agriculture story in marathi, Anil Sonavane has succeed in commercial farming with quality produce. | Agrowon

व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली प्रयोगशील शेती

मुकूंद पिंगळे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक पट्ट्यात अनिल सोनवणे हे शासकीय नोकरी सोडून गेल्या ६ वर्षांपासून पूर्णवेळ शेती करत आहेत. नवीन पीक पद्धतीचा अवलंब, तंत्रज्ञानाची कास त्यांनी धरली.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक पट्ट्यात अनिल सोनवणे हे शासकीय नोकरी सोडून गेल्या ६ वर्षांपासून पूर्णवेळ शेती करत आहेत. नवीन पीक पद्धतीचा अवलंब, तंत्रज्ञानाची कास त्यांनी धरली. शेतीत व्यावसायिक दृष्टिकोन जपल्याने आर्थिक प्रगती साधण्यासह शेतीतून प्रतिष्ठा मिळविली आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील बेलगाव तऱ्हाळे (ता. इगतपुरी) येथील अनिल काशिनाथ सोनवणे यांनी २००५ मध्ये कला शाखेतून पदवी मिळविली. एकुलते एक असल्याने वडिलांसोबत शेतीकामांकडे लक्ष देत. सन २००९ मध्ये त्यांना रस्ते महामार्ग विभागात शासकीय नोकरी लागली. मात्र सातत्याने बदल्या होत असल्याने त्यांची धावपळ व्हायची. पत्नी पूजा या खासगी बँकेत नोकरी करत असल्याने कुटुंब अस्थिर होते. नोकरी सोडून कुटुंब स्थिरस्थावर व्हावे असा विचार त्यांच्या मनात २०१४ मध्ये आला. वडील, नातेवाईक यांनी त्यास विरोध केला. मात्र अनिल आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर २०१५ मध्ये राजीनामा देऊन पूर्ण वेळ शेतीची जबाबदारी स्वीकारली.

रुजविली प्रयोगशीलता :
दारणा धरणालगत अनिल यांची शेती आहे. अतिपर्जन्याचा भाग असल्याने येथे भात मुख्य पीक होते. पीकबदल करताना सुरुवातीच्या काळात टोमॅटो घेतला. अनेक संकटे आली. रोग-किडींच्या समस्या वाढल्या. खर्च करूनही अपेक्षित उत्पादन व उत्पन्न हाती आले नाही. दोन एकरांत कोबी लागवड केली. मात्र काढणीवेळीच गारपीट होऊन संपूर्ण नुकसान झाले. दरम्यान, खचून न जाता अभ्यास व निरीक्षणे नोंदविणे सुरू होते. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन काम करण्याची दिशा स्पष्ट होती. पुढे एक एकरात दुधी भोपळा लागवड केली. त्यातून भरघोस उत्पन्न घेतले. काढणी हंगाम सलग ६ महिने चालला. आकार, रंग आकर्षकपणा यामुळे मागणी होती. त्यातून बाजारपेठ व व्यापाऱ्यांमध्ये ओळख निर्माण झाली. यामुळे आत्मविश्‍वास वाढला. शेतीला उत्कृष्ट व्यवस्थापनाची जोड दिल्यास यश निश्‍चित मिळेल याची खात्री झाली. सन २०१६ मध्ये बँकेकडून २१ लाख रुपयांचे अर्थसाह्य घेऊन ‘जीआय स्ट्रक्चर’ असलेल्या शेडनेटची एक एकरांत उभारणी केली. त्यात आजगायत ढोबळी मिरची हे प्रमुख व हुकमी पीक ठरले आहे.

अनिल यांची शेती पद्धती

 • एकूण शेती- १५ एकर, पैकी जिरायती- ९, बागायती ३ एकर
 • पिके- भुईमूग, भात, शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, फेरपालट म्हणून काकडी, झेंडू
 • खुल्या शेतात टोमॅटो, दोडका
 • बदलत्या काळात तंत्रज्ञानाची जोड देत उपलब्ध बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे पिके
 • ढोबळी मिरची
 • फेब्रुवारी- मार्चमध्ये लागवड. हंगाम एकूण ६ महिन्यांचा.
 • पाच फुटी बेड- त्यावर दोन लाइन्स. त्यातील अंतर दीड फूट. दोन झाडांतील अंतर २ फूट.
 • एकरी झाडांची संख्या- साडेअकरा हजार ते १२ हजार
 • वाणाची निवड- ऊन व पावसात तगणारा, भरघोस वाढ, फळाचा रंग गर्द हिरवा, चार कप्पे असलेला आकार, चकाकी व टिकवण क्षमता या बाजू विचारात घेऊन
 • फळाचे वजन सरासरी १२५ ते १५० ग्रॅम असावे याकडे लक्ष.
 • प्रति महिना १८०० किलो तर सहा महिन्यात मिळून एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते.
 • एकरी उत्पादन खर्च- दोन लाखांपुढे
 • टोमॅटो
 • रब्बीत नोव्हेंबरमध्ये व उन्हाळी हंगामात एप्रिल मध्ये लागवड.
 • रोगप्रतिकारक व मध्यम आकाराचे फळ, रंग व टणकपणा विचारात घेऊन वाण निवड.
 • उत्पादन- एकरी ३० ते ३४ टनांपर्यंत
 • दोडका-
 • हे देखील महत्त्वाचे पीक. सोनावणे यांचा दोडका या नावाने बाजारपेठेत लोकप्रिय
 • उत्पादन- एकरी ९ टनांपर्यंत.
 • एकरी खर्च- ७० हजार रुपयांपर्यंत.

बाजारपेठ विश्‍लेषण
मागणीनुसार पुरवठा हे सूत्र ओळखून आवक मंदावण्याच्या काळात माल बाजारात येईल असे लागवडीचे नियोजन असते. नाशिक ही मुख्य बाजारपेठ आहे. सुरत येथेही व्यापाऱ्यांना माल दिला जातो. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे व्यापाऱ्यांत ओळख निर्माण झाली आहे. शेतीमाल सुरू झाल्यानंतर व्यापारी थेट मागणी नोंदवितात. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजारातील विक्री अडचणीत आली. त्यामुळे मुंबई व उपनगरात थेट भाजीपाला विकला.

अलीकडील तीन वर्षांतील दर रु. (प्रति किलो)
पीक   किमान...कमाल..सरासरी
ढोबळी   ३०.    ..६०      ४०
टोमॅटो..२          .४०. .२०
दोडका. .४०.     ६०       .५०

दरांची स्थिती
उन्हाळी हंगामात ढोबळी मिरची व दोडका लागवड असते. त्यामुळे किफायतशीर दर आतापर्यंत मिळाले आहेत. ढोबळीत फळाला चार कप्पे, टणक व एकसमान चकाकी असल्यास दर चांगला मिळतो असा अनिल यांचा निष्कर्ष आहे. लांब, गर्द हिरवा व डाग विरहित दोडक्याला मागणी असते. पूर्वहंगामी व नोव्हेंबरमध्ये केलेल्या लागवडीस दर मिळतात. मात्र ही स्थिती आवकेवर अवलंबून असते.

उन्हाळी भुईमुगाचे यशस्वी उत्पादन :
गेल्या दोन वर्षांपासून दोन एकरांत उन्हाळी भुईमूग घेतात. दोन दाणे असलेल्या जाडजूड वाणात तेलाचे प्रमाण अधिक आहे. टोकण पद्धतीने सरी वरंबा पद्धतीने लागवड होते. सिंचनासाठी रेन पाइपचा वापर होतो. एकरी २० ते २३ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. नारायणगाव (पुणे) बाजारात प्रति क्विंटल ५ हजार रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे.

नियोजनातील वैशिष्ट्ये

 • उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी माती- पाणी परीक्षण करून खतांचे नियोजन
 • दर तीन दिवसांनी झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतांची मात्रा. विद्राव्य खतांचा वापर करताना वेळापत्रक निश्‍चित. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांची गरज ओळखून.
 • बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, जस्त यांची तूट भरून काढली जाते.
 • रोग विरहित रोपांची लागवड
 • शेडनेटमध्ये दोन वर्षांतून फेरपालट पद्धतीचा अवलंब. सूत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडू लागवड.
 • जमीन सपाटीकरण, सूक्ष्मसिंचन व्यवस्था उभारून शेतीची पुनर्रचना
 • समान पाणी वितरण करणारी सूक्ष्म सिंचन प्रणाली
 • पाणी शुद्धीकरण होण्यासह सामू नियंत्रण करण्यासाठी सँड फिल्टर कार्यान्वित
 • हवामान बदलांच्या सूचना प्राप्त होण्यासाठी अद्ययावत माहितीच्या प्रणाली स्रोतांचा अवलंब
 • शेडनेटमध्ये तापमान वाढल्यास फॉगरद्वारे सूक्ष्म फवारे तर थंडीत हॅलोजन दिव्याचा वापर करून तापमान नियंत्रण
 • कीड नियंत्रणात चिकट व प्रकाश सापळे यांचा वापर
 • शिफारशीनुसार द्रव स्वरूपात रासायनिक कीडनाशक फवारण्या सायंकाळी, तर भुकटी स्वरूपात धुरळणी सूर्योदयापूर्वी केली जाते. अत्याधुनिक फवारणी व धुरळणीसाठी यंत्र आहे.

व्यवस्थापनातील कौशल्य
नोकरीत असतानाही अनिल यांना शेतीत काम सवय होतीच. आज शेतीतील प्रगती पाहताना पूर्वीच नोकरी सोडायला हवी होती असे ते सांगतात. पत्नी पूजा यांनीही बँकेतील नोकरी सोडून शेतीतील आर्थिक लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी उचलली आहे. बँकिंग क्षेत्राचा पूर्वानुभव यात उपयोगी ठरत आहे. आई-वडिलांसह अनिल यांचा पूर्ण परिवार सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेतीच व्यस्त असतो. वडील काशिनाथ सदैव मार्गदर्शन करतात. आई इंदूबाई मजुरांवर देखरेख ठेवतात. दहा मजुरांना वर्षभर रोजगार दिला आहे. त्यांची योग्य काळजी ते घेत असतात. खर्चाच्या नोंदी, ताळेबंद नियमित ठेवून उद्योग म्हणून नियोजन केल्यास तोटा येत नाही असे ते म्हणतात. अर्थकारण उंचावल्याने तालुक्यात अनिल यांची ‘प्रयोगशील शेतकरी’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देतात. अनिल देखील प्रयोगशील शेतकऱ्यांकडे जाऊन त नव्या प्रयोगाची पाहणी करतात. भविष्यात मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय सुरू करण्याची तयारी आहे. फुलशेतीचाही अभ्यास करीत आहेत.

संपर्क : अनिल सोनवणे, ८५५४८९७२००


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...