लॉकडाऊनमध्येही ७० टन टोमॅटोची इराणला निर्यात

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील निसर्ग फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून सुमारे चार ते पाच टोमॅटो उत्पादकांनी एकत्र येत लॉकडाऊनच्या काळात इराण देशाकडून १०० टन टोमॅटोची मागणी मिळवली आहे. पैकी ७० टन टोमॅटोची निर्यात करण्यात हे शेतकरी यशस्वी झाले आहेत. स्थानिक बाजारपेठेत किलोला केवळ तीन रुपये दर सुरू असताना या शेतकऱ्यांनी साडेसहा ते साडेसात रुपये दर मिळवून कोरोना संकटातही आपले अर्थकारण सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे.
कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची इराणला निर्यात केली.
कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची इराणला निर्यात केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील निसर्ग फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून सुमारे चार ते पाच टोमॅटो उत्पादकांनी एकत्र येत लॉकडाऊनच्या काळात इराण देशाकडून १०० टन टोमॅटोची मागणी मिळवली आहे. पैकी ७० टन टोमॅटोची निर्यात करण्यात हे शेतकरी यशस्वी झाले आहेत. स्थानिक बाजारपेठेत किलोला केवळ तीन रुपये दर सुरू असताना या शेतकऱ्यांनी साडेसहा ते साडेसात रुपये दर मिळवून कोरोना संकटातही आपले अर्थकारण सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे निसर्ग फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी कार्यरत आहे. याच भागातील यशोग्राम, पारिजात व परिपूर्ती या शेतकरी गटांच्या समन्वयातून टोमॅटो निर्यातीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत या निर्यातीच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने भागातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. निसर्ग फ्रेश फार्म प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब थोरात म्हणाले की कन्नड तालुक्यातील बहिरगाव, हातनुर, मुंडवाडी, आठेगाव, खेडा, चिकलठाणा या गावशिवारातील शेतकरी उत्तम दर्जाचे टोमॅटो उत्पादित करतात. याच निर्यातक्षम दर्जाच्या टोमॅटोला आखाती देशांची बाजारपेठ मिळवण्याचा आमचा प्रयत्न होता. सध्याच्या कोरोना संकटात स्थानिक बाजारपेठेत किलोला केवळ तीन रुपये दर सुरू होता. मात्र निर्यातीसाठी हाच दर साडेसहा ते साडेसात रूपये म्हणजे प्रति क्रेट १२० ते १३० रुपये सुरू होता. या काळात त्यामुळेच निर्यात करण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. अनंत अडचणींचा सामना करून गेल्या आठवडाभरात सुमारे ८० टन टोमॅटो कन्नड तालुक्यातून थेट बांधावर खरेदी करण्यात आला. त्याची प्रतवारी करून क्रेटमधून तो वाशी येथील कोल्ड स्टोरेजकडे पाठवला. तिथे पुन्हा ग्रेडिंग केल्यानंतर जवळपास ७० टन टोमॅटो बॉक्समध्ये पॅक करून सागरी मार्गाने इराणच्या दिशेने रवाना केला. अजून ३० टन माल पाठवायचा बाकी आहे. तो या आठवड्यात रवाना करायचे नियोजन आहे.   प्रतिक्रिया निर्यातीसाठी अपेक्षित दर्जाचे टोमॅटो कन्नड तालुक्यातील शेतकरी उत्पादित करतात. त्यांच्या गुणवत्तापूर्ण मालामुळे त्यांना कोरोना संकटातही निर्यातीची संधी मिळाली. -उदय देवळाणकर कृषी उपसंचालक, औरंगाबाद निर्यातीच्या संधीमुळे देशांतर्गत उत्पादित जास्तीचा माल अन्य देशांत जाऊन स्थानिक बाजारात दर चांगले मिळण्याची संधी निर्माण होईल. -पोपटराव दापके टोमॅटो उत्पादक कृषिभूषण, बहिरगाव, ता कन्नड   संकट काळात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमालाचे विपणन आणि प्रक्रिया केल्यास नक्कीच त्याला सुगीचे दिवस येतील. रात्रंदिवस कष्ट करून जिवाची पर्वा न करता जनतेला अन्न पुरवणाऱ्या योद्ध्यांना शासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचा विमा व अन्य महत्त्वाच्या सुविधा द्याव्यात. -अजय जाधव पारिजात आणि परिपूर्ती गट   शेतकरी व ग्राहकांनाही वाजवी दर मिळावेत, उत्तम दर्जाची फळे,भाजीपाला व धान्य ग्राहकांपर्यंत उपलब्ध व्हावीत असा आमचा प्रयत्न आहे. समन्वयातून भाजीपाला व फळे निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -भाऊसाहेब थोरात कृषिभूषण तथा अध्यक्ष, निसर्ग फ्रेश फार्म शेतकरी उत्पादक कंपनी. संपर्क- ९८२२५९७२९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com