agriculture story in marathi, aquaculture, bhadgaion, akkalkuva, nandurbar | Agrowon

मासेमारी व्यवसायातून झाली शेतकरी कुटुंबे आर्थिक सक्षम 

चंद्रकांत जाधव 
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात अतिदुर्गम व नर्मदा नदीकाठावरील खर्डी खुर्द (ता. धडगाव) व लगतच्या पाड्यांवर मासेमारी व्यवसायामुळे येथील शेतकऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. खर्डी खुर्द येथे सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना झाली अाहे. त्याद्वारेही माशांची खरेदी केली जाते. इंदूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी थेट धडगावात येऊन त्याची खरेदी करतात. यामुळे हमीचा आर्थिक स्राेत शेतकऱ्यांना मिळाला आहे. तरंगत्या पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धनाचा प्रकल्पही यावर्षी सुरू झाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात अतिदुर्गम व नर्मदा नदीकाठावरील खर्डी खुर्द (ता. धडगाव) व लगतच्या पाड्यांवर मासेमारी व्यवसायामुळे येथील शेतकऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. खर्डी खुर्द येथे सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना झाली अाहे. त्याद्वारेही माशांची खरेदी केली जाते. इंदूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी थेट धडगावात येऊन त्याची खरेदी करतात. यामुळे हमीचा आर्थिक स्राेत शेतकऱ्यांना मिळाला आहे. तरंगत्या पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धनाचा प्रकल्पही यावर्षी सुरू झाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील ३३ गावे सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झाली. त्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे. धडगाव तालुक्‍यातील शेलगदा, चिंचखेडी व खर्डी खुर्द या गावांतील काही शेतकऱ्यांची जमीन बुडीत क्षेत्रात जाऊन एक ते दीड एकरच शिल्लक राहिली. या भागात मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय केला जातो. खर्डी खुर्दपासून तालुक्‍याचे ठिकाण सुमारे ३२ किलोमीटरवर तर नंदुरबारपासून खर्डी खुर्द सुमारे १६५ किलोमीटर आहे. हा भाग सातपुडा पर्वतातील अति दुर्गम क्षेत्रात येतो. अलीकडेच गावापर्यंत कच्चा रस्ता झाला आहे. वीज पोचली आहे. मात्र एसटीने जायचे असले तर दोन किलोमीटरची पायपीट करून बिलगावात जावे लागते. ‘मोबाईल’चे देखील ‘नेटवर्क’ नाही. 

खर्डी खुर्दचा मासेमारी व्यवसाय 
इथली शेती पावसावरच अवलंबून आहे. मुरमाड, हलक्‍या जमिनीत ज्वारी, बाजरी, तूर, मका आदी पिके घेतली जातात. कापूस लावला तर पाण्याअभावी नुकसान होते. अशा स्थितीत मासेमारी व्यवसायावरच या भागातील शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. व्यवसायाला सहकारी सोसायटीच्या मदतीने वाढविण्यासह रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने प्रयत्न केले. यातून खर्डी खुर्द येथे कुमबाय कुंदराणा नर्मदा सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना २०१५ मध्ये झाली. त्याचे ५१ सदस्य असून यातील ४८ जणांना होड्यांचे वितरण झाले आले आहे. ही सोसायटी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यसंवर्धन विभागांतर्गत सहायक निबंधक (धुळे) यांच्याकडे नोंदणीकृत आहे. 

मासेमारी हंगाम व अर्थकारण 
देवाज्या रामसिंग पावरा सोसायटीचे अध्यक्ष आहेत. होड्यांसाठी शासनाकडून अर्थसाह्य तसेच मासे पकडण्यासाठी मजबूत जाळे व अन्य यंत्रणाही उपलब्ध झाली. मासेमारी बारमाही चालते. परंतु ऑगस्टच्या मध्यात व सप्टेंबरमध्ये चांगला हंगाम असतो. नर्मदा नदीत रोहू, कतला व भातमासे अधिक मिळतात. भातमासे बारमाही तर रोहू व कतला जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंतच उपलब्ध असतात. माशांची खरेदी सोसायटी ७० रुपये प्रतिकिलो दराने करते. विक्रीसाठी धडगावात जावे लागते. तेथे १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळतो. इंदूरचे व्यापारी खरेदी करतात. चार-पाच जणांचे गट खर्डी खुर्द येथे तयार झाले आहेत. दर महिन्याला ८ हजार ते १२ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. हंगामात पाच जणांच्या गटाला प्रतिदिन ५०० ते १५०० रुपयांपर्यंत उत्पन्नही मिळते. सोसायटीलाच माशांची विक्री करावी असे बंधन सभासदांवर नाही. अधिक दर मिळत असतील तर ते अन्य व्यापाऱ्यांनाही विक्री करू शकतात. 

सोसायटीचे यश- व्यवसायातील ठळक बाबी 

  • खर्डी खुर्दमधील सुमारे २०० जणांचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर अवलंबून 
  • सोसायटीला माशांची वाहतूक करण्यासाठी मालवाहू वाहन नर्मदा नियंत्रण प्राधिकरणअंतर्गत नंदुरबार येथील मत्स्यव्यवसाय विभागाकडून उपलब्ध 
  • खर्डी खुर्दच्या पलीकडे नर्मदा काठावरील दुपखेडा व सकरजा (जि. मध्य प्रदेश) या गावांमध्येही सहकारी मच्छीमार सोसायट्यांची स्थापना 
  • मध्य प्रदेशातील अंजनवारा (जि. अलिराजपूर) गावातील शिलदार मोघा पावरा व शेंड्या पावरा हेदेखील मासेमारीनिमित्त खर्डी खुर्दच्या सोसायटीअंतर्गत काम करतात. 
  • गेल्यावर्षी सुमारे ७० लाख मत्स्यबीज नर्मदा नदीत खर्डी खुर्द व परिसरात सोडण्यात आले. 

मासेमारीने दिला आर्थिक हात 
नर्मदा काठावरील धडगाव तालुक्‍यातील सावऱ्या दिगर, अकाईपाडा, बोमणा, खोपरमाळ येथील शेतकरीही लहान मासे पकडून, ते वाळवून धडगावात विक्री करतात. त्यास १५० रुपयांच्या पुढे व साधारण २०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. सावऱ्या दिगर येथील जत्या पुट्या पावरा अनेक वर्षांपासून मासेमारी करतात. त्यांती तिन्ही मुले मदत करतात. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची कमाई होते. वसंत बामट्या पावरा या भुसा (ता. धडगाव) येथील युवकाची जमीन सरदार सरोवरच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यांच्याकडे शेती नाही. ते आपल्या बंधूंसह मासेमारीचा व्यवसाय करतात. शासकीय बोटीवर ते चालक आहेत. खर्डी खुर्द मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष देवाज्या यांचा मुलगा तुरसिंग, संजय, मुलगी रेखा व पत्नी मेथी हेदेखील मासेमारी व्यवसायात मदत करतात. त्यांची तीन एकर शेती कोरडवाहू आहे. खरिप हंगामावरच ती अवलंबून आहे. 

बाधित गावांमध्ये तरंगते पिंजरे 
सरदार सरोवराच्या ‘बॅकवॉटर’मुळे बाधित अक्कलकुवा तालुक्‍यातील मणीबेली, चिमलखेडी व धडगाव तालुक्‍यांतील खर्डी खुर्द, चिंचखेडी आणि शेलगदा येथे सहकारी मच्छीमार सोसायट्या स्थापन झाल्या. त्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची मदत मिळाली. सरदार सरोवर प्रकल्पअंतर्गत कृती कार्यक्रमाद्वारे या गावांमध्ये नर्मदा नदीत तरंगच्या पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन कार्यक्रमास सुरवात झाली. यात ४८ पिंजरे, पंगा सीएस प्रकारचे मत्स्यबीज आणि माशांचे खाद्य यासठी १०० टक्के अनुदान उपलब्ध केले. सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांचे वर्सोवा (मुंबई) येथील मत्स्य विषयाशी संबंधित महाविद्यालयात प्रशिक्षण झाले. सद्यस्थितीत दोन लाख ४० हजार मासे खर्डी खुर्दनजीकच्या पिंजऱ्यांमध्ये सोडले आहेत. सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग (नंदुरबार व धुळे) यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम सुरू आहे. नर्मदा नदीत नामशेष होत असलेल्या महाशीर माशाचेही संवर्धनही सुरू असून त्याचे मत्स्यबीज नदीत सोडले आहे. 

संपर्क- देवाज्या पावरा-९४०३४३७३१६ 
खर्डी खुर्द (ता.धडगाव) 
किरण पाडवी-९८२२२०४९१८ 
सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, नंदुरबार 
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...