खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोर

गणेश राऊत यांनी पिकवलेले दर्जेदार अॅपल बोर
गणेश राऊत यांनी पिकवलेले दर्जेदार अॅपल बोर

अंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ मना है... असा एक शेर आहे. अशाच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अकोला जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील सांगळूद येथील गणेश राऊत यांनी ॲपल बोर घेण्याचे धाडस केले. चांगल्या व्यवस्थापनातून पीक यशस्वी करीत स्वतःच्या वाहनातून मार्केटिंग व थेट विक्री साधली. आज परिसरातील शेतकऱ्यांपुढे राऊत यांनी केलेला पीकबदल अभ्यासण्याजोगा ठरला आहे.   अकोला जिल्ह्यात पूर्णा नदीच्या खोऱ्यात विस्तारलेल्या खारपाणपट्ट्यातील मातीत वेगवेगळे प्रयोग करण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकऱ्यांचा भर राहतो. अकोला तालुक्यातील सांगळूद गावही खारपाणपट्ट्यात येते. येथे बारमाही बागायती क्षेत्र नाही. अशा परिस्थितीत गावातील गणेश विश्‍वनाथ राऊत यांनी २०१५ मध्ये बोअरवेल घेतली. त्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च करीत खांब उभे केले. वीज जोडणी करून घेतली. सुरुवातीची दोन वर्षे पारंपरिक पिके घेत गरजेवेळी पाणी देत उत्पन्न वाढविले. कृषी प्रदर्शनातून प्रोत्साहन गणेश मुळात टेलरिंगचा व्यवसाय करायचे. खारपाणपट्ट्याची मर्यादा लक्षात घेता वडील विश्‍वनाथ, भाऊ दिनेश यांच्या मदतीने ते घरची साडेचार एकर शेती करायचे. आपण प्रयोगशील शेती केली पाहिजे असे त्यांना सतत वाटे. विविध कृषी प्रदर्शनांना भेटी देत ज्ञान वाढविताना ॲपल बोरचा पर्याय समोर आला. मात्र खारपाणपट्ट्यात बाग किती यशस्वी होईल याबाबत साशंकता होती. तरीही धाडस करायचे ठरवले. ॲपल बोरचा प्रयोग -विविध ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर २०१७ मध्ये दीड एकरात १३ बाय १० फूट अंतरावर लागवड केली. मध्यस्थांच्या मदतीने रोपे आणली. -या भागात वन्य प्राण्यांचा त्रास सर्वाधिक आहे. रोपे लहान असतानाच त्यांनी काही रोपे खाल्ली. मात्र गणेश हिंमत हरले नाहीत. -सातत्याने सिंचन केल्यास माती टिकाव धरेल का हा प्रश्‍न होता. रासायनिक खतांचा वापरही कितपत साह्य करेल याचीही शंका होती. मग या पिकातील अनुभवी शेतकरी तसेच तज्ज्ञांसोबत चर्चा करीत स्वअनुभवाने व्यवस्थापन सुरू केले. नियोजन सुधारले अतिपाण्यामुळे जमीन खराब होते हे माहित असल्याने पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी ठिबक बसविले. पाण्यात विरघळवणाऱ्या सेंद्रिय वा जैविक निविष्ठांचा पाण्याच्या प्रत्येक पाळीसोबत वापर सुरू केला. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला. बागेतील झाडांची एकसमान वाढ झाली. फळांचा आकार मोठा मिळू लागला. फळांमध्ये गोडीचे प्रमाण वाढले. आश्‍वासक उत्पादन धाडस, कष्ट व अभ्यास यांना अखेर फळ आले. पहिल्या वर्षी दीड एकरात १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्यापुढील वर्षी ३० ते ३५ क्विंटल व यंदा तेवढ्या क्षेत्रात त्याहून दुप्पट म्हणजे ६० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. बागेत भरघोस संख्येने बोर लागले. यंदाचा हंगाम आटोपत आला असून अजून पाच ते दहा क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. फळे वजनाने चांगली व चवीला गोड असल्याने ग्राहकांकडून चांगली पसंती मिळवत आहेत. स्वतःच्या वाहनातून केले मार्केटिंग बाजारात सहसा दिवाळीनंतर ॲपल बोर विक्रीस येण्यास सुरुवात होते. गणेश यांच्या बागेतील बोर मात्र जानेवारीपासून येण्यास सुरुवात होते. तोपर्यंत अन्य ठिकाणची फळे विकून झालेली असतात. याचा फायदा झाला. सुरुवातीच्या वर्षी व्यापाऱ्यांना माल दिला होता. मात्र त्यास किलोला १५ ते २० रुपयांपेक्षा काही दर जास्त मिळाला नाही. यंदा मात्र थेट विक्री करण्याचे ठरवले. त्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांत सेकंडहॅंड कार घेतली.   दिवसभर तोडणी केलेली बोरे सायंकाळी कुटुंबातील सर्वजण एक किलो पॅकिंगमध्ये भरतात. दुसऱ्या दिवशी सकाळी चार क्विंटल माल कारमध्ये भरण्यात येतो. दररोज एक याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस ही कार विविध गावांतील आठवडी बाजारांत जाते. स्वतः गणेश व चालक असे दोघेही कारसोबत असतात. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कारच्या टपावर जय गजानन ॲपल बोर व शेतकऱ्याचे नाव असलेला फलक लावला आहे. सोबतच कारला लाऊड स्पीकर बसवला आहे. गावातील सुप्रसिद्ध असलेले व प्रशस्तिपत्रक मिळविलेले ॲपल बोर अशी घोषणा त्यातून बाजारभर होत राहते. किलोला ४० रुपये असा दर ठेवण्यात येतो. थेट ग्राहकांना विक्री असल्याने नफ्यात वाढ होते. पहिल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगले म्हणजे अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न दीड एकरात मिळाले आहे. खारपाणपट्टा व अन्य प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता या पिकाने चांगले पैसे मिळवून दिल्याचा आत्मविश्‍वास गणेश यांना मिळाला आहे. शिवाय कपाशीचे आंतरपीक घेतले असल्याने त्याचे ११ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यास ५४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे ॲपल बोरचा नफा अजून वाढला आहे. वन्य प्राण्यांपासून संरक्षण या भागात हरिण, रानडुक्कर, नीलगायी आदी वन्य प्राण्यांचा मोठा त्रास होत असतो. बोराच्या बागेला हरिण अधिक प्रमाणात त्रास देतात. त्यांच्यापासून बागेच्या संरक्षणासाठी पूर्ण वेळ रखवाली करण्याबरोबर बागेच्या चौफेर जाळी लावली. बागेत लाऊडस्पीकर बसवून रात्रभर विविध प्राण्यांचे आवाज वाजविले जातात. आता त्रास आटोक्यात आला आहे. संपर्क- गणेश विश्‍वनाथ राऊत- ९६८९३०२७०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com