विकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही पुढे "भागाईवाडी' 

बदलत्या जगानुसार चालण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने आम्ही ‘स्मार्टवर्क’ करतो आहोत. कामांद्वारे वेगळी ओळख निर्माण करायची आहे. ग्रामस्थांचे आम्हाला भक्कम पाठबळआहे हे विसरता येणार नाही. -सौ. कविता घोडके-पाटील, सरपंच, भागाईवाडी, ता. उत्तर सोलापूर
 गावातील प्रत्येक कुटुंबाला दिलेल्या कचरा कुंड्या. स्मार्टग्राम भागाईवाडीचा झालेला सन्मान
गावातील प्रत्येक कुटुंबाला दिलेल्या कचरा कुंड्या. स्मार्टग्राम भागाईवाडीचा झालेला सन्मान

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्टग्राम' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ' मानांकन प्राप्त केले आहे. ग्रामपंचायतीची देखणी इमारत, सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरकॉम टेलिफोन, मोबाईल ॲप, वेबसाईट, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग यंत्र, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली आदी गावाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील .    सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सर्वात छोटे आणि जिल्ह्यातील टोकाचे गाव म्हणून भागाईवाडी ओळखली जाते. काळानुसार पाऊले टाकत ग्रामविकासासाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभाग घेण्याचा गावाचा लौकीक आहे. अर्थात महिला सरपंच सौ. कविता शिवाजी घोडके-पाटील यांचे खंबीर नेतृत्व त्यामागे आहे. उपसरपंच पद्मिनी घोडके, महादेव चौधरी, वैभव घोडके, शकुंतला घोडके, ग्रामसेविका सुवर्णा घोडके आणि ग्रामस्थांचे त्यांना मोठे सहकार्य आहे. सरपंच पदवीधर असून गावाच्या विकासाची चांगली जाण त्यांना आहे.  अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायतीस "आयएसओ'  मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा, यासाठी अंगणवाडीत सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेचा परिसर नयनरम्य बनवताना बालकांना शिक्षणाची गोडी लागेल असे वातावरण तयार केले. अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत या तीनही विभागांना आयएसओ मानांकन मिळाले. एकाच गावात एकाचवेळी या पद्धतीने असे मानांकन मिळालेले जिल्ह्यातील भागाईवाडी हे पहिलेच गाव ठरले आहे.  पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्तीची पुरेशी सोय  पाणीपुरवठ्यासाठी नळपाणी योजना आहे. तीन मुगलकालीन आड आहेत. तीन विंधनविहिरी घेतल्या आहेत. चार ठिकाणी हायमास्ट, ४० ठिकाणी पथदिवे, १० ठिकाणी सौरदिवे आहेत. स्वच्छतेबाबतीतही गाव पहिल्यापासूनच आग्रही राहिले आहे. गावात तीन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. वैयक्तिक स्वच्छतागृहेही उभारली आहेत. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव झाले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा तालुकास्तरीय पुरस्कार गावाने मिळवला आहे. गटारमुक्त आणि धूरमुक्त गाव ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवली आहे.  प्रत्येक कुटुंबाला "डस्टबीन'  स्वच्छता अभियानातील सहभागामुळे गावाची मानसिकता चांगलीच बदलली. त्याही पुढे जाऊन ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रत्येक कुटुंबाला कचरकुंड्यांचे (डस्टबीन) वाटप केले आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले आहे.  जलसंधारण झाले, पाण्याचे काम झाले  जलयुक्त शिवारसह पाणी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली. माथ्यावर "सीसीटी'ची कामे झाली. सलग दोन वर्षे गावाने त्यात सहभाग घेतला. गावाच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्याचेही लोकसहभागातून गाळ काढणे, खोली, सरळीकरण करण्यात आले. आता गावच्या पाणी पातळीची उंची वाढली आहे. पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध अभिनेते अमीर खान आणि पत्नी किरण राव यांनीही गावाला भेट देऊन गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले. सन २०१७ मध्ये तालुकास्तरावरील तृतीय क्रमांक गावाने मिळवला. पाणी फाउंडेशन संस्थेने ही उपक्रमशीलता पाहून गावात प्रशिक्षण केंद्र उभारले. गेल्या दोन वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब भागातील तरुणांना प्रशिक्षणही देण्यात आले.‘ वॉटर कप’ स्पर्धेत संस्थेतर्फे तृतीय क्रमांकाद्वारे गौरवण्यात आले आहे.   मोबाईल ॲप, वेबसाईट  ग्रामपंचायतीची सुसज्ज, सर्व सोई-सुविधांनीयुक्त इमारत व वातानुकुलित सभागृह आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे व इंटरकॉम टेलिफोनची सोय आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र, बायोमॅट्रिक प्रणाली अशी सुविधा दिली आहे. गावाची ओळख सांगणारे स्वतंत्र "स्मार्ट भागाईवाडी' मोबाईल ॲप आणि "डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.स्मार्टभागाईवाडी.कॉम'नावाने वेबसाईटही आहे.  नावीन्यपूर्ण उपक्रमशीलता  गावात सण, समारंभ, महात्मे, थोर व्यक्ती यांच्या जयंती, पुण्यतिथी यांच्या निमित्ताने लोकसहभाग वाढावा, संवाद राहावा यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यात समता पंधरवडा, गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिर, आषाढी वारीसाठी विद्यार्थी दिंडी सोहळा, मकरसंक्रातीनिमित्त हळदीकुंकू असे उपक्रम घेऊन प्रबोधन करण्यात येते. वृक्ष लागवडीसाठीही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांची शासकीय कामे होण्यासाठी शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्न, रहिवासी तसेच जातीचा दाखला यासारख्या कामांसाठी समाधान गावभेट योजनेतून शिबिर घेण्यात आले. त्यातून अनेक गावकऱ्यांच्या शासकीय कामांसंबंधीच्या अडचणी कमी झाल्या. भागाईवाडी ते मुंगशी आणि भागाईवाडी ते वाळूज हे बंद असलेले शिवरस्ते ग्रामस्थांच्या सहमतीने मोकळे करण्यात आले.  विविध पुरस्कारांवर मोहोर  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित ग्राम, स्मार्टग्राम, गटार व धूरमुक्त गाव यासारख्या विविध शासकीय पुरस्कारांसह संस्था आणि संघटनांचे पुरस्कारही गावाने मिळवले आहेत. गेल्या तींन वर्षात विविध पुरस्कारांच्या रूपाने जवळपास २२ लाख रुपयांची रक्कम संकलित झाली आहे. गावाला शासकीय योजनांशिवाय गावातील कामासाठी वर्गणी, देणगी मागण्याची वेळ आली नाही. गावकऱ्यांचा निर्धारच उपयोगी आला. गावातील सिमेंट रस्ते, दिवाबत्ती, गटार, पाणी पुरवठा यासारख्या सुविधांवर गेल्या तीन वर्षांत जवळपास एक कोटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला.  आमदार आदर्श गाव योजनेतही समावेश झाला आहे.  भागाईवाडी- ठळक बाबी 

  • लोकसंख्या - ७७८ 
  • क्षेत्रफळ- ३.८८ चौरस किलोमीटर 
  • महिलांची संख्या - ३८२, पुरुषांची संख्या- ३९६ 
  • महिलांसाठी आवश्‍यक सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन 
  • तंटामुक्त, पर्यावरण संतुलित, गटार आणि धूरमुक्त गाव 
  •  संपर्क - सौ. कविता घोडके-पाटील - ९९२२००८८५५, ९९२२३३८५५५  सरपंच vv

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com