ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपई

कोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील अमोल कदम या कृषी पदाविकाधारक युवा शेतकऱ्याने ऊसपट्ट्यात पपईचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला दोन एकर, त्यानंतर दर्जेदार उत्पादन व बळकट विक्री व्यवस्था यांच्या जोरावर दहा एकरांपर्यंत पपईचा विस्तार केला आहे.
अमोल कदम यांनी पपई बाजारात नेण्यासाठी केलेली तयारी.
अमोल कदम यांनी पपई बाजारात नेण्यासाठी केलेली तयारी.

कोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील अमोल कदम या कृषी पदाविकाधारक युवा शेतकऱ्याने ऊसपट्ट्यात पपईचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला दोन एकर, त्यानंतर दर्जेदार उत्पादन व बळकट विक्री व्यवस्था यांच्या जोरावर टप्प्याटप्प्याने दहा एकरांपर्यंत पपईचा विस्तार केला आहे.   कोल्हापूर जिल्ह्यात तालुका कागलपासून बावीस किलोमीटरवर खडकेवाडा येथे अमोल वसंतराव कदम (वय ३५) हे प्रयोगशील युवा शेतकरी राहतात. सरुड- मलकापूर येथून त्यांनी कृषी पदविका घेतली. त्यांची सुमारे अठरा एकर बागायत आहे. हा तालुका उसासाठी प्रसिद्ध आहे. अमोल यांचीही आठ एकरांत ऊस शेती आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे २००५ पासून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. सन २०१० पासून भाजीपाला शेतीला प्राधान्य दिले. यात झेंडू, मिरची, कलिंगड, वांगी, फ्लॉवर अशी आठ वर्षे विविधता ठेवली. दोन एकरांत केळी घेऊन निर्यातही साधली. पपईचा प्रयोग अलीकडच्या काळात विविध किडी-रोगांमुळे भाजीपाला शेती आव्हानात्मक झाली. त्यास पर्याय शोधण्यास सुरुवात केली. भिलवडी (जि. सांगली) येथील सासरे शिवाजी कोकाटे यांनी अमोल यांना पपईचा प्रयोग करण्याचा सल्ला दिला. शिरगुप्पी येथील सुनील चौगुले या मित्रानेही उत्तेजन दिले. उत्पादन व बाजारपेठ यांचा अभ्यास करून अखेर दोन एकरांत प्रयोग करण्याचे निश्‍चित केले. या पिकाचा प्रयोग परिसरात झाला नसल्याने अनेकांनी जोखीम घेण्याविषयी शंकाही उपस्थित केली. मात्र जिद्द व पक्के नियोजन या जोरावर अमोल यांनी मोहोळ (जि. सोलापूर) भागातून चाळीस दिवसांची रोपे आणून लागवड केली. व्यवस्थापन व विक्री दोन एकरांत फेब्रुवारी २०१९ मध्ये ८ बाय सहा फूट अंतरावर चार फुटी सरी ठेवून एक आड एक सरी पद्धतीने लागवड केली. सेंद्रिय व रासायनिक असा दोन्ही पद्धतींचा मेळ घातला. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन मित्र सुनील यांनीच केले. साधारण आठ महिन्यांनी उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला कोल्हापूर येथे पपई पाठविली. पाचशे ते सातशे किलो विक्री झाली. २० ते २२ रुपये प्रति किलो दर मिळाला. गोव्याची बाजारपेठ कोल्हापूर व परिसरात पपईची मागणी तुलनेने कमी असल्याने खरेदीही कमी प्रमाणात होते. अमोल यांना हळूहळू आजूबाजूच्या बाजारपेठांचा अंदाज येऊ लागला. मित्रांच्या सहकार्याने मुंबई व गोव्याच्या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांशी समन्वय ठेवला. गोव्यात विक्री चांगली होत असल्याचे लक्षात आले. आता दीड वर्षापासून गोव्यासह कर्नाटक राज्यातील सौंदत्ती भागातील व्यापाऱ्यांनाही विक्री करतात. या पिकात जसजसा आत्मविश्‍वास येत गेला तसतसे टप्प्याटप्प्याने अडीच एकरांचे टप्पे करीत क्षेत्र वाढवत नेले. आजमितीला ते दहा एकरांपर्यंत पोहोचले आहे. व्यापारी थेट बागेत येऊन खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होत आहे. दर दहा दिवसांनी एकदा तीन टन या प्रमाणात काढणी होते. जागेवर ७ ते २२ रुपये प्रति किलो दर मिळतो. विक्रीनंतर व्यापाऱ्यांकडून खात्यावर पैसे जमा होतात. शक्यतो एकच व्यापारी निश्‍चित करून त्यास माल दिला जातो. त्यातून विक्री व्यवस्था बळकट केली आहे. मागील वर्षी व यंदाही लॉकडाउनच्या काळात त्यांना हंगामात चांगला अनुभव मिळाला आहे. पाण्याचा निचरा कागल तालुक्यात चांगला पाऊस पडतो. त्यातच जमीन काळी व मुरमाड दोन्ही पद्धतीची आहे. काळसर जमिनीत पाण्याचा प्रश्‍न निर्माण होता. जोराचा किंवा अति पाऊस झाला तर पाणी बाहेर काढायचे कसे हा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून तीन फूट उंचीचे ‘बेड्‍स’तयार केले. शेताभोवती चरी काढून अतिरिक्त पाणी बाहेर काढले. रोपे लहान असताना अति पाण्याने खराब होऊ नयेत यासाठी भर पावसाच्या काळात शेतात मुक्काम केला. जोरदार पाऊस व्हायचा त्या वेळी खोऱ्याच्या साह्याने साठलेल्या पाण्याला वाट करून ते चरीला नेऊन सोडले जायचे. खतांच्या नियोजनातही वेळेनुसार बदल करावा लागला. झाडे जगविण्यासाठी कसरत करावी लागली. पपई ठरली फायदेशीर आजमितीला दोन एकरांतून सुमारे १५० टन मालाची विक्री झाली आहे. अन्य आठ एकरांतून १०० टन माल उपलब्ध झाला आहे. पुढील दिवाळीपर्यंत अजून माल उपलब्ध होत राहील. अमोल सांगतात की किलोला ७ रुपये दर मिळाला व व्यापारी निश्‍चित असले तर उसापेक्षा हे पीक परवडते. दहा एकरांत पपईची बाग असणारे अमोल तालुक्यातील पहिलेच शेतकरी असावेत. अन्य आठ एकरांत त्यांच्याकडे आडसाली व सुरु हंगामात ऊस असतो. आडसाली उसाचे एकरी ७५ टन, तर सुरू उसाचे ५० टन उत्पादन मिळते. अमोल ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक असून त्यातील लेख, यशकथांद्वारे ज्ञान व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क- अमोल कदम, ९५४५४०१००४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com