साडेसात एकरांतील करवंद बागेतून आर्थिक सुबत्ता 

अर्थकारण उंचावणारे पीक सुरवातीला करवंदाची विक्री स्वतः जाधव कुटुंबीय महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातही करीत असत.सध्या मात्र जाधववाडी करवंदांच्या जाळीसाठी प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे खरेदीदारच स्वतः बांधावर येतात. एकट्या जाधववाडीत एकूण सव्वाशे टनांपर्यंत उत्पादन होत असावे. आकाश यांना प्रतिकिलो ३० रुपये असा दर मिळतो आहे.
आकाश जाधव यांनी पिकवलेली करवंदे
आकाश जाधव यांनी पिकवलेली करवंदे

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील अश्विनीपूर येथील आकाश जाधव हा युवा शेतकरी सध्या साडेसात एकरांतील करवंद बागेचे उत्तम व्यवस्थापन सांभाळत आहे. आजोबांच्या काळात लागवड झालेल्या या करवंदाचा वारसा पुढील पिढी चालवत आहे. अत्यंत कमी खर्च, पाणी व देखभालीत हे पीक एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न देत आहे, त्याला जागेवरच मार्केट मिळाले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील अश्विनीपूर परिसरात जनार्दन जाधव यांची ३५ एकर शेती आहे. शेतामधूनच पूस प्रकल्पाचा डावा कालवा गेला आहे. येथील काही जमीन हलकी, मुरमाड आणि पडीक स्वरूपाची असल्याने पारंपरिक पिकांचे उत्पादन फारसे मिळत नव्हते. शेतीला गुराढोरांचाही त्रास होता, त्यामुळे सुरवातीला त्यांनी कुंपणासाठी काटेरी करवंदाची लागवड केली. यामुळे शेताची सुरक्षा तर झालीच, शिवाय करवंदापासून उत्पन्नही मिळाले. त्यामुळे तीन एकरांत करवंदाची लागवड केली. या बागेने आश्‍वासक उत्पादन देण्यास सुरवात केली. मग संयुक्त कुटुंबाच्या शेतजमिनीत करवंदाच्या बागा फुलू लागल्या.  वाटणीनंतरही करवंदात सातत्य  जमिनीच्या वाटणीनंतर आकाश यांचे वडील प्रकाश यांच्या वाट्याला २४ एकर जमीन आली. त्यांनीही आपल्या वडिलांचा करवंद बागेचा वारसा कायम ठेवला. त्याचे अर्थकारण फायदेशीर ठरू लागल्यानेच त्याचा हळूहळू विस्तार झाला. आज सुमारे साडेसात एकरांत जाधव यांची करवंदाची बाग आहे. त्याची जबाबदारी युवा पिढीतील आकाश सांभाळतात. त्यांनी गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती हेच करिअर म्हणून निवडले आहे.   

अशी आहे करवंदाची शेती 

  • बहुतांश झाडे १८ ते २० वर्षांपूर्वीची. तीन वर्षांपूर्वी नवी बाग उभारली. 
  • २० बाय तीन फूट किंवा १८ बाय ३ फूट असे लागवडीचे अंतर 
  • एकरी सुमारे ७५० ते ८०० झाडे. ती काटेरी असल्याने कुंपण म्हणून त्यांचा उपयोग तर होतोच, शिवाय जनावरांचा त्रास होत नाही. करवंद चोरीची भीतीही फारशी राहत नाही. 
  • खतांचा तसेच कीडनाशकांचा फारसा वापर करण्याची गरज भासत नाही. 
  • या पिकाला पाणीही खूप कमी लागते. उन्हाळ्यात पंधरा दिवसांनी पाणी दिल्यास चालते. 
  • सुमारे सहा एकराला ठिबक सिंचन केले आहे. 
  • करवंद जाळी सहा ते आठ फुटांपर्यंत उंच वाढली आहे. 
  • लागवडीनंतर सुमारे तीन वर्षांनी झाड उत्पादन देण्यास सुरवात करते. झाड जसजसे मोठे होत जाईल तसतशी उत्पादनात वाढ होण्यास सुरवात होते. 
  • तोडणी, उत्पादन  करवंदाला वार्षिक फळधारणा होते. फेब्रुवारी- मार्चमध्ये बहर येतो. पाऊस पडल्यानंतर जून-जुलैमध्ये फळधारणा होते. फळे ऑगस्टच्या सुमारास परिपक्व आणि तोडणीयोग्य होतात. एकरी सुमारे पाच टन उत्पादन मिळते. अधिक वयाची झाडे सहा टनांपर्यंत उत्पादन देतात.  विक्री व्यवस्था  करवंदाला दोन प्रकारची फळे लगडतात. काही हिरवी तर काही लाल-गुलाबी अशा आकर्षक रंगाची असतात. हिरवी करवंदे भाजी, लोणचे, चटणीसाठी वापरतात. त्यांची विक्री स्थानिक बाजारपेठेत होते. तर लाल-गुलाबी करवंदे मुरब्बा आणि चेरी बनविण्यासाठी उपयोगात येतात, त्यामुळे व्यावसायिकांकडून अशा करवंदांना अधिक मागणी असते. करवंदांची चव काहाशी तुरट आंबट असून लोहयुक्त फळ असल्याने औषधी गुणधर्माच्या दृष्टीनेही ते महत्त्वपूर्ण आहे.  सध्या काढणी हंगाम सुरू  आकाश यांच्या बागेत सध्या काढणी हंगाम सुरू आहे. एका जाळीवर साधारणतः ५० किलोपर्यंत करवंदे मिळतात. बागेत दररोज तीस मजुरांची गरज भासते. काटेरी उंच जाळीतून तोडणी करताना लोखंडी शिडीचा वापर होतो. सध्या पाच रुपये प्रतिकिलो मजुरी दर आहे. एक मजूर कुटुंब एकूण तोडणीतून एक हजार रुपयांपर्यंत मिळकत घेतात. जाधववाडीत सर्व कुटुंबांची मिळून २५ ते ३० एकरांवर करवंद बाग असून, त्यातून दररोज दोनशे मजुरांना रोजगार मिळतो आहे. महिलेला अडीचशे रुपये, तर पुरुषाला तीनशे रुपये असा दररोजच्या मजुरीचा दर आहे. सुमारे २५ किलोमीटर परिसरातून मजूर करवंद तोडीसाठी जाधववाडीत येतात हे विशेष.  अर्थकारण उंचावणारे पीक  सुरवातीला करवंदाची विक्री स्वतः जाधव कुटुंबीय महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातही करीत असत. सध्या मात्र जाधववाडी करवंदांच्या जाळीसाठी प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे खरेदीदारच स्वतः बांधावर येतात. एकट्या जाधववाडीत एकूण सव्वाशे टनांपर्यंत उत्पादन होत असावे. आकाश यांना प्रतिकिलो ३० रुपये असा दर मिळतो आहे. मागील वर्षीही याच दराने विक्री झाली होती. संपूर्ण खरेदी होईपर्यंत व्यापारी शहरात मुक्काम करून असतात, असे आकाश यांनी सांगितले. यंदा सात एकरांत ३० टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा जाता एकरी एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. यानुसार साडेसात एकरांमध्ये किमान सात लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.  करवंदाने घडवला बदल  आकाश यांनी ८५ वर्षीय आजोबा जनार्दन यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल केली. आज याच करवंद बागेच्या उत्पन्नातून जाधववाडीचा चेहरामोहरा बदलला आहे. पूर्वी टीन पत्र्यांची असलेली घरे आज सिमेंट काँक्रीटची झाली आहेत. घरात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. बागेची देखभाल करण्याबरोबरच आकाश यांनी करवंदाची रोपवाटिकाही विकसित केली आहे. प्रतिनग १३ ते १५ रुपये याप्रमाणे २० हजारांहून अधिक रोपांची विक्री त्यांनी केली आहे. जाधववाडीतील करवंद शेतीचे यश पाहून भागातील अन्य शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळला आहे.  अन्य फळांचेही उल्लेखनीय उत्पन्न  करवंदासह दशेरी आंब्यांची व फणसाची प्रत्येकी ४० झाडे आहेत. शिवाय, लिंबाची जुनी २००, तर नवी अडीचशे पर्यंत झाडे आहेत. लिंबाचे पीक वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देते. पुसद बाजारात लिंबांची विक्री होते. जांभळाचीही नवी ८० झाडे लावली आहेत. फळबागांव्यतिरिक्त चार एकरांत उसाची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय गावरान कोंबड्या आणि गावरान बकरी पालन सुरू केले असून त्यासाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे. शेतीत वडील प्रकाश यांची मोठी मदत आकाश यांना होते.  संपर्क - आकाश जाधव - ७८८७३८६१५६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com