जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला दुग्धव्यवसाय

शिक्षकाची नोकरी सांभाळून दुग्ध व्यवसाय सांभाळणारे दत्ता.
शिक्षकाची नोकरी सांभाळून दुग्ध व्यवसाय सांभाळणारे दत्ता.

हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील बाबाराव पडोळे यांनी शेतीचे क्षेत्र कमी आहे अशी खंत करीत न बसता जिद्द व चिकाटीतून दुग्ध व्यवसायात सातत्य ठेवले. त्यातून शेतीची व कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती साधली. काही वर्षांपूर्वी एका म्हशीपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय आज १८ संकरित गायींपर्यंत विस्तारला आहे. याच व्यवसायाच्या आधारे कुटुंबातील मुलांना उच्चशिक्षण देणे त्यांना शक्य झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढानागनाथ-हिंगोली राज्य मार्गावर जडगाव हे छोटे गाव आहे. कोरडवाहू प्रधान गावातील शेतकऱ्यांची मदार बहुतांश सोयाबीन, तूर आदी पिकांवरच असते. हंगामी सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी हळदीचे उत्पादन घेतात. गेल्या वर्षात पावसाचे कमी झालेले प्रमाण, अनियमितपणा यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतीतील अवलंबित्व कमी करण्यासाठी जडगावातील अनेक शेतकरी त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. पडोळे यांच्या शेतीबाबत बाबाराव रामराव पडोळे यांची जडगाव शिवारात पाच एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. कोरडवाहू क्षेत्रातून समाधानकारक उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसे. बाबारावांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. पण दत्ता, रेखा आणि ज्योती या आपल्या मुलांनी मात्र उच्च शिक्षित व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु शिक्षणासाठी आर्थिक तजवीज करणेही आवश्यक होते. सर्व विचार करून त्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देण्याचे निश्चित केले. दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा... पंधरा वर्षांपूर्वी बाबारावांकडे म्हैस होती. त्यानंतर स्वरकमेतून नगर जिल्ह्यातील लोणी येथील बाजारातून एचएफ जातीची संकरित गाय खरेदी केली. ती दररोज दोनवेळेचे मिळून १५ लिटरपर्यंत दूध द्यायची. गावातील डेअरीत दुधाची विक्री व्हायची. उत्पन्न सुरू झाले. अजून रक्कम शिल्लक राहू लागली. मग गायींची खरेदी व गोठ्यातही पैदास सुरू झाली. दूध विक्रीसोबत कालवडी, खोंड यांच्या विक्रीतून उत्पन्न मिळू लागले. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक रक्कम गरजेनुसार उपलब्ध होऊ लागली. व्यवसायाचा विस्तार दरम्यान, दत्ता यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते शिक्षक झाले. नाशिक जिल्ह्यात नोकरीत पाच वर्षांच्या कालावधीत दत्ता यांनी त्या भागातील दुग्ध उत्पादकांच्या भेटी घेत अनुभव, ज्ञान जाणून घेतले. सध्या ते हिंगोली जिल्हा परिषदेच्या मेथा (ता. औंढानागनाथ) येथील शाळेत शिक्षक आहेत. नोकरीचे ठिकाण गावापासून जवळच आहे. त्यामुळे शेती, दुग्ध व्यवसायाकडेही रोजचे लक्ष देणे शक्य होऊ लागले. टप्प्याटप्प्याने दुग्ध व्यवसायाचा विस्तार करताना १०० बाय ७० फूट जागेत मुक्त संचार पद्धतीचा गोठा उभारला. चारा-पाण्याची व्यवस्था केली. आता गोठ्याचे आधुनिकीकरण व चारा साठविण्यासाठी गोदामाची सुविधा करण्यात येणार आहे. चारा व्यवस्थापन दुग्ध व्यवसायातील यशात दुधाळ जनावरांच्या चारा व्यवस्थापनाचा मोठा वाटा असतो. पडोळे यांनी दोन एकर क्षेत्र वार्षिक तसेच बहुवार्षिक चारा पिकांसाठी राखीव ठेवले आहे. मका,ज्वारी, गजराज यांची लागवड केली आहे. कुट्टी यंत्राद्वारे चारा दिला जातो. त्यामुळे नासाडी होत नाही. याशिवाय सरकी ठेप, पशुखाद्य वेळोवेळी गरजेप्रमाणे दिले जाते. सोयाबीन, हरभरा तसेच अन्य भुस्सा व्यवस्थितरीत्या साठवला जातो. त्यामुळे गायींना वर्षभर आहार उपलब्ध राहतो. दिवसातून दोनवेळा चारा देण्यात येतो. सकाळी आठनंतर गायींना मोकळे सोडले जाते. दररोज शंभर लिटर दूध संकलन सध्या लहान-मोठ्या धरून १८ गायी आहेत. दररोज सरासरी १०० लिटर व कमाल १२५ लिटरपर्यंत दूध संकलन होते. शासकीय दूध योजनेंतर्गत जडगाव येथे दूध पुरवठा होतो. येथे प्रति लिटर सरासरी २५ रुपये दर मिळतो. महिन्याला सुमारे २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. शेणखत विक्रीतून उत्पन्न दरवर्षी सुमारे ३५ ट्राॅलीपर्यंत शेणखत मिळते. त्यातून घरच्या पाच एकरांसाठी वापर करून उर्वरित विक्री होते. त्यातून वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. रासायनिक खतांचा वापर आता जवळपास बंद केला आहे. शेणखत आणि गांडूळ खताच्या वापरातून जमिनीची सुपीकता वाढली आहे. त्यामुळे हळद, सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. पिकांचे नियोजन जडगाव शिवारातील पाच एकरांपैकी गोठ्यासाठी पाव एकर जमीन वापरात आहे. पाण्यासाठी बोअरची सुविधा असून त्यावर सौरपंप बसविलेला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी पाणी उपसण्यासाठी अडचण येत नाही. खरिपात प्रत्येकी एक एकर हळद, सोयाबीन व मका तर उर्वरित क्षेत्रावर बहुवार्षिक चारा पिके असे नियोजन असते. यावर्षी सोयाबीन लागवड पद्धतीत सुधारणा करत रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर केला. एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. हळदची गादीवाफा पद्धतीने लागवड होते. वाळलेल्या हळदीचे एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कुटुंबाची एकी व मुलांचे उच्च शिक्षण बाबाराव यांच्या पत्नी प्रयागबाई पडोळे, सून भाग्यश्री दत्ता पडोळे यांच्यासह शंकरराव पडोळे, सुलोचना पडोळे, अंकुश पडोळे, बाळू नवले यांचे दुग्ध व्यवसाय व शेतीत मोठे सहकार्य असते. दुग्ध व्यवसायातूनच बाबाराव यांना मुलांना उच्चशिक्षित करणे शक्य झाले. मुलांनीही वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला. दत्ता यांनी एम.ए.बी.एड केले आहे. रेखा यांनी बी.ए. डी.एड पर्यत शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक म्हणून निवड झाल्यानंतर त्या सोलापूर येथील विक्रीकर कार्यालयात कार्यरत आहेत. ज्योती बीएडीएडच्या शिक्षणानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. पुरस्काराने सन्मानित दुग्ध व्यवसायातील चिकाटी, उत्कृष्ट व्यवस्थापनातून सुदृढ गायींचे पालन करणाऱ्या बाबारावांना हिंगोली जिल्हा परिषदेतर्फे २०१८ मध्ये कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विविध कृषी प्रदर्शनांमध्येही त्यांच्या गायींना पारितोषिके मिळाली आहेत.

संपर्क- बाबाराव पडोळे- ९९२१४२६२१० दत्ता पडोळे- ८६६८२७७५७४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com