रिय शेतीवर भर  रासायनिक निविष्ठांवर होणारा खर्च टाळण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. मावलगाव हे देशी गोवंश संगोपनासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या घरी देशी गोवंश पाहावयास मिळतो. त्यामुळे शेणखत, गांडूळखताचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ग्रामपंचायतीमार्फत त्यासंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात येते.  मावलगाव दृष्टिक्षेपात 

  • लोकसंख्या – १८०० 
  • एकूण भौगोलिक क्षेत्र – ५५६ हेक्टर 
  • पेरणी योग्य क्षेत्र – ४७९ हेक्टर 
  • अल्पभूधारक शेतकरी संख्या – ४३३ 
  • भाजीपाला लागवड क्षेत्र – ७० एकर 
  • बागायती क्षेत्र – ४२ हेक्टर 
  • मावलगाव ठळक बाबी 

  • संपूर्ण गाव हागणदारीमुक्त. 
  • बंदिस्त गटारी 
  • प्रत्येक घराशेजारी शोषखड्डा. 
  • दोन घरांशेजारी कचराकुंडी. 
  • प्रत्येक घरावर महिलांचे नाव. ८ अ महिलांच्या नावे. 
  • चाऱ्याची बचत करण्यासाठी गावात एक सार्वजनिक कडबाकुट्टी यंत्र. 
  • अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण 
  • रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड व बसण्याची बेंच 
  • 'आरओ’ प्रणालीद्वारे माफक दारात शुद्ध पाण्याचा पुरवठा. 
  • सुसज्ज सार्वजनिक वाचनालय. 
  • मिळालेले पुरस्कार

  • २०१७-१८ - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता (तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर तृतीय) 
  • २०१८-१९ - स्मार्ट व्हिलेज तालुका स्तरावर प्रथम 
  • ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया  आमचे गाव भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही नित्यनियमाने ॲग्रोवन वाचतो. त्यातील यशोगाथा व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग शेतात होतो. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.  -गणपत भदाडे  संपर्क - ७०२०३३३४१४  चार वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या कामांतून गावाचे चित्र पालटले आहे. ॲग्रोवनमध्ये प्रकाशित गावांच्या यशोगाथांची मदत विकास कामे करताना होतो. शाळा ‘स्मार्ट’ बनल्याने शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.  -मल्लिकार्जुन स्वामी  संपर्क - ८२०८७५४५७२  गावात शेती व ग्रामविकास हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ सहकार्याची भूमिका घेऊन विकासाला पुढे नेत आहेत. लोकसहभाग व सामाजिक एकोप्यातून विविध कामे मार्गी लागली आहेत.  -गणपत संपत्ते  संपर्क - ७९७२९०५२६३  गावात विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. सध्या सार्वजनिक धोबीघाटचे बांधकाम सुरू आहे. लवकरच तीन ठिकाणी दोन हजार लिटर क्षमतेचे सौरऊर्जेवर पाणी गरम करण्याचे प्रकल्प उभे करणार आहोत. ग्रामस्थांना मोफत गरम पाणी देण्याचा मानस आहे.  -रुक्मिणी संपत्ते  सरपंच, मावलगाव  संपर्क - ८००७४८१३९३   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com