अक्षय तृतीये निमित्त कोकणातून आवक झालेला दर्जेदार आंबा
अक्षय तृतीये निमित्त कोकणातून आवक झालेला दर्जेदार आंबा

अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा बाजारपेठ

अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या हापूस आंब्याची बाजारपेठ दोन वर्षांत कोरोना संकटात विस्कटली. मात्र संकटावर मात करत बाजारपेठेवर पुन्हा पकड मिळवण्याचा आंबा बागायतदारांचा प्रयत्न आहे. ऑनलाइन विक्रीचा ट्रेंडही प्रसिद्ध होत आहे.

अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या हापूस आंब्याची बाजारपेठ दोन वर्षांत कोरोना संकटात विस्कटली. मात्र संकटावर मात करत बाजारपेठेवर पुन्हा पकड मिळवण्याचा आंबा बागायतदारांचा प्रयत्न आहे. ऑनलाइन विक्रीचा ट्रेंडही प्रसिद्ध होत आहे. अक्षय तृतीया सण तोंडावर आहे. या वेळी बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी असते. याच काळात कोरोना संकटाची दुसरी लाट व लॉकडाउन सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत या संकटामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले. बाजारपेठ व्यवस्था कोलमडली. मात्र बागायदार हिंमत एकवटून संकटावर मात करण्यासाठी पुन्हा सज्ज आहे. यंदाची स्थिती पुणे बाजार समितीतील कोकण हापूस आंब्याचे अडतदार करण जाधव म्हणाले, की ‘कोरोना’मुळे दोन वर्षे आंबा उद्योगासाठी अडचणीची गेली. गेल्या वर्षी बाजार समिती बंद असल्याने व्यवसाय बंद ठेवला. मोठे आर्थिक नुकसान झाले. या वर्षी चांगली आशा असतानाच कोकणात डिसेंबरपासून अलीकडील काळापर्यंत सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट झाली. परिणामी, उत्पादन कमी उपलब्ध झाले. पहिल्या टप्प्यातील आवकही तुलनेने कमी राहिली. गुढीपाडव्याचा हंगाम मंदीतच गेला. आंब्याला मुख्य मागणी आणि उठाव अक्षय तृतीयेपासून सुरू होतो. मात्र यंदा मेच्या सुरुवातीपासून टाळेबंदी सुरू झाली. बाजार समितीतील खरेदीच्या वेळा आणि शहरातील दुकाने बंद अशा कात्रीत विक्रेते अडकले. त्यामुळे ५० पेट्या खरेदी करणारा व्यावसायिक १० ते २० पेट्याच खरेदी करू लागला. आवक होऊनही ग्राहक नसल्याने आंबा शिल्लक राहत आहे. दरही आवाक्यात आहेत. सर्वसामान्यांचा आखडता हात गेल्या वर्षी आंब्याच्या घरपोच सेवेच्या (होम डिलिव्हरी) नव्या संधी उपलब्ध झाल्या. बाजार बंद असल्याने घरीच आंबा उतरून घेत व्यवसाय केला. पारंपरिक घाऊक आणि घरगुती ग्राहकांना घरपोच पुरवठा केला. यंदा सामान्य ग्राहकही आर्थिक संकटात असल्याने खर्च टाळण्याकडे त्याचा कल आहे. बाजारपेठेत तयार आंबा मुबलक आहे. गुढीपाडव्यापासून तीन-चार हजार पेट्यांची होणारी आवक अक्षय तृतीयेला १० हजार पेट्यांपर्यंत पोहोचेल असे कोकण हापूस आडतदार अरविंद मोरे यांनी सांगितले.

दर (रु.) कोकण हापूस कच्चा आंबा  ४ ते ६ डझन- १५०० ते २,५०० १ ६ ते १० डझन- १५०० ते ४५०० पक्का आंबा  ४ ते ६ डझन- १५०० ते ३००० ६ ते १० डझन- ​२००० ते ५०००

कर्नाटक आंबा जोमात गेल्या वर्षी बंद बाजार समितीमुळे कर्नाटक आंब्याची आवक शहरांमध्ये परस्पर झाली. पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने व्यवसाय केवळ २५ टक्के झाला. यंदा बाजार समित्या सुरू असल्याने कर्नाटक आंब्याचा हंगाम जोमात आहे. मार्चपासून सद्यःस्थितीपर्यंत मेमध्ये दररोज दोन डझन करंडी आणि चार डझनांच्या पेट्यांची सुमारे ३० हजार डागांपर्यंत आवक होत आहे. हापूस, पायरी, लालबाग, बदाम, तोतापुरी, मलगोबा आणि मल्लिका वाणांचा समावेश आहे. हापूस आणि पायरीला मोठी मागणी आहे. हा हंगाम १५ मेपर्यंत संपेल. त्यानंतर आंध्र प्रदेश, गुजरात येथील आंब्याच्या हंगामाला प्रारंभ होईल, असे कर्नाटक आंबा विक्रीचे प्रमुख अडतदार रोहन उरसळ यांनी सांगितले.

  • कर्नाटक आंब्याचे दर (रु.)
  • हापूस - ३ ते ५ डझन -५०० ते ८००
  • पायरी - ४ ते ५ डझन - ५०० ते ६००
  • लालबाग - प्रति किलो -२० ते ३०
  • बदाम --- २४ ते ४०
  • तोतापुरी --- २० ते २५
  • मल्लिका --- ३० ते ४०
  • ऑनलाइन विक्रीचा ‘ट्रेंड’ सुमारे ११५ वर्षांपूर्वीच्या डी. बी. उरसळ ॲण्ड कंपनीचे संचालक रोहन उरसळ चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कोरोना संकटात पारंपरिक अडत व्यवसायातील अडचणी लक्षात घेत त्यांनी ऑनलाइन व्यवसायातील कंपन्यासोबतकाम सुरू केले. दररोज सुमारे ५० पेट्यांचा पुरवठा ते करतात. ऑनलाइन विक्रीला प्रतिसाद चांगला असल्याचे ते सांगतात. पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी शेतकरी ते ग्राहक आंबा विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून टाळेबंदीमुळे ऑनलाइन पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी ६५ हजार, तर या वर्षी आतापर्यंत सुमारे ४० हजार डझन आंब्याची विक्री झाल्याचे पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी सांगितले. इष्टापत्ती ठरली ‘कोरोना’ संकटाने अनेक गोष्टी शिकविल्या. आपत्ती ही इष्टापत्ती ठरली. गेल्या वर्षी पुणे, मुंबईसारख्या महत्त्वाच्या बाजार समित्या बंद होत्या. तिकडून विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात जो कोकण हापूस जायचा तो थांबला. परिणामी, या ठिकाणांवरून खरेदीदार थेट कोकणात आल्याने नवी बाजारपेठ आम्हा शेतकऱ्यांना मिळाली. यामुळे गुढीपाडव्याला वाशी बाजार समितीतील एक ते सव्वा लाख पेट्यांची आवक यंदा केवळ ४० ते ४५ हजार पेट्यांच राहिली. आवक वाढली तरी दर देखील पडले नाहीत. ही बाब समाधानकारक ठरली. यंदा बाजार समित्या सुरु असून आंब्याला चांगला उठाव आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उत्पादन कमी राहिल्याने बागायतदारांना दर चांगले मिळतील अशी आशा आहे. -विवेक भिडे अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेता सहकारी संस्था, रत्नागिरी थेट विक्रीचे तंत्र रुजले पूर्वी बागायतदार आंबा पेट्यांमध्ये भरून आडत्यांकडे पाठवायचे. कोरोना संकटात बाजार समित्या बंद राहिल्या. परिणामी, शेतकऱ्यांनी स्वतः विक्रीचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो यशस्वीही झाला. त्यातून थेट ग्राहक विक्रीला बळ मिळाले. यापूर्वी फळे- भाजीपाला नियमनमुक्तीनंतर आम्ही थेट विक्रीचे उपक्रम केले. मात्र कोरोना संकटामुळे थेट विक्रीचे तंत्र अधिक रुजले असेही भिडे यांनी सांगितले. संपर्क- किरण जाधव, (अडतदार) ९३७२१११४१८ अरविंद मोरे- (अडतदार) ९०१११०८९१८ रोहन उरसळ (कर्नाटक आंबा अडतदार) ९८८१००१११९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com