सुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता अन्‌ व्यावसायिकता

अनुप गांजरे यांची संत्रा बाग
अनुप गांजरे यांची संत्रा बाग

अमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील अनुप नारायण गांजरे यांनी व्यावसायिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे. सुमारे २५ एकरांवरील संत्रा पिकाचे व्यवस्थापन करणाऱ्या अनुप यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासोबतच केळी, हळद यांसारखी पिके घेत आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे. त्यासोबतच सुमारे २७ एकर करार शेतीत कापसाची लागवडही केली आहे.   अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यातील सुरळी येथील अनुप गांजरे यांनी दहावीनंतर कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची वडिलोपार्जित सुमारे २५ एकर शेती आहे. व्यावसायिक पीकपध्दतीच्या बळावर मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून त्यांनी पाच एकरांची जोड देत क्षेत्र ३० एकरांवर नेले आहे. त्यासोबतच सुमारे २७ एकर कापूस शेती ते करारावर करतात. सद्य:स्थितीत २५ एकर संत्रा, चार एकर केळी, दोन एकर हळद अशी पीकपध्दती आहे. सिंचनाची सोय असलेल्या शिवारासाठी एकरी १५ हजार रुपये तर कोरडवाहू भागासाठी १० हजार रुपये प्रतिवर्ष भाडेशुल्क राहते. पट्टा पध्दतीने कापूस लागवड साडेतीन बाय सात फूट अंतरावर पट्टा पध्दतीने कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून याच पध्दतीच्या लागवडीवर भर आहे. ही पध्दत अंबोडा (जि. यवतमाळ) येथील प्रगतिशील शेतकरी अमृतराव देशमुख यांच्याकडून आत्मसात करण्यात आली आहे. एकरी २३ क्‍विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मागील वर्षी मिळाले. पूर्वीच्या एकरी उत्पादनात आता वाढ होऊ लागली आहे. कापसाची ५७०० रुपये प्रतिक्विंटल दराने गावातील व्यापाऱ्याला विक्री झाली. गेल्यावर्षी उत्पादन खर्च २० हजार रुपये झाला होता. अमृतराव यांच्या तंत्रज्ञानाचा लाभ होताना दिसत असल्याने यंदा हे क्षेत्र २७ एकरांवर नेले. पाऊस लांबल्याने यावर्षी कापसाचा हंगामदेखील वाढीस लागला आहे. त्यामुळे सध्या वेचणीचे काम सुरू झालेले नाही. संत्रा व्यवस्थापन संत्र्याचा आंबिया बहार घेण्यावर त्यांचा भर राहतो. सेंद्रिय आणि रासायनिक व्यवस्थापन पध्दतीचा मध्य साधत उत्पादन घेतले जाते. नियमित माती परीक्षणावरही भर असतो. दुर्गापूर (बडनेरा) कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिती कळण्यास मदत होते आणि सुपीकताही जाणता येते असे अनुप सांगतात. एक डिसेंबरपासून बाग ताणावर सोडली जाते. त्यानंतर दहा ते १५ जानेवारीपासून बागेला पाणी देण्यास सुरवात होते. पाणी देण्यापूर्वी प्रती झाड ३० किलो याप्रमाणे शेणखत दरवर्षी दिले जाते. एक- दोन पाणी दिल्यानंतर १०-२६-२६ प्रतिझाड एक किलो, सल्फर, निंबोळी पेंड तसेच अन्य सेंद्रिय निविष्ठांचा गजरेनुसार वापर होतो. सोबच ठिबकद्वारे जीवामृत देण्यात येते. सिलीकॉनयुक्त घटकाची फवारणी केल्यास फळावर आवरण चढत तापमानापासून फळांचा बचाव होण्यास मदत होते असेही अनुप सांगतात. शेतातील तणाचा काढून मल्चिंगसारखा वापर होतो. त्यामुळे उन्हाची तीव्रता व जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. आंबिया बहारातील फळे नोव्हेंबरमध्ये काढणीस येतात. त्यानुसार आता काढणी सुरू आहे. संत्र्याचे उत्पादन सेंद्रिय व रासायनिक असा मेळ घालणाऱ्या अनुप यांना गेल्यावर्षी एकरी १३ टन संत्र्यांचे उत्पादन मिळाले. दर २२ हजार रुपये प्रतिटन मिळाले. यावर्षी ३० हजार रुपये दरांमाणे व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे यावर्षी फायदा अधिक होणार आहे. संत्र्याच्या एकरी व्यवस्थापनावर प्रती झाड दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो. एकरी सुमारे १२५ झाडे राहतात. हुंड्यात देतात बाग ऑगस्टमध्ये म्हणजे पेरूच्या आकाराची फळे बागेत असतात त्या वेळी व्यापारी बागेत येतात. फळांचा दर्जा पाहून दर ठरतो. एक तृतीयांश पैसे आगाऊ देऊन तोडणीवेळी व्यवहारातील उर्वरित रक्‍कम दिली जाते, याला हुंडा पध्दतीचा व्यवहार म्हणतात. अनुप यांनी याच पध्दतीने बाग विक्रीत काही वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. यावर्षी व्यापाऱ्यांनी २७ लाख रुपयांत १९ एकर क्षेत्रातील संत्रा बागेचा सौदा केला आहे. त्यातील एक तृतीयांश रक्‍कम अनुप यांना मिळाली आहे. हळदीची शेती गेल्यावर्षीपासून सेलम जातीच्या हळदीची लागवड होत आहे. गेल्यावर्षी एकरी १०० क्‍विंटल ओल्या हळदीचे उत्पादन झाले. तर २० क्‍विंटल बेणे म्हणून विकण्यात आले. सुमारे ५६०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने हळकुंडांची विक्री करण्यात आली. या भागात हळदीची स्वतंत्र बाजारपेठ नसली तर काही व्यापारी खरेदी करतात. यावर्षी गादीवाफा, ठिबक यांसारख्या बाबींवर भर दिला आहे. त्यातून हळदीची गुणवत्ता सुधारण्यासोबतच उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा आहे. केळीची पहिल्यांदाच लागवड प्रयोग करण्याची धडपड आणि व्यवसायिकता जोपासलेल्या अनुप यांनी यावर्षी पहिल्यांदाच जूनमध्ये चार एकरांवर केळी लावगड केली आहे. सुरळीनजीकच्या काही गावांमध्ये शेतकरी केळी घेतात. त्यांच्याच अनुकरणातून आपण या शेतीत यशस्वी होऊ असा त्यांना विश्‍वास आहे. पाणी व्यवस्थापन तीन बोअरवेल्स, एक विहीर असे स्रोत आहेत. परंतु, एकाच बोअरवेलला पाणी आहे. विहिरीलाही जेमतेम पाणी राहते. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले. त्याकाळात ठिबकव्दारे नियोजनबध्दरित्या पाणी देत बाग जगविण्यात यश आले. पाणी देण्यासाठी ‘ऑटोमेशन’ पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यावर सुमारे सात लाख रुपयांचा खर्च झाला. त्यापूर्वीच २५ एकर क्षेत्र ठिबकखाली आणले होते. शेणखताची उपलब्धता दोन बैल, चार गाईंचे संगोपन होते. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणखतासोबतच साडेसहा हजार रुपये दराने एक मिनीडोअर शेणखताची उपलब्धता अमरावती तसेच बडनेरा भागातील व्यवसायिकांकडून होते. दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांचे शेणखत विकत घेत असल्याचे अनुप यांनी सांगितले.  संपर्क- अनुप गांजरे-९३७३६०७६६१, ७३८७५८१७६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com