agriculture story in marathi, Anil Rokde from Akole Dist. has raised hie economy through his efforts & management in banana farming. | Agrowon

प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले अर्थकारण

गोपाल हागे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी प्रयत्नवाद, अभ्यासू व उद्योगी राहण्याची वृत्ती, जिद्द, संघर्ष यांच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकरी होण्यापर्यंत टप्पा गाठला आहे.

पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी प्रयत्नवाद, अभ्यासू व उद्योगी राहण्याची वृत्ती, जिद्द, संघर्ष यांच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकरी होण्यापर्यंत टप्पा गाठला आहे. केळी हे मुख्य पीक बनवून त्यातही कुशल होण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
 
अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील पणज, रईखेड, अकोली, बोचरा, चंडीकापूर अशा विविध गावांची ओळख केळी पिकात निर्माण झाली आहे. या तालुक्यांत केळीचे क्षेत्र दोन हजार हेक्टरवर असावे. पाण्याची सुविधा असल्याने प्रत्येक शिवारात केळीची बाग दिसते. पारंपरिकतेकडून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल सुरू आहे. सिंचनाच्या अत्याधुनिक सोयीमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर शेतकरी करीत आहेत. त्यामुळे कधीकाळी जास्त पाण्याचे म्हणून ओळखले जाणारे केळी पीक ठिबकवर चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकते हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

रोकडे यांची संघर्षमय वाटचाल
केळीचे आगार म्हणून आपण पणज गावाची ओळख देऊ शकतो. अकोट-अंजनगाव सूर्जी मार्गावर हे गाव आहे. अनिल रोकडे, पत्नी सौ. जया, मुलगी एकता, मुलगा कुशल, आई व बहीण असे हे कुटुंब या गावात राहते. त्यांची सहा एकर शेती आहे. प्रगतिशील केळी उत्पादकापर्यंतचा त्यांचा विविध टप्प्यांवरचा प्रवास संघर्षपूर्ण आहे. सन २०१५ पर्यंत अनिल कापूस, सोयाबीन, तूर अशी पिके घेत होते. यात जेमतेम कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. पुढील हंगामात लागवड करायची तर पीककर्जाशिवाय पर्याय नसायचा. अन्यथा, उसनवारी करावी लागे. टीनपत्राच्या साध्या घरात हे कुटुंब गुजराण करीत होते.

केळीच झाले मुख्य पीक
विविध ठिकाणच्या प्रयोगांची माहिती घेण्याची सवय असल्याने अनिल यांनी आपल्या भागातील केळी पीक व त्यातून शेतकऱ्यांनी केलेली प्रगती अभ्यासली. त्यातून प्रेरणा घेत २०१५ मध्ये जून महिन्यात तीन एकरांत केळीची लागवड केली. अभ्यास व योग्य व्यवस्थापनातून पहिल्याच प्रयत्नांत सरासरी २५ ते ३० किलोची रास तर खोडव्यास २६ ते २८ किलोचा उतारा भेटला.
तेव्हापासून केळीत सातत्य ठेवले. आज सर्व म्हणजे सहा एकरांत केळी हे मुख्य पीक झाले आहे. यंदा तीन एकर क्षेत्र आहे.

व्यवस्थापनातील बाबी

 • २०१५ मध्ये लागवड करण्यापूर्वी ७५० ट्रॉली गाळ शेतात वापरला. त्यातून जमिनीची प्रत बदलणे शक्य झाले. हे पाहून आणखी १५ ते २० शेतकऱ्यांनी गाळ वापरण्यास सुरुवात केली.
 • दर दोन वर्षांनी एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखत वापरतात. सहा बाय पाच फुटांवर बेड पद्धतीने लागवड करतात.
 • त्यानंतर तीन आठवड्यांनी एकरी १०० किलो ‘एनपीके’चा बेसल डोस दिला जातो. पुढील याच डोसबरोबर एकरी २५ ते ३० किलो सूक्ष्मअन्नद्रव्याचा डोस दिला जातो. पुढील काळात ‘फ्रूट केअर’ तंत्राने काळजी घेतली जाते.
 • बागेत वजनदार घडामुळे झाड तुटून पडण्याची तक्रार ऐकायला मिळते. तीन वर्षांपूर्वी अनिल गावातील शेतकऱ्यांसह गुजरातमध्ये अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले. तेथील शेतकरी बागेत दोरीने घड बांधत असल्याचे पाहिले. ही पद्धत कमी खर्चाची असल्याने त्याची संपूर्ण माहिती घेत त्याचा वापर आपल्या बागेत सुरू केला. परिणामी, आधार देण्यासाठी प्रचलित पद्धतीवरील खर्च कमी झाला.

उत्पादन व उत्पन्न
पणज भागातील अनेक शेतकरी २५ ते २८ किलोपर्यंत रास घेण्यामध्ये माहिर झाले आहेत. त्यासाठी ते काटेकोर व्यवस्थापनावर भर देतात. अनिल देखील त्याआसपासच उत्पादन घेतात. त्यांचा एकरी उत्पादन खर्च किमान ९० हजार रुपये आहे. गावापासून जवळच असलेल्या पथ्रोट येथे दर निश्‍चित केले जातात. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वाचतो.

शेतीतील ठळक बाबी

 • नियमितपणे स्लरीचा वापर. गोमूत्र २ लिटर, गाईचे शेण २ किलो, द्विदल धान्याचे बेसन पीठ १ किलो, गावरान गूळ दोन किलो, वडाच्या झाडाखालील माती अर्धा किलो आदींचा स्लरीसाठी वापर
 • मिश्रण सात ते १० दिवस टाकीत ढवळतात.
 • केळीनंतर ज्वारी व रब्बीत हरभरा. दोन्ही पिकांत रासायनिक खतांचा वापर बहुतेक नाहीच. या पीक पद्धतीमुळे जमीन सुधारण्यास मदत
 • संपूर्ण शेतीत ठिबक
 • विविध ठिकाणी अभ्यास दौऱ्यात सहभाग
 • पत्नी जयासह संपूर्ण कुटुंब पाठीशी
 • राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची येथे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग

सातत्याने उद्योगात राहण्याची वृत्ती
केळीची शेती करण्यापूर्वी अनेक वर्षे अनिल गहू काढणीसाठी पंजाबमधून येणाऱ्या ‘हार्वेस्टर’चे स्थानिक एजंट म्हणून काम करीत. पूर्वी या भागात गव्हाची पेरणी प्रत्येक शेतकरी करायचा. मात्र दर, खर्च व उत्पादकता कमी झाल्याने पेरा घटल्याचा फटका व्यवसायाला बसला. बोअर यंत्रासाठीही त्यांनी एजंट म्हणून काम केले. ते काम नंतर सोडून दिले. आता केळी बागेत वापरल्या जाणाऱ्या लोखंडी शिड्या बनवून विकतात. शेतकऱ्यांना रात्री रखवाली किंवा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. शेतकऱ्यांची ही गरज ओळखत अनिल यांनी गावातच एका कंपनीचे दर्जेदार टॉर्च वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले. आजवर १५०० पेक्षा अधिक विक्री केली. पत्नीच्या नावे पोस्टाची ‘एजन्सी’ घेतली आहे. त्या कामातही मदत करतात. केळी शेती व प्रयत्नवादातून कधीकाळी टीनपत्र्याच्या साध्या घरात राहणारे रोकडे कुटुंब आज सिमेंट काँक्रीटच्या टुमदार घराचे मालक झाले आहे. आर्थिक व सामाजिक पतही वाढली आहे.

विमा मिळण्यासाठी पुढाकार
केळी उत्पादक दरवर्षी पिकाचा विमा काढतात. नैसर्गिक संकटेही या भागात सातत्याने येतात. अशावेळी विमा कंपन्यांसोबत माहितीपूर्ण व आकडेवारीसह लढण्यासाठी अनिल शेतकऱ्यांसाठी कागदपत्रांचे डॉक्युमेंटेशन वा ‘फायलिंग’चे काम करतात. गेल्या काळात केळीचा विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांनी तालुक्यापासून मुंबईपर्यंत लढा दिला. विविध ठिकाणी अनिल यांनी आकडेवारीसह शेतकऱ्यांचा मुद्दा अधिकारी, मंत्र्यांसमोर मांडला. यामुळे विमा मिळण्यास मदत झाली. सुरुवातीला ‘एलआयसी’ एजन्ट म्हणून काम केल्याचा अनुभव अनिल यांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारे करून दिला.

संपर्क-  अनिल रोकडे, ९७६३७०४६००
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...