फेरपालटातून ऊस, केळी, आल्याची यशस्वी शेती

विनोद जाधव यांनी आले पिकात आपला हातखंडा तयार केला आहे.
विनोद जाधव यांनी आले पिकात आपला हातखंडा तयार केला आहे.

सांगली जिल्ह्यातील आळसंद येथील युवा शेतकरी विनोद प्रताप जाधव यांनी ऊस, केळी व आले या तीन मुख्य पिकांवर भर देत या पिकात हातखंडा तयार केला आहे. व्यावसायिक शेतीपद्धतीद्वारे उत्पादन व गुणवत्ता वाढवताना मातीची सुपीकताही टिकवण्याचाही प्रयत्न केला आहे. दरवर्षी विकत आणून शेणखताचा वापर, सेंद्रिय घटक, हिरवळीची खते आदींचा वापर करीत उसाच्या पट्ट्यात आले शेतीचे वेगळेपणही त्यांनी जोपासले आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. अवर्षणग्रस्त स्थितीत अत्यंत कमी पाण्यात इथल्या शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा फुलवण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. याच तालुक्यातील आळसंद गावात विनोद जाधव हे युवा शेतकरी राहतात. किल्ल्याच्या आकाराचे प्रवेशद्वारच गावचे वेगळेपण सिद्ध करते. सन २००८ च्या आधी हा परिसर तसा दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. पावसाच्या भरवशावर येथील शेती केली जायची. सरकारी योजनांचे पाणी दाखल झाल्यानंतर या भागाचा सिंचनाच्या अंगाने विकास सुरू झाला. जाधव यांची शेती विनोद यांची १६ एकर जमीन आहे. पूर्वी द्राक्षबाग होती. सन २००३ च्या दुष्काळात बाग काढून टाकावी लागली. दहा लाख रुपयांचे बँकेचे कर्ज त्या वेळी डोक्यावर होते. वडिलांचे निधन झाले त्या वेळी विनोद महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यादरम्यानच त्यांच्याकडे शेतीची जबाबदारी आली. त्या वेळी पारंपरिक शेतीकडून सुधारित शेतीकडे वळण्याचे त्यांनी ठरवले. त्या वेळी या परिसरात असणाऱ्या क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या पथदर्शक योजनांचा चांगला फायदा झाला. कारण यासंबंधीच्या योजनेतून बिनव्याजी रक्कम कारखाना देऊ करीत होता. त्याचबरोबर अभ्यास व व्यवस्थापन यांची जोड देत विनोद यांनी एकरी ऊस उत्पादन वाढवण्यास सुरवात केली. आल्याची शेती विनोद कामानिमित्त सातारा जिल्ह्यातील खटाव परिसरात आपल्या पाहुण्यांकडे गेले असता तेथे आले उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा वाचावयास मिळाली. आपणही हे पीक करून पाहावे असे त्यांना वाटू लागले. कोरेगाव परिसरातून मजूर बोलावून पिकाचे नियोजन सुरू केले. त्या वेळी गावातील लोक कुतूहलाने आले शेती बघायला यायचे. याचे कारण या भागात हे पीकच नवे होते. पहिल्या वर्षी एकरी १५ टन उत्पादन मिळाले, दर अत्यंत कमी मिळाला. निराशा झाली; पण हिंमत न हरता विनोद यांनी अभ्यास वाढवला. व्यवस्थापन चोख ठेवले. कष्ट कुठे कमी पडू दिले नाहीत. त्याचे फळ मिळू लागले. त्यातच भर म्हणून की काय, विक्री व्यवस्थेची पुरेशी माहिती नसल्याने व्यापाऱ्यांकडून साडेनऊ लाखांची फसवणूक झाली. त्यातूही न डगमगता आले प्रयोग सुरूच ठेवला. आज या पिकाचे एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. पूर्वी झालेल्या चुका टाळून व्यवस्थापनात सातत्य जोपासले. विनोद यांनी पाच एकर शेती खंडाने कसण्यास घेतली आहे. यामध्ये उत्पन्न समप्रमाणात वाटून घेणे असा करार केला आहे. ऊस व केळी व फेरपालट

  • उसाच्या एकरी ७० ते कमाल १०० टन उत्पादनापर्यंत आपण पोचलो असल्याचे विनोद सांगतात.
  • साडेचार फूट ते सहा फुटांपर्यंतची सरी ते ठेवतात. केळीचीही शेती काही वर्षांपासून जोपासली आहे.
  • उतिसंवर्धित रोपांचे एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. ऊस, केळी व आले यांची फेरपालट ते करतात.
  • त्यामुळेच उत्पादन चांगले मिळते. मातीची सुपीकता टिकून राहते असे ते सांगतात.
  • जागेवर मार्केट आले व केळी यांची जागेवरच स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी होते, त्यामुळे बाजारात जाऊन विक्री करण्याची गरज भासत नाही. केळीला किलोला १० रुपये तर आल्याला सध्या ६० हजार रुपये प्रतिटन दर मिळत असल्याचे विनोद यांनी सांगितले. विनोद यांच्या व्यवस्थापनातील मुख्य बाबी

  • उन्हाळ्यात चांगली मशागत करणे
  • दरवर्षी शेणखत खरेदी करून त्याचा वापर. सुमारे दीड लाख रुपयांचे शेणखत घ्यावे लागते.
  • आल्याची झिगझॅग पद्धतीने लागवड
  • दरवर्षी तीन ते चार एकरांत धैंचा, ताग यांची लागवड, त्यांचा हिरवळीचे खत म्हणून वापर.
  • करंज, निंबोळी पेंड आदींचाही वापर
  • विनोद सांगतात, की आले पिकात सतत जागरूक राहून काम करावे लागते. केवळ रासायनिक खते देऊन उत्पादनात म्हणावी तशी वाढ होत नाही. रासायनिक खतांचे प्रमाण कमी करून त्यावरील ३० ते ३५ टक्के खर्च कमी केला. संतुलित खत वापरामुळे आले पिकाचा तजेलदारपणा वाढतो, कंद चांगले पोसतात, गुणवत्ता चांगली राहते असा अनुभव.
  • आले पिकाचा उसाला चांगला फायदा होतो.
  • आले पिकात उत्पादन खर्च एकरी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत होतो.
  • कारखान्याच्यावतीने माती परीक्षण करण्यावर भर
  • संपर्क- विनोद जाधव - ९९६०१३२४९५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com