काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक पध्दतीत यश 

अशोक  महाजन यांची निर्यातक्षम केळी
अशोक महाजन यांची निर्यातक्षम केळी

नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व ऋषीकेश या महाजन पितापुत्रांनी पीकपध्दतीचे व पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन सांभाळले आहे. हंगामनिहाय सिंचनाचे वेळापत्रक तयार केले आहे. पाणी मुबलक असले तरी त्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोजून मापून पाणी दिले जाते. पाण्यासह खतांचाही अतिवापर टाळल्याने जमिनीचा पोत कायम राखण्यास मदत झाली. महाजन निर्यातक्षम केळीचे उत्पादन मागील १० वर्षांपासून घेत आहेत. काश्‍मिर, पंजाबमधील मोठे खरेदीदार त्यांच्या केळीची थेट शेतातून खरेदी करतात.  जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) हे तापी काठावर वसले आहे. काळी कसदार, मध्यम, मुरमाड प्रकारची जमीन या भागात आहे. तापी नदीमुळे या भागात समृद्धी नांदताना दिसते. शिवारात केळी, कापसाची पिके डोलत असतात. बारमाही बागायती शेती या भागात पाहण्यास मिळते. नायगावातील अशोक व ऋषीकेश या महाजन पितापुत्रांची सुमारे ४५ एकर जमीन आहे. बहुतांश जमीन मुरमाड असल्याने त्यावर गाळ, माती टाकून ती सुपीक करण्यात आली आहे. तापी नदीवरून दोन जलवाहिन्या केल्या असून एक विहीरही आहे. ऋषीकेश हे कृषी पदवीधर असल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतीत होतो. केळीची दरवर्षी सुमारे २० एकर, हळदीची पाच एकर, तुरीची १२ एकर तर कापसाची चार एकरात लागवड असते.  व्यवस्थापनातील बाबी  केळीची निर्यातक्षम शेती होते. उतीसंवर्धित रोपांचा वापर होतो. पाण्याची गरज कमी व्हावी किंवा लागवडीनंतर सिंचनाचा कालावधी अधिक वाढू नये, यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात केळी लागवडीचा प्रयत्न असतो. लागवड पाच बाय सहा फूट अंतरावर व उंच गादीवाफ्यावर असते. यामुळे क्षेत्रात वाफसा कायम राहतो. हिवाळ्यात प्रतिदिन एक तास पाणी देण्यात येते. दोन ड्रीपर्समधील अंतर सव्वा फूट असून केळीच्या प्रतिखोडाला चार ड्रीपर्सद्वारे पाणी मिळते. ताशी दोन लीटर पाणी प्रत्येक ड्रीप देते. उन्हाळ्यात किमान २५ लिटर पाणी प्रतिझाडाला लागते. सिंचनाप्रमाणे खतांचेही वेळापत्रक केले आहे. केळीची प्रती २६ किलोपर्यंतची रास मिळवितात. काढणी एप्रिल ते मे अखेर सुरू असते. पंजाब, काश्‍मिर येथील मोठे खरेदीदार रेफर व्हॅनमधून जागेवरच खरेदी करतात. बॉक्‍समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक उत्तर भारतात विविध मध्यस्थांच्या माध्यमातून केली जाते. काढणी मे अखेर संपते. काढणी ११ महिन्यांत पूर्ण होईल यावर कटाक्ष असतो. निम्म्या क्षेत्रात पीलबाग असते. तर उर्वरित १२ एकरात तुरीचे बीजोत्पादन घेण्यात येते. केळी व अन्य कोणत्याही पिकाचे अवशेष न जाळता त्यांचा खत म्हणून वापर होतो. यामुळे जमिनीमधील वाफसा टिकतो. जमिनीची ओलावा टिकविण्याची क्षमता वाढल्याचे निरीक्षण ऋषीकेश यांनी नोंदविले आहे.  तुरीची शेती  तुरीची लागवड सव्वा फूट बाय आठ फूट अंतरावर केली जाते. ठिबकचा वापर असतोच. तुरीला दिवाळीनंतरच पाण्याची देण्याची अधिक गरज भासते. फेब्रुवारीअखेर तुरीची काढणी पूर्ण होते. तुरीचे बेवड असलेल्या क्षेत्रात मग केळी लागवडीची तयारी सुरू होते. तुरीची विक्री मागील दोन वर्षांपासून एका बियाणे उत्पादक कंपनीला करण्यात येत आहे. जागेवरच ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मागील हंगामात मिळाला आहे.  हळदीचे नियोजन  हळदीची लागवड जूनमध्ये गादीवाफ्यावर होते. दोन वाफ्यांमधील अंतर पाच फूट असते. एक वाफा तीन फूट रुंद असतो. त्यावर दोन ओळी हळदीच्या असतात. मार्चच्या सुरवातीला काढणी पूर्ण होते. मग पुढे अती उष्णतेचा सामना करावा लागत नाही. आपसूकच पाण्याची गरज कमी होऊन जाते. विक्री जळगावमधील एका प्रक्रिया उद्योगाला एक हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात मागील हंगामात जागेवरच केली. कापसाची लागवडही पूर्वमोसमी पावसाचा अंदाज घेऊन गादीवाफ्यावर होते. बीटी कापूस वाणाला पसंती असते. डिसेंबरच्या अखेरीस कापसाचे क्षेत्र रिकामे होते.  उत्पादन व उत्पन्न  केळीची प्रती २६ किलोची रास मिळते. मागील दोन वर्षे ११ रुपये प्रतिकिलो दर जागेवरच मिळाला. रमजान महिन्यात कमाल १७ रुपये दर मिळाला होता. मागील दोन वर्षे तुरीला सरासरी ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उत्पादन एकरी १२ क्विंटलपर्यंत मिळते. ओल्या हळदीचे एकरी १४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उत्पादन खर्च एकरी सुमारे ४५ हजार रुपयांपर्यंत येतो. वर्षभरापूर्वी शिजवून प्रक्रिया केलेल्या हळदीला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये दर मिळाला होता. हळदीसाठी सांगलीचे मार्केट आहे. या हंगामात जळगावमध्येच एका कंपनीला ओल्या हळदीची एक हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात विक्री केली. कापसाताही एकरी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. उत्पादन एकरी १२ क्विंटलपर्यंत मिळते. मागील दोन वर्षे सरासरी ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.  संपर्क- ऋषीकेश महाजन-९५७९५३४५३४, ९९६०४३७९३४v

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com