अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय आणला आकारास

शेळके यांच्याकडील गीर गायी
शेळके यांच्याकडील गीर गायी

भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि शेळीपालनही करण्याचे प्रयत्न पळशी (जि. औरंगाबाद) येथील अल्पभूधारक शेतकरी आप्पासाहेब गंगाधर शेळके यांनी केले. काही तांत्रिक कारणांमुळे त्यात यश मिळाले नाही. आता मात्र पूर्ण नियोजनातून देशी गीर गायींवर आधारित दुग्धव्यवसाय त्यांनी आकारास आणला आहे. इंटरनेट व सोशल मीडियाचा कार्यक्षम वापर करून ग्राहकांत दर्जेदार दुधाचे महत्त्व ठसवणे व चांगला दर मिळवणे यात त्यांना यश आले आहे. आता शेण, गोमूत्रावर आधारित उत्पादनांकडे ते वळणार आहेत.   औरंगाबाद जिल्ह्यातील आप्पासाहेब शेळके यांची पळशी शिवारात शेती आहे. सन २००८-०९ पर्यंत तीन भावंडांच्या एकत्रित कुटुंबाच्या वाटण्या झाल्या. त्यानंतर आप्पासाहेबांच्या वाट्याला दोन एकर शेती आली. कुटुंबात पत्नी, दोन मुले. दोन ठिकाणी असलेल्या या शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून एक विहीर आहे. त्यामुळे हंगाम बागायतच शेती आहे. एकत्रित कुटुंबात २००६ पर्यंत भाजीपाला शेती होती. त्यात मेथी, वांगे, टोमॅटो, मिरची, पालक आदी प्रमुख पिके असायची. मात्र, खर्च जाऊन हाती पदरात फारसे काही पडायचे नाही. रेशीम उद्योग सन २००७-०८ मध्ये आप्पासाहेबांनी रेशीम व्यवसायाची कास धरली. त्यासाठी एक एकरावर तुतीची लागवड केली. वर्षभरात चार बॅचेस घेत आप्पासाहेब प्रति बॅचमधून साधारणत: ८० ते ११० किलोपर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन घ्यायचे. त्या वेळी १५० ते कमाल ३०० रुपये प्रतिकिलो दर मिळायचा. उद्योगातून खर्च वजा जाता वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे. परंतु, रेशीम कीटकांची सातत्याने मरतूक व्हायची. अखेर खर्च वाढत गेला. अखेर हा व्यवसाय सोडण्याची वेळ आली. सुरू केले शेळीपालन आप्पासाहेबांनी जिद्द काही सोडली नाही. एकतर क्षेत्र अत्यल्प होते. त्यातून उदरनिर्वाह चालवणे गरजेचे होते. काय करावं या विवंचनेत असलेल्या आप्पासाहेबांना शेळीपालन व्यवसाय अर्थार्जन मिळवून देणारा असल्याची माहिती मिळाली. चाचपणी करत त्यांनी पंचायत समितीमार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्ज सादर केला. त्यांना ४० शेळ्या व दोन बोकड मिळाले. सन २०१० ते २०१४ दरम्यान हा व्यवसाय नेटाने केला. खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपये मिळायचे. परंतु, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मरतुकीमुळे हा व्यवसायही थांबवावा लागला. शोध आणि चिंतनातून दुग्धव्यवसाय आप्पासाहेबांनी अजूनही हार मानली नाही. पशुसंवर्धन विभागाचे श्री. चव्हाण, वेरूळ येथील शांतीगीरी महाराज यांच्याशी संवाद केला. त्यातून गीर गोवंशाचे पालन व दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा सल्ला मिळाला. या व्यवसायाची चाचपणी व अधिक अभ्यास केला. दर्जेदार गीर गाय मिळण्याचा शोध सुरू केला. महाराजांच्या सल्ल्यातून तो येवला येथे जाऊन थांबला. तेथून दोन गीर गायी घेतल्या. मग २०१५-१६ पासून व्यवसाय सुरुवात केली. दुधाला मिळवले ग्राहक गीर गायींचे संगोपन, देखभाल व दुधाची दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही दिवस दूध डेअरीला पुरवले. दर्जा उत्तम असूनही केवळ २० रुपये प्रतिलिटरचा दर मिळत होता. खर्चाला ते परवडणारे नव्हतेच. देशी दुधाला ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याने त्यांनाच थेट विक्री करण्याचे प्रयत्न सुरू केले. वकील, डॉक्टर असे ग्राहक मिळाले. त्यांना 'रतीब' सुरू झाले. त्यातून आठ ते दहा लिटर दूध ४० रुपये प्रति लिटरने जाणे सुरू झाले. दुधाचे केले प्रभावी मार्केटिंग अर्थात अन्य ठिकाणी या दुधाला शंभरीपार प्रतिलिटर दर मिळत असताना आपल्याला कमी दर का मिळतो याची खंत लागून होती. त्यासाठी जाणकारांकडे विचारपूस केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला मुलगा गणेश याने दुधाचे महत्त्व अभ्यासण्यासाठी व ते ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला. तशी माहिती संकलित केली. त्यासाठी ब्लॉग व संकेतस्थळ (वेबसाइट) तयार केले. सोशल मीडियाच्या आधारे आपल्या दुग्धव्यवसायाची, दुधाच्या दर्जाची, घटकांची माहिती देणे सुरू केले. ग्राहकांनी थेट फार्मला भेट देऊन दूध खरेदी करण्याविषयी निर्णय घ्यावा असे आवाहन केले. त्याचा परिणाम झाला अन्‌ ग्राहक जोडण्यास सुरुवात झाली आणि दराचा प्रश्‍नही मार्गी लागला. आप्पासाहेबांच्या शेतीविषयी

  • सध्या केवळ दुग्धव्यवसायावर लक्ष केंद्रित
  • चाऱ्याची सोय होण्यासाठी मुरघासाची निर्मिती
  • एक एकरवर मका, दोन गुंठ्यात डीएचएन-१० गवत
  • वर्षभरापूर्वी एक एकरात सीताफळ
  • दुग्धव्यवसायाविषयी

  • सध्या लहान-मोठ्या मिळून गायींची संख्या १५
  • त्यातील सहा विकत घेतलेल्या. गोठ्यात पैदास करण्यावर भर.
  • ५० बाय २० फूट आकाराचा गोठा
  • पाण्यासाठी विहिरीचा स्रोत
  • रोजचे दूध संकलन- (वार्षिक सरासरी) दिवसाला २२ लिटर
  • दर- ८० रुपये प्रति लिटर
  • कासेतील २५ टक्‍के दूध वासराला देण्याचे पथ्य
  • व्यवसायातील नफा- सुमारे ४० टक्के
  • मुक्‍त संचार गोठ्याचा वापर
  • महिन्याला सुमारे एक ट्रॉली शेण उपलब्ध
  • आता लक्ष प्रक्रियेकडे आप्पासाहेबांनी दुग्धव्यवसायात स्थिरता येऊ लागल्यानंतर शेण व गोमूत्रांपासून तयार होणाऱ्या पदार्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी गोशाळांमधून व पशुसंवर्धन विभागाकडून प्रशिक्षण घेतले आहे. गोवरी, धुपकांडी, दंतमंजन तयार करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात गायींची संख्या वीसपर्यंत नेण्याचा मानस आहे. सध्या २० रुपये प्रति लिटरने गोमूत्राची विक्री होते. विशेष म्हणजे शेळके दांपत्याने पूर्णवेळ या व्यवसायाला वाहून घेतले आहे. मुलगा गणेशचीही मोठी मदत होते.   संपर्क- आप्पासाहेब शेळके-९८२३२७८८१९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com