बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती, मध्य प्रदेशातील युवकाचे आदर्श शेती मॉडेल

मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश चौरसिया या युवकाने मानव व मातीचे आरोग्य संवर्धन करण्याच्या हेतूने रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीची म्हणजे नैसर्गिक शेती विकसित केली आहे. चार ते पाच मजल्यांची पिके, देशी बियाणे बँक, सजीव माती, जलसंवर्धन आणि थेट विक्री व्यवस्था असे हे मॉडेल समस्त शेतकरी व तज्ज्ञांसाठी आदर्श, अनुकरणीय ठरावे असे आहे.
आकाश यांची बहुमजली नैसर्गिक शेती.
आकाश यांची बहुमजली नैसर्गिक शेती.

मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश चौरसिया या युवकाने मानव व मातीचे आरोग्य संवर्धन करण्याच्या हेतूने रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीची म्हणजे नैसर्गिक शेती विकसित केली आहे. चार ते पाच मजल्यांची पिके, देशी बियाणे बँक, सजीव माती, जलसंवर्धन आणि थेट विक्री व्यवस्था असे हे मॉडेल समस्त शेतकरी व तज्ज्ञांसाठी आदर्श, अनुकरणीय ठरावे असे आहे.   मध्य प्रदेश राज्यातील तिली (जि. सागर) येथे कोमल चौरसिया यांची एकूण १६ एकर शेती आहे. त्यांचा मुलगा आकाश सध्या या संपूर्ण शेतीची जबाबदारी तरुण वयात समर्थपणे सांभाळतो आहे. आकाश सांगतात की अकरावी, बारावीचे शिक्षण सुरू होते. त्या वेळी कुटुंबीयांची मानसिकता इतरांप्रमाणे आपल्या मुलाने इंजिनिअर, डॉक्टर व्हावे अशीच होती. त्यासंदर्भाने प्रवेशासाठी हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. मलाही डॉक्टर व्हावे असे वाटत होते. त्याचवेळी घरची शेतीही आकर्षित करीत होती. ‘जैसे खाओगे तैसा होगा तन, जैसा होगा तन वैसा होगा मन’ हा विचार डोक्यात पक्का बसला होता. मानवी आरोग्य सुधारायचे तर अन्न पोषक हवे. जुलै २०११ च्या दरम्यान रासायनिक विषमुक्त अन्न उत्पादन संकल्पनेवर काम सुरू केले. शिवाय पर्यावरण सुरक्षितताही महत्त्वाची होती. नव्या पिढीतील युवकांची मानसिकतादेखील शेतीत काम करण्याची नाही. सर्व विचार करून समृद्ध शेतकरी म्हणून आकाश यांची वाटचाल सुरू झाली. दहा वर्षांपासून संपूर्ण क्षेत्र शंभर टक्के सेंद्रिय वा नैसर्गिक शेतीखाली आले आहे. वातावरणातील बदलानुरूप शेती आकाश कसत असलेले क्षेत्र स्वतःचे व करारावरील असे मिळून आहे. हवामान बदल, शेतीत रसायनांचे प्रदूषण ही आव्हाने सध्या शेतीसमोर आहे. त्यांचा सामना कसा करता येईल व त्यावर पर्याय कसा शोधता येईल याचा विचार आकाश करीत होते. अधिक अभ्यास केल्यानंतर सन २०१४ या सुमारास बहुमजल्यांची शेती (मल्टी लेअर फार्मिंग) या रूपाने त्यावर उत्तर मिळाले. यात एकाचवेळी एका एकरांत एकाच हंगामात तीन, चार ते पाचपर्यंत विविध पिके घेतली जातात. अर्थात, कोणती पिके निवडली आहेत यावर त्यांची संख्या अवलंबून राहते. पाचमजली शेती असेल तर जमिनीच्या खाली आले किंवा हळद असे कंदवर्गीय, तर सहा फुटाचा मंडप उभारून त्यावर कारले, पडवळ यांसारखे वेलवर्गीय पीक, पालेभाज्या प्रकारात पालक, कोथिंबिरीसारखे पीक घेता येते. अशा पिकांमुळे तणांना अटकाव करता येतो. बाष्पीभवन रोखता येते. चौथ्या प्रकारात काकडी, भोपळा अशी पिके घेता येतात तर पाचव्या प्रकारात देशी पपईसारखे फळवर्गीय पीक घेता येते. मिरची, टोमॅटो आदी पिके निवडल्यास पाच मजली ऐवजी चार किंवा तीन मजली प्रकार करावा लागतो. किडींना रोखण्यासाठी शेताच्या चारही बाजूने साडीचे कुंपण घालण्यात येते. मंडपासाठी शेतातील बांबू वा लाकडाचा वापर केला आहे. शेताच्या बांधावरील गवत किंवा थोडेफार तण वाळवून त्याचा शेड म्हणून वापर होतो. बहुमजली पद्धतीचे फायदे

  • आकाश सांगताना म्हणतात, की या पद्धतीत कमी क्षेत्रावर म्हणजे एका एकरात चार ते पाच पिके एका हंगामात घेणे शक्य होते. उदा. आले, हळद, टोमॅटो, कांदा, वांगी, मिरची, कारली, तोंडली
  • सेंद्रिय शेतीत तणनियंत्रण ही मोठी समस्या असते. या पद्धतीत ९० टक्क्यांपर्यंत तणांचे नियंत्रण होऊ शकते.
  • पाण्यामध्ये ६० ते ७० टक्के बचत शक्य होते. सुमारे २० ते ३० टक्के पाण्यात एकावेळी पाच पिके घेणे शक्य होते.
  • बाष्पीभवन रोखता येते.
  • मृद्‌ व जलसंधारण चांगल्या प्रकारे करता येते.
  • आकाश सांगतात, की पारंपरिक शेतीतून एकरी जिथे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे तेथे मजल्यांच्या शेतीतून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने मी समाधानी आहे.
  • पाण्याचे पुनर्भरण आकाश यांनी शेतातच जलसंवर्धनाची किमया साधली आहे. शेतातच चालण्यासाठी असलेल्या जागेतच एक बाय एक फुटाचे छोटे खड्डे तयार केले जातात. दोन खड्ड्यांमध्ये अर्धा फुटाचे अंतर सोडले जाते. त्याची माती बाजूलाच टाकली जाते. यामध्ये पावसाचे पाणी मुरते. प्रत्येकी दोन फूट रुंद व खोलीचे चरही काढले आहेत. अतिरिक्त झालेले पाणी यात शिरते. शेताच्या उताराच्या दिशेला प्रत्येकी दहा फूट रुंद व खोलीचा खड्डा तयार केला जातो. अशाप्रकारे पावसाळा हंगामात शेतातून वाहणारे पाणी कोठेही वाया न जाता पुरेपूर जमिनीत जिरविण्याचा उद्देश साधता आला आहे. आकाश सांगतात, की अशा उपचारांद्वारे काही लाख लिटर पाण्याचा संचय व पुनर्भरण केले जाते. मातीची सुपीकता मातीच्या सुपीकतेसाठी हिरवळीची पिके उदा. धैंचा, मूग आदी घेतला जातो. मडका खताची निर्मिती २० किलो शेण, २० किलो उडीद डाळ, दोन किलो जुना गूळ, दोन किलो मोहरीची पेंड हे सर्व मिश्रण करून पाच दिवस मडक्यात ठेवले जाते. त्यानंतर २०० लिटर पाणी मिसळून दोन्ही बाजूंनी ते ढवळले जाते. गांडूळ खतनिर्मिती  ७५ टक्के शेणात २५ टक्के रॉक फॉस्फेट मिसळून त्यात गांडूळ कल्चर सोडले जाते. त्यापासून तयार होणाऱ्या खताचा वापर एकरी एक टन याप्रमाणात केला जातो. देशी बियाण्यांचा संग्रह विविध पिके, वाण असे सुमारे ४४ प्रकारचे देशी बियाणे आकाश यांनी संग्रहित केले आहेत. पपई, दुधीभोपळा, दोडके, शेवगा, आले, हळद, तोंडली, मका, काकडी, मिरची, वांगी आदींचा त्यात समावेश आहे. सन २०१४ मध्ये ‘सीड बँके’ची उभारणी त्यांनी केली. त्यात ग्लुटेन मुक्त तसेच वैशिष्ट्यपूर्ण असे गव्हाचे १६ वाण आहेत. एक किलो बियाणे देऊन दोन किलो परताव्याच्या अटीवर पूर्वी देशी बियाणे दिले जायचे. परंतु अनेक जण बियाणे घेऊन परत करीत नव्हते. त्यामुळे आता बियाण्यांसाठी शुल्क आकारले जाते. दर हंगामात बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी अन्य शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतंत्र बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी संपर्कातील शेतकऱ्यांची निवड होते. त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी चार ते पाच हजार शेतकऱ्यांकडून बियाणे मागणी राहते. त्यानुसार बीजोत्पादन क्षेत्र कमी- जास्त होत राहते. हळद, तूर या बियाण्यांना अधिक मागणी राहते असा अनुभव आहे. बियाण्यांच्या शुद्धतेबाबत शेतकऱ्यांचा अभ्यास वाढावा यासाठी २०१३ पासून याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. शुद्ध व देशी बियाणे उत्पादित व्हावे व त्याचा वापर वाढीस लागावा हा त्यामागील हेतू आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे बियाणे बँक असावी या संकल्पनेवर काम सुरू असल्याचे आकाश सांगतात. पाच वर्षे उत्पादन देणारे तूर वाण आकाश यांच्या बियाणे बँकेत तुरीचे वैशिष्टपूर्ण वाण आहे. एकदा लावल्यानंतर पाच वर्षे त्याचे उत्पादन मिळत राहते. एकरी ८ ते १० क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. गंगा किनाऱ्यावर तुरीचे एक झाड आढळले. त्याआधारे निवड पद्धतीने वाण विकसित केल्याचे आकाश सांगतात. १५ जून ते १५ जुलैपर्यंत लावण करता येते. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान पहिले व एप्रिलच्या दरम्यान दुसरे ‘हार्वेस्टिंग’ घेता येते. याचे दाणे लाल आहेत. तुरीचे अजून तीन वाण बॅंकेत आहेत. त्यामध्ये काळे, लाल आणि पांढरे दाणे असलेल्या वाणांचा समावेश आहे. खालील पिकांच्या देशी वाणांचे घेतात उत्पादन गहू, भात, वाटाणा, मूग, पपई, भोपळा, आले, काकडी, गिलके, बटाटा, कांदा आदी. जैवविविधतेचे संवर्धन जैवविविधतेचे संवर्धन करण्यावरही आकाश यांनी भर दिला आहे. त्यासाठी शेताच्या चारही बाजूंना मोठे, मध्यम व लहान अशा पद्धतीचे वृक्ष लावले आहेत. त्यावर पक्ष्यांचा अधिवास असतो.  त्या माध्यमातून कीडनियंत्रणाचा उद्देशही साधला जातो. त्यासोबतच अतिवेगाचे वारेही रोखले जातात. वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसानही काही प्रमाणात टाळता येते. बांबू, पळस, चिंच, पॉपलर, आंबा, किनो संत्रा, पेरू, सीताफळ, लिंब अशी विविधता येथे दिसून येते. जैविक घटकांचा होतो पुरवठा बाहेरून कोणतेही खत आणून दिले जात नाही. गांडूळ खत, फॉस्फो कंपोस्ट आदींचा वापर होतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. जमिनीचा पोत चांगला टिकवल्यानेच एकरी १५० क्विंटलपर्यंत ओल्या हळदीचे उत्पादन घेणे शक्य झाल्याचे आकाश सांगतात. कडुनिंब, करंज, सीताफळाची पाने, बेशरम तसेच अन्य वनस्पतिजन्य अर्क, ताक तसेच कामगंध सापळे यांचा पीक संरक्षण म्हणून वापर होतो. शेतीमालाची घरपोच सेवा नैसर्गिक विषमुक्त शेतीमालासाठी सुरुवातीला बाजारपेठ शोधताना अडचणी आल्या. आता आकाश यांनी सुमारे १०० ग्राहकांचे नेटवर्कच तयार केले आहे. त्यांना घरपोच सेवा दिली जाते. मागणी नोंदविण्यासाठी व्हॉट्‌सॲपवर सुविधा आहे. दर सोमवारी माल पुरवठा केला जातो. वाहतूक खर्च ग्राहकांकडून आकारला जातो. ग्राहक थेट शेतावरून देखील मालाची खरेदी करतात. दर रविवारी शेतावर बाजारही भरविला जातो. भाजीपाला, भात, गूळ, केळी, पपई, आंबा, चिकू आदी फळांचीही विक्री या माध्यमातून साधली जाते. भेट व प्रशिक्षण आकाश यांचे वय आज अवघे ३१ वर्षे आहे. त्यांची राबविलेल्या विषमुक्त शेतीतील प्रयोगांची प्रेरणा अनेकांनी घेतली आहे. त्यांच्या शेतीला भेट देऊन माहिती घेणाऱ्यांची रीघ लागलेली असते. दर महिन्याच्या ठरावीक तारखांना प्रशिक्षण घेतले जाते. हजारो शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतल्याचे आकाश यांनी सांगितले. सन २०१८ च्या सुमारातील उत्पादन (प्रातिनिधिक)

  • पीक क्षेत्र उत्पादन
  • तूर- १ एकर ८ क्विंटल
  • आले- १ एकर (मल्टी लेअर) ५० क्विंटल
  • हळद १ एकर ७० क्विंटल
  • गहू २ एकर ३० क्विंटल
  • भात १ एकर १८ क्विंटल
  • पुरस्कारांनी सन्मान आकाश यांना ग्राममित्र युवा संस्थेतर्फे नवी दिल्ली येथे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठातर्फे ‘कृषक फेलो’, बिहार सरकार, अलाहाबाद, बंगळूर येथील संस्था, महिंद्रा ॲग्री आदींतर्फेही गौरविण्यात आले आहे. संपर्क- आकाश चौरसिया, ९१७९०६६२७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com