कोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा वेळीच नियंत्रण

पक्षांमधील वाईट सवयी टाळण्यासाठी शेडमधील पक्षांची गर्दी टाळावी.
पक्षांमधील वाईट सवयी टाळण्यासाठी शेडमधील पक्षांची गर्दी टाळावी.

कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो व उत्पादनात घट येते. काहीवेळा ते प्राणघातकही ठरू शकते. त्यासाठी कोंबड्या अाणि जनावरांच्या वाईट सवयींचे वेळीच नियंत्रण करून आर्थिक नुकसान टाळावे. कोंबड्याच्या वाईट सवयी एकमेकांना टोचा मारणे एकमेकांना टोचा मारणे ही कोंबड्यांची फार घातक सवय असून यात पायाच्या बोटांना टोचा मारणे, पंख उपटणे किंवा टोचणे, गुदद्वाराजवळ किंवा शरीराच्या इतर भागावर कोंबड्या टोचा मारतात. पिलांमध्ये प्रथम पायाची बोटे टोचण्यास सुरवात होते आणि नंतर पंख उपटण्यास किंवा टोचण्यास सुरवात होते. विशेषतः कोंबड्यात गुदद्वाराजवळ टोचा मारल्यामुळे भयंकर हानी होण्याची शक्यता असते. अशा प्रकारची सवय लागल्यास ती थांबवणे अवघड जाते. टोचा मारण्याची सवय जडलेले पक्षी त्यांच्या चोची कापल्यानंतरही दुसऱ्या कोंबड्यांची पिसे उपटताना किंवा टोचा मारताना आढळतात. दुसऱ्या कोंबड्याना टोचा मारण्याची करणे

  • आहार व्यवस्थित नसणे
  • सुयोग्य व्यवस्थेचा अभाव
  • आनुवंशिक दोष
  • मुख्य कारणे

  • कोंबड्यांना त्यांच्या वाढीकरिता आवश्यक ती जागा त्यांच्या वयोमानानुसार मिळाली नाही तर अपुऱ्या जागेमुळे किंवा गर्दीमुळे त्यांना टोचा मारण्याची सवय लागते.
  • खाद्याची रिकामी भांडी असणे हे पण एक कारण आहे.
  • अतिउष्णता आणि हवा खेळती नसणे ः उष्णता जास्त असली आणि जर शेडमध्ये हवा खेळती नसेल तर शेडमध्ये कोंदट वातावरण तयार होते किंवा अतिउष्णतेमुळे कोंबड्यांवर ताण येतो आणि ही सवय लागते.
  • तीव्र उजेड ः लहान पिल्ले वाढीच्या काळात रात्रभर दिव्यांच्या माध्यमातून उजेड उपलब्ध करून देऊ नये. पिल्लांच्या वाढीच्या काळात वयाच्या ४ ते ५ आठवड्यानंतर रात्रभर दिवा ठेवण्याची आवश्यकता भासत नाही त्यापेक्षा मंद असा उजेड उपलब्ध करावा.
  • इतर कारणे

  • कोंबड्यांना लाल रंगाचे फार आकर्षण असते. कळपात जखमी किंवा रक्त लागलेली कोंबडी असल्यास इतर कोंबड्या ताबडतोब त्याला टोचा मारण्यास सुरवात करतात.
  • अंडी घालण्याकरिता कोंबड्यांना एकांत, अंधारी जागा लागते. तिचा आभावसुद्धा कोंबड्यांना अशाप्रकारची विकृती जडण्यास कारण बनते.
  • उपाय योजना

  • कोंबड्या एकमेकांना टोचा मारणार नाहीत किंवा टोचा मारण्यास प्रवृत्त होणार नाहीत अशा पद्धतीने त्यांची सुयोग्य व्यवस्था करावी. कोणत्याही कोंबड्यांना अशी सवय जडल्याची दिसल्यास योग्य ती उपाय योजना करावी.
  • कोंबड्यांच्या चोची कापणे हा एकमेकांना टोचा मारण्यास आळा घालण्याचा हाच एक प्रभावी मार्ग आहे. कोंबड्यांनी टोचा मारण्यास सुरवात करण्याअगोदर त्या कोंबड्यांच्या चोची कापून घ्याव्यात. चोच साधारणपणे २ ते ३ वेळा कापावी. चोच कापण्याकरिता डीबीकर मशीनचा वापर करावा.
  • प्रत्येक कोंबडीला वयानुसार आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून द्यावी.
  • खाद्याच्या भांड्यामध्ये योग्य प्रमाणात खाद्य ठेवल्यास कोंबड्यांना अशा प्रकारची वाईट सवय जडणार नाही.
  • कोंबड्यांच्या शेडमध्ये नेहमी खेळती हवा असावी. कोंबड्यांना वाढीच्या अवस्थेनुसार ताज्या हवेची गरज जास्त प्रमाणात असते.
  • कळपामधला एखादी कोंबडी या सवयीची सुरवात करते. अशा कोंबडीस लगेचच काळपामधून बाजूला काढावे.
  • चोची कापण्याचे परिणाम आणि फायदे

  • एकमेकांना चोच मारण्याची वाईट सवय जडण्याअगोदर जर कोंबड्यांच्या चोची व्यवस्थित कापल्यास तर होणारा त्रास सहज टाळता येतो.
  • कळपातील आक्रमक किंवा भांडखोर कोंबड्यांमुळे इतर भित्रे पक्षी खाद्य आणि पाण्यापासून दूरवर थांबतात. चोच कापल्यामुळे न घाबरता सर्व कोंबड्यांची एकजूट होऊन समतोल आहार घेतला जातो आणि वाढही चांगल्या प्रमाणात होते.
  • कोंबड्यांची एकसारखी नैसर्गिक वाढ झालेली असल्यामुळे कोंबडी आकर्षक दिसतात.
  • कोंबड्या शांत राहिल्यामुळे अनावश्यक पळापळीमुळे विनाकारण खर्च होणारी शक्ती आणि नुकसान टाळता येते.
  • खाद्य मिश्रणातील आवडीप्रमाणे विशिष्ट धान्यच फक्त वेचून घेणे शक्य होत नसल्यामुळे कोंबड्यांना समतोल आहार मिळतो.
  • चोचीने खाद्य उडविणे शक्य होत नाही त्यामुळे होणारी नासधूस थांबते.
  • गाई, म्हशींच्या वाईट सवयी १. दूध पिणे काही जनावरांना स्वतःचे किंवा दुसऱ्या गाई, म्हशीचे दूध पिण्याची वाईट सवय असते. वासरांना दूध नसले तरीही सवय दिसून येते. यावर उपाय म्हणजे अशा जनावरांना कळपातून वेगळे बांधावे. ज्या गाईंना अशी सवय आहे त्या गाईच्या किंवा म्हशीच्या नाकात धातूचे गोल कडे अडकवावे. असे केल्याने गाईला खाण्यास व्यत्यय येत नाही परंतु दुसऱ्या गाईचे दूध पिणेही शक्य होत नाही. टीप

  • वासरे वेगवेगळी बांधून दूध पिण्याची वाईट सवय टाळता येते.
  • धातूची काटेरी कडी वापरल्यास दुसऱ्या गाईच्या कासेला इजा होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा कडीचा वापर टाळावा.
  • २. लाथा मारणे काही जनावरांना लाथा मारण्याची सवय असते. गाईमध्ये शांतपणे व हळुवारपणे जर हाताळणी केली तर हा प्रकार कमी जाणवतो. काही जनावरांत कासदाह; कासेचा रोग किंवा काहीही इजा आढळली तरीही जनावर लाथा मारते. म्हणून अशावेळी जनावरांची कासकाळजीपूर्वक पाहावी. जे जनावर वारंवार लाथा मारत असतील अशा जनावरांचे पाय बांधूनच दूध काढणे उपयोगी ठरते, अशा जनावरांचे डोके उंच बांधून ठेवावे. संपर्क ः अजय गवळी, ८००७४४१७०२ (पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com