भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी प्रसिद्ध बहिणाबाईंचे आसोदे

दर्जेदार भरताच्या वांगी पिकात शेतकरी.
दर्जेदार भरताच्या वांगी पिकात शेतकरी.

खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे तत्त्वज्ञान, संस्कृती व शेतकऱ्यांचे दुःख मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांचे माहेरगाव म्हणून आसोदे (ता.जि. जळगाव) गावाची ख्याती आहे. भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठीही गाव प्रसिद्ध आहे. येथील वांग्यांसह ज्वारीला पुणे, मुंबई, ठाणे भागांत चांगली बाजारपेठ आहे. वांगी व दादरचे पारंपरिक वाण सुमारे शंभर वर्षांहून अधिक काळ शेतकऱ्यांनी जतन करून ठेवले आहेत. आता जळगाव शहरात आसोदे गावातील शेतकरी, युवकांनी सुमारे ९० भरीत विक्री केंद्रे उभारून त्यास मार्केट मिळवून दिले आहे. साहित्यक्षेत्रात अजरामर झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेरघर म्हणून जळगाव जिल्ह्यातील आसोदे गावची ओळख आहे. जळगाव शहरापासून ते सुमारे पाच किलोमीटरवर आहे. बाराबलुतेदारांच्या या गावात सौहार्द टिकून आहे. सुमारे ३० हजार लोकसंख्या व साडेतीन हजार हेक्‍टर शिवार आहे. कमाल क्षेत्र कोरडवाहू व जमीन काळी कसदार, सुपीक आहे. वांगी पिकासाठी प्रसिद्ध आसोदे गावची दुसरी ओळख म्हणजे येथील भरताची वांगी. राज्यातच नव्हे तर परराज्य, परदेशात ती पोचली आहेत. अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी या वांग्याचे पारंपरिक वाण जतन केले आहे. त्याला शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला असावा असे सांगण्यात येते. दरवर्षी पावसाळा सुरू होताच लागवड सुरू होते. पूर्वी २०० ते २५० हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असायचे. अलीकडे जिल्ह्यात सर्वत्र लागवड होऊ लागल्याने गावातील क्षेत्र १२५ ते १५० हेक्‍टरपर्यंत असते. दिवाळीदरम्यान काढणी सुरू होते. हंगामात दररोज किमान ५० ते ६० क्विंटल वांगी काढणीसाठी उपलब्ध असतात. ‘भरता’चे चतुराईने मार्केटिंग आसोदे गावातील उपक्रमशील शेतकरी, व्यावसायिकांनी आता मागणी ओळखून जळगाव शहरात भरीत विक्री केंद्रे सुरू केली आहेत. सोबत शेवभाजीही दिली जाते. वांगी तुराटी, पऱ्हाटीवर भाजली जातात. गावातील काही गट वांगी भाजून भरताचा पुरवठा जळगावातील केंद्रांना करतात. लुसलुशीत, चवदार वांग्यांच्या भरताला मोठी मागणी जळगावात आहे. काही केंद्रचालक पुणे, डोंबिवली, मुंबई, ठाणे, कल्याण या भागांत मागणीनुसार पुरवठा करतात. मागील दोन-तीन वर्षांत ठाणे, कल्याण, पुणे, जळगाव जिल्ह्यांतील अमळनेर, धुळ्यातील शिरपुरातही आसोदे व जुन्या जळगावमधील मंडळींनी भरीत विक्री केंद्रे सुरू केली आहेत. वांग्याला मिळाला ‘जीआय’ थेट शेतकऱ्यांकडून वांग्यांची खरेदी होते. सुरवातीला दर ३० ते ४० रुपये प्रति किलो, तर डिसेंबरमध्ये ते २५ ते ३० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळतात. या वांग्यांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) नामांकन मिळाले आहे. नवनिर्मिती शेतकरी मंडळाने त्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. गावातील परदेशात स्थायिक झालेल्या युवकही आपल्या परदेशातील निवासस्थानातील परसबागांमध्ये भरताच्या वांग्यांचे पीक घेतात. दादर ज्वारी राज्यात प्रसिद्ध आसोदे येथील शिवारात जलसंकट आहे. परंतु जमीन एवढी कसदार, सुपीक आहे की पूर्वी कोरडवाहू गहू या शिवारात घेतला जायचा. मालदांडी ज्वारीची पेरणी शिवारात दसरा सणाला कोरडवाहू क्षेत्रात केली जाते. दरवर्षी सुमारे दीड ते दोन हजार हेक्‍टर क्षेत्र असते. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन साध्य होते. ही ज्वारी दादर नावाने राज्यात प्रसिद्ध आहे. त्यास जळगावसह गुजरात, मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. गावात येऊन अनेक जण दादरची खरेदी शेतकऱ्यांकडून करतात. दादरचा कडबा जनावरांसाठी कसदार मानला जातो. त्याचे दर संकरित ज्वारी, मक्‍याच्या कडब्यापेक्षा नेहमी अधिक असतात. मागील वर्षी कडब्याला प्रति शेकडा सहा हजार रुपयांपर्यंत, तर दादरला प्रति क्विंटल जागेवरच अडीच हजार रुपये दर मागील हंगामात मिळाला होता. ज्वारीचे दाणे चमकदार, खाण्यास गुळचट असतात. एकोपा, सौहार्द ग्रामस्थांनी सलोखा, सौहार्द राखण्यावर भर दिला आहे. गावात सुमारे १०१ वर्षे जुने राममंदिर आहे. परिसरातील सर्वांत मोठे व मजबूत म्हणून त्याची ओळख आहे. गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन दिवस वास्तव्य राहिले आहे. आता त्या जागेचा शासन विकास करणार आहे. सामाजिक न्याय, समतेचा संदेश देण्यासाठी सरपंचपदासाठी आरक्षण नसताना ग्रामस्थांनी दलित बांधवांचा सन्मान म्हणून धनजी बिऱ्हाडे यांना सरपंचपदाचा मान दिला होता. कोरडवाहू भागाला प्रतीक्षा पाण्याची शिवारात सुमारे ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. खरिपात कापूस व उडीद, मूग अधिक क्षेत्रावर असतात. कोरडवाहू कापूस जोमात येतो. कारण जमीन कसदार आहे. पाऊसमान चांगले असले, तर एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मध्य प्रदेश, गुजरात व राज्यातील जिनिंग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दोन- तीन दिवसाआड सात ते आठ ट्रक (एक ट्रक १० मे. टन क्षमता) कापसाची विक्री गावात होते. मागील हंगामात प्रति क्विंटल ४८०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. उडीद, मुगाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर मालदांडी ज्वारी, हरभरा घेण्यात येतो. गावात जामनेर (जि. जळगाव) येथील वाघूर प्रकल्पाच्या पाण्याचे पाट आहेत. परंतु हे पाणी शिवारात अजूनही हवे तसे पोचलेले नाही. अलीकडे बंदिस्त जलवाहिनीद्वारे शेतात पाणी पोचविण्याची योजना राबविली जात आहे. काम प्रगतिपथावर आहे. गुणवंत, कर्तृत्ववान व्यक्तींची खाण आसोदे हे गुणवंत, कर्तृत्ववान व्यक्तींची खाण म्हणून ओळखले जाते. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असल्याने गावाला मोठा बहुमान सर्वत्र मिळतो. गावात सुमारे दीड एकरात २५ कोटी रुपये निधी खर्चूून बहिणाबाईंचे भव्य स्मारक उभारले जात आहे. त्यात संग्रहालय, ग्रंथालय, शेती संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बाबी, बोटॅनिकल गार्डन आदींचा समावेश असणार आहे. गावातील युवक अमेरिका, युरोपात अभियंता, वैद्यकीय क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती विश्‍वास चौधरी, भारतीय सैन्यात मोठ्या पदावर असलेले जगदीश चौधरी, पॅराग्लायडर शीतल महाजन, मिसेस इंडिया चैताली पाटील, जैविक खत उत्पादने उद्योगातील स्वप्नील व निखिल हे चौधरी बंधू हे मूळचे आसोदेकर आहेत. गावातील सुमारे १२०० युवक, युवती मुंबई, पुणे, ठाणे, बंगळूर, परदेशात अभियंता, वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून कार्यरत असल्याचा येथील गावकऱ्यांना अभिमान आहे. संपर्क- किशोर चौधरी - ९५९५८८८२६२ संजय ढाके - ८१४९३३७५८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com