अॅझोला ः एक उत्तम पशुखाद्य

अॅझोला उत्पादनासाठी सावलीमध्ये वाफे तयार करावेत.
अॅझोला उत्पादनासाठी सावलीमध्ये वाफे तयार करावेत.

जनावरांच्या खुराकाचा खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य खुराक म्हणून अॅझोला उपयुक्त अाहे. दूध उत्पादन वाढीसाठी अॅझोलाचा वापर करणे फायद्याचे आहे.

अॅझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांसाठी पूरक खाद्य म्हणून अॅझोलाचा वापर केला जातो. अॅझोला ही पाण्यात मुक्तपणे वाढणारी जलवनस्पती असून संयुक्तपणे वातावरणातील नत्र स्थिरीकरणाचे काम करते. अॅझोलामध्ये तरंगत्या रूपांतरित खोडासहित द्विदलीय लहान लहान पाने आणि मुळांचा समावेश होतो.

भातशेतीमध्ये अॅझोलाचा जैविक खत म्हणून वापर केल्यास हेक्टरी ४०-६० किलो नत्र स्थिरीकरण होते. अॅझोला हे हिरवळीच्या खतांबरोबरच दुभती जनावरे, वराह आणि बदकांसाठीही उपयुक्त खाद्य अाहे.

  • अझोलामध्ये अत्यावश्यक अमिनो अॅसिड, खनिजे, जीवनसत्त्वे, ब कॅरोटीन तसेच शुष्क वजनावर आधारित ३५ टक्के प्रथिने असतात.
  • क्लोरोफिल अ आणि  ब तसेच कॅरोटीन देखील, अॅझोलामध्ये असतात.
  • सहजीवी अनाबेनामध्ये क्लोरोफिल अ आणि कॅरोटीनाॅइड असते.
  • उच्च पोषण मूल्य आणि जलद बायोमास उत्पादन या गुणधर्मामुळे अॅझोला एक शाश्वत खाद्य म्हणून नावारूपाला येत आहे.
  • अॅझोलातील पोषण मूल्ये

  • प्रथिने ः २५-३० टक्के
  • आवश्यक अमिनो आम्ले ः ७ -१० टक्के
  • जीवनसत्त्वे ः १०-१५ टक्के
  • खनिजे (कॅल्शियम, स्फुरद, पालाश, लोह, तांबे) ः १०-१५ टक्के
  • अॅझोला मध्ये अन्नपचनास उपकारक घटक असल्याने उच्च दर्जाची प्रथिने व लीग्निन जनावरे सहज पचवू शकतात.
  • अॅझोलाची निर्मिती

  • झाडाच्या सावलीत किंवा ५० टक्के शेडनेट चा वापर करून ३ मीटर X ३ मीटर अाकाराचा १२ इंच खोल खड्डा करावा. चहुबाजूने विटांचा थर द्यावा. अॅझोला ३१ अंश सेल्सिअस तापमानावर तग धरत नाही. त्यामुळे तापमाना संदर्भात विशेष काळजी घ्यावी.
  • खड्ड्यावर ३.५ मीटर अाकाराचा प्लॅस्टिकचा पेपर अंथरावा.
  • या प्लॅस्टिक पेपरवर साधारण ८ ते १० किलो गाळ होईल अशी माती, त्यात २ किलो शेण व ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे.
  • खड्ड्यामध्ये ५ ते ६ इंचापर्यंत पाणी भरावे.  
  • खड्ड्यामध्ये ५०० ग्रॅम अॅझोला कल्चर टाकावे. साधारण १० ते १५ दिवसात खड्ड्यातील पाण्यावर अॅझोलाची वाढ झालेली दिसून येते.
  • या खड्यातून साधारण दररोज ५०० ग्रॅम अॅझोला मिळतो. तो चाळणीने गाळून घ्यावा.
  • साधारण २ ते ३ महिन्यांनंतर खड्ड्यातील पाणी व माती बदलावी.
  • फायदे

  • दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. दुधाची गुणवत्ता वाढते.
  • प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्के कमी होतो.
  • दुभत्या जानावारासोबातच अॅझोला ब्रॉयलर तसेच लेअर कोंबड्यानाही योग्य मात्रेत दिल्यास उत्पादनात वाढ होते. शेळ्या, मेंढ्या, वराह यांनाही अॅझोला पुरविल्यास त्यांची चांगली वाढ होते.
  • अॅझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून, त्यातुलनेत उत्पादन अधिक आहे.
  • जनावरांची शारीरिक वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  • जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.
  • कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते. प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही कमी आहे.
  • अॅझोला देण्याची पद्धत व प्रमाण

    अॅझोला थेट जसेच्या तसे जनावरांना किंवा इतर खुराकामध्ये मिसळून देता येते. दुधाळ जनावरांना दररोजच्या आहारात २ ते ३ किलो अॅझोला पशुवैद्यकाच्या सल्याने द्यावे. अॅझोला जनावरांना देण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावा.

    अॅझोला उत्पादनातील अडचणी  

  • जागा सावलीत, पण भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी.
  • दर २५-३० दिवसांनी खड्ड्यातील ५ टक्के माती ताज्या काळ्या मातीने बदलावी. अॅझोलाचे वाळवी, मुंग्या, किडे या पासून संरक्षण करावे.
  • दर ५ दिवसांनी खड्ड्यातील २५-३० टक्के पाणी काढून त्यात ताजे पाणी टाकावे.
  • खड्ड्यातील पाण्याची पातळी कायम ८-१० सें. मी. असणे गरजेचे आहे.
  • उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अॅझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो व त्याच्या वाढीवर परिणाम होतो.
  • खड्ड्यामध्ये काही प्राण्यांचा उपद्रव होऊ शकतो.
  • अॅझोला खड्ड्यावर अच्छादन टाकावे; कारण झाडाखाली खड्डा केला असेल तर पालापाचोळा त्यात पडून कुजण्याची शक्यता असते.
  • अॅझोलासाठी शेणाचा वापर जास्त प्रमाणावर करू नये. जास्त शेण टाकल्यामुळे तयार होणारा अमोनिया अॅझोलासाठी घातक असतो.
  • जास्त पावसाच्या ठिकाणी अॅझोलाचे पावसापासून संरक्षण करावे. (५० टक्के शेडनेट चा वापर केल्यास फायदेशीर ठरते.)
  • संपर्क : अजय गवळी,  ८००७४४१७०२ (के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com