डीफ्युजर’ तंत्राने वाढवली सिंचन कार्यक्षमता, चाळीस एकरांत यशस्वी प्रयोग

नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी अरुण पवार यांनी १०० एकरांतील शेवगा पिकांपैकी ३० एकर व डाळिंबाच्या १० एकरांतमटका सिंचन, अर्थात डीफ्युजर तंत्राचा वापर अत्यंत खुबीने केला आहे. त्यातून ४० ते ५० टक्के पाणी बचतीसह सिंचन कार्यक्षमता वाढवली.
शेवगा बागेत प्रति झाडाला असे मटके बसविले आहेत
शेवगा बागेत प्रति झाडाला असे मटके बसविले आहेत

नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी अरुण पवार यांची एकत्रित कुटुंबाची शेती आहे. त्यांनी १०० एकरांतील शेवगा पिकांपैकी ३० एकर व डाळिंबाच्या १० एकरांत मटका सिंचन, अर्थात डीफ्युजर तंत्राचा वापर अत्यंत खुबीने केला आहे. त्यातून ४० ते ५० टक्के पाणी बचतीसह सिंचन कार्यक्षमता वाढवली. व्यवस्थापनाला या तंत्राची जोड मिळाल्याने मालाची गुणवत्ता, चकाकी व एकरी उत्पादनवाढीस मदत मिळाली आहे.   नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून कृषिभूषण अरुण पवार यांचे नाव प्रसिद्ध आहे. शेवगा व डाळिंब ही त्यांची मुख्य पिके आहेत. त्यांचे सुमारे २७ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. मालेगाव तालुक्यात माळमाथा परिसरात उन्हाळ्यात सिंचनाचा प्रश्‍न निर्माण होतो. सन २०११ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडल्याने पवार यांना शेवगा व डाळिंब बाग जगविणे जिकरीचे झाले. हे दुष्काळाचे चक्र दर तीन चार वर्षांनी भेडसावते. प्रमुख स्रोत विहिरी असल्याने पाणीसाठा संपुष्टात यायचा. पाणी विकत घेण्यासाठी १० लाखांवर खर्च यायचा. तरीही पाणी खरेदी करून बागा जगविणे सुरू होते. खर्च आवाक्याबाहेर जात होता. डीफ्युजर तंत्राचा मार्ग अशा परिस्थितीत काटेकोर सिंचन व त्याची कार्यक्षमता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सन २०११ मध्ये कोकणात जाऊन आंबा बागेत डीफ्युजर तंत्रज्ञानाचा होणारा वापर अभ्यासला. त्यानंतर त्याचा वापर सुरू केला. स्थानिक मातीपासून बनवलेले मटके उन्हात तापते. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांना हानी पोहोचते. मात्र कोकणातील लाल मातीपासून बनवलेल्या मटक्यांमध्ये तापण्याचे प्रमाण कमी व थंड होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रति नग ३५ रुपयांप्रमाणे या मटक्याची उपलब्धता केली. टप्प्याटप्प्याने क्षेत्र वाढवत ३० एकर शेवगा व १० एकर डाळिंब अशा आजमितीला ४० एकर क्षेत्रावर या तंत्रज्ञानाचा वापर दहा वर्षांपासून सुरू आहे. तंत्राची रचना

  • तीन लिटर पाणी क्षमतेचे एक फूट आकाराचे लंब गोलाकार भांडे वा मटका
  • पाणी पाझरण्यासाठी त्याच्या खालील भागात पाच छिद्रे
  • झाडाच्या मुळीक्षेत्रालगत २ बाय २ फूट आकाराचा खड्डा घेतला जातो.
  • त्यात झाडाच्या गरजेनुसार सेंद्रिय किंवा रासायनिक खते भरून त्यावर मटका बसविण्यात येतो.
  • वेस्ट डी कंपोजररचा वापर करून कंपोष्ट खत तयार केले जाते.
  • वर्षातून एकदा खड्डा कंपोष्ट खत किंवा ०:५२:३४, १९:१९:१९ या खतांच्या मात्रेत नव्याने भरला जातो.
  • ठिबकची तोटी मटक्याच्या वरील भागात बसविली आहे. मटक्यात पाणी पडून त्याचा पाझर होऊन पाणी वा खतांची मात्रा थेट मुळ्यांना मिळते.
  • जिवामृत व विद्राव्य खते देणेही शक्य झाले.
  • तंत्रवापराचे क्षेत्र (एकर) पीक ..    क्षेत्र...    एकरी झाडे     प्रति झाड मटका .  शेवगा   ३० एकर.   १००० .            १  डाळिंब  १० एकर     ३५०.              २  मटका बसवण्याचा खर्च- मजुरी व खतांसह प्रति नग- ४० रु. तंत्राचे झालेले फायदे

  • खड्डा ज्या खोलीत बसवला त्या जागेत पाणी झिरपत असल्याने पांढऱ्या मुळ्यांजवळ कायम वाफसा.
  • उन्हाच्या तीव्रतेतही ओलावा टिकून.
  • झाडांना अन्नद्रव्य पुरवठा संतुलित मात्रेत. त्यामुळे झाडाची अन्नग्रहण क्षमता वाढली.
  • अरुण यांचे धाकटे बंधू महेश सांगतात, की पूर्वी उन्हाळ्यात ठिबकचे चार तास ड्रीपर चालवले तर एकरी १६ ते १७ लिटर पाणी एक आड एक दिवस दिले जायचे. आता हेच ड्रीपर दोन तास चालवून पाण्याचा कार्यक्षम वापर अवघ्या ८ लिटरपर्यंत आला आहे. याचा अर्थ ५० टक्क्यांपर्यंत पाण्यात बचत होत आहे.
  • पाण्याचा अपव्यय टाळता आल्याने सूत्रकृमी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला.
  • एकूण व्यवस्थापनाला तंत्राची जोड मिळाल्याने उत्पादकता, मालाची गुणवत्ता वाढली आहे.
  • अति सूर्यप्रकाशात फळांची वाढ, रंग, चव, गर भरणे, शेंगाची वाढ आखूड असणे आदींविषयी अडचणी यायच्या. आता त्या सोडविल्या गेल्या.
  • तंत्राचा वापर वर्षभर शक्य असल्याने फळबागेत नियोजनानुसार कधीही बहर घेणे शक्य
  • उन्हाळ्यात फळगळ कमी
  • तणनियंत्रण करण्याची गरज कमी झाल्याने मजुरी खर्चात बचत
  • समतोल सिंचनामुळे झाडाचे आरोग्य सुधारण्यासह रोगप्रतिकारशक्तीत वाढ
  • उत्पादन           पूर्वी          अलीकडे

    डाळिंब        . १० ते ११ टन    १२ ते १५ टन

    शेवगा         १२ ते १४ टन       १५ ते १७ टन                    (वर्षभरात दोन हंगाम)

    प्रभावी जलव्यवस्थापन गेल्या दहा वर्षांत दुष्काळाची तीव्रता कमी जाणवली. सन २०१९ मध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर होती. आता विहीर पुनर्भरण व जलसंधारण करून संरक्षित पाणीसाठा आहे. झाडांचे अवशेष बोदावर वापरले जातात. त्यातून बाष्पीभवन रोखून आर्द्रता ठेवण्यात फायदा होतो. पूर्वी संरक्षित पाणीसाठा नसताना पाणीटंचाईत २०११ व १२ मध्ये ११ ते १२ लाख रुपये खर्च झाला. त्यासाठी टँकरद्वारे पाणी खरेदी करावी लागायची. आता ही समस्या कायमची सुटली आहे.   संपर्क : महेश पवार, ७२१८९८३४३१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com