बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘वाइल्ड गार्डन’

बदनापूर संशोधन केंद्रातील वाईल्ड गार्डन
बदनापूर संशोधन केंद्रातील वाईल्ड गार्डन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर (जि. जालना) येथील कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्नातून आपल्या प्रक्षेत्रावर तूर, मूग, उडीद या पिकांच्या जंगली जातींचे 'वाइल्ड गार्डन' उभे केले आहे. या जातींमधील विविध गुणधर्मांचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण सुधारित जाती विकसित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांत त्या लोकप्रिय झाल्या आहेत.   सन १९५१ मध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना झाली. त्यानंतर १९७१ मध्ये केंद्राकडे कडधान्य संशोधन प्रकल्प योजनेची जबाबदारी आली. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे तूर, उडीद व मूग या तीन पिकांच्या जंगली जातींचे देशभरातील संकलन करण्यात आले आहे. त्यामुळे या पिकांचे ‘वाइल्ड गार्डन’च केंद्राच्या प्रक्षेत्रात उभारलेले दिसते. असे आहे वाइल्ड गार्डन

  • प्रतिकूल हवामान ही समस्या लक्षात घेता त्याला अनुसरून सुधारित वाणांवर संशोधन
  • दुर्गम अशा मेळघाट, सातपुडा, सह्याद्री, पूर्व विदर्भ, कोकण आदी ठिकाणाहूनही स्थानिक तसेच जंगली वाणांच्या संकलनाची मोहीम २००९ पासून.
  • उडीद, मूग व तुरीच्या मिळून २३ मूळ जाती आणि १२० प्रजातींचे संकलन
  • सोबतच ३९० स्थानिक प्रजातींचेही संकलन (जंगली जातींव्यतिरिक्त)
  • संकरण व निवड पद्धतीने तुरीचे तीन, मुगाचा एक वाण व हरभऱ्याचा काबुली आणि देशी वाण प्रसारित.
  • आयसीआरकडून 'बेस्ट पीजनपी टीम' (तूर) म्हणून केंद्राचा गौरव.
  • देशासाठी आदर्श जंगली जाती व स्थानिक जात संकलनाची प्रक्रिया अविरत सुरू आहे. त्यामुळे देशातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये कडधान्याच्या सर्वाधिक जंगली जातींची जोपासना करणारे बदनापूरचे ‘वाइल्ड गार्डन’ देशात आदर्श ठरले आहे. नॅशनल ब्यूरो ऑफ जेनेटिक रिसोर्सेस या नवी दिल्ली येथील संस्थेकडे जंगली जातींची नोंदणी केली आहे. आवश्‍यक गुणांचा जातींमध्ये अंतर्भाव वातावरणाच्या बदलासाठी लागणारे गुणधर्म जंगली वाण व स्थानिक प्रजातींमध्ये असल्यामुळे त्यांचा आधार घेऊन सुधारित वाण या केंद्रात विकसित करण्यात येतात. जंगली जातींमध्ये अति पावसातही कोंब न अंकुरण्याचे प्रमाण लक्षात घेता संशोधनाच्या माध्यमातून तो गुण स्थानिक वाणांत समाविष्ट करण्याचे काम पूर्ण केले जाते. त्या माध्यमातून हवामानालाअनुकूल जाती केंद्रामार्फत विकसित केल्या आहेत. धान्य साठवणुकीतील किडीला जंगली वाण प्रतिकारक असल्यामुळे त्या गुणधर्माचा फायदा घेऊन तो गुणही स्थानिक वाणात समाविष्ट केला आहे.११ वर्षांपूर्वी स्थानिक वाणातून निवड पद्‌धतीने घेतलेल्या स्थानिक वाणाच्या प्रजातीतून संशोधनाने बीडीएन ७११ या तुरीच्या कमी पावसात येणारे वाण विकसित केले, जे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. जातीच्या संशोधनासाठीचा दीर्घ कालावधी अशा प्रकारे सुधारित जात विकसीत करण्यासाठी सुमारे १५ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे संशोधनाची वाट तशी खडतरच आहे. हवामानाला अनुकूल गुणांचा सुधारित वाणांमध्ये समावेश करताना अनावश्‍यक गुण वगळून संकरीकरण करण्याची प्रक्रिया मोठी क्लिष्ट आहे. जंगली जातींमध्ये किडी-रोगास प्रतिकारकता, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, जास्त पाऊस झाला तरी तो सहन करण्याची क्षमता आदी गुण असतात. त्या आधारेच हवामानबदलाला अनुकूल पिकांच्या सुधारित जाती भविष्यात निर्माण करता येतात. केंद्र सरकारकडून दखल या संशोधनाची विशेष दखल घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून केंद्राला विशेष प्रकल्प देण्यात आला आहे. त्या माध्यमातून जंगली व स्थानिक वाणांचे निवड पद्धतीने संकरीकरण करून त्यांच्या प्रजनन साहित्याचा पुरवठाही देशभरातील विविध संशोधन येथून होतो. अखिल भारतीय तूर समन्वयक प्रकल्प कानपूर अंतर्गत देशभरासाठी तुरीचे 'जंगली हब' म्हणूनही हे केंद्र परिचित आहे. बीडएन ७११ जातीला सर्वाधिक पसंती केंद्राकडून विकसित तुरीच्या बीडीएन ७११ जातीस शेतकऱ्यांची चांगली पसंती मिळते आहे.एकूण वाणांच्या तुलनेत ४० ते ५० टक्‍के क्षेत्रावर या जातीचा समावेश असल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. सुमारे १५० ते १६० दिवसात येणारी, कमी पावसात येणारी, एकाच वेळी शेंगा पक्व होणे, शेंगा न गळणे, न फुटणे, यंत्राद्वारे काढण्यास योग्य अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रातून खरीप २०१८ मध्ये ६५ क्‍विंटल, खरीप २०१९ मध्ये ४२ क्‍विंटलएवढी विक्री या जातीची झाली. कर्नाटक व आंध्र प्रदेशातही त्याचा प्रसार झाला आहे. प्रतिक्रिया आमच्या केंद्रातून प्रसारीत झालेले कडधान्यांचे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. जंगली वा दुर्गम भागातील स्थानिक वाणांच्या मदतीने हवामानाला अनुकूल सुधारीत वाण विकसित करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. -डॉ. डी. के. पाटील- ७५८८५६२६०८ प्रमुख कृषी संशोधन केंद्र बदनापूर जि. जालना.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com