दुष्काळात बाजरी ठरतेय गुणी, आश्‍वासक पीक 

आपल्या बाजरीच्या शेतात नितीन पाटील
आपल्या बाजरीच्या शेतात नितीन पाटील

 कमी पाणी, कमी कालावधी, अल्प खर्चातील बाजरी पीक गाढोदे (ता. जि. जळगाव) येथील डॉ. नितीन श्रावण पाटील यांच्यासाठी आश्‍वासक ठरले आहे. बाजरीचा सकस चारा व धान्यालाही मागील दिवाळीपासून दर टिकून आहेत. केळी पिकासाठी उत्तम बेवड म्हणूनही हे पीक खानदेशातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे.    गाढोदे (जि. ता. जळगाव) या गिरणा काठावरील गावची जमीन काळी कसदार, मध्यम प्रकारची आहे. येथील नितीन पाटील डॉक्‍टर असून त्यांची आठ एकर शेती आहे. मक्याने ते आणखी ८ एकर शेती करतात. त्यांचे क्लिनिकदेखील आहे. सकाळी व संध्याकाळी क्लिनिक सांभाळून ते दिवसभर शेतीकामांत व्यस्त असतात. दोन कूपनलिका आहेत. बागायती भाग असला तरी अलीकडील काळात त्याचेप्रमाण घटले आहे. चूलतबंधू प्रवीण, पन्नालाल, शरद पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य नितीन यांना मिळते.  पीकपद्धतीचे नियोजन  केळी हे नितीन यांचे मुख्य पीक आहे. साधारण सात ते आठ एकरांत हे पीक असते. उर्वरित क्षेत्रात कापूस, पपई, सोयाबीन ही पिके असतात. केळीची १८ ते २२ किलोपर्यंतची रास घेतली जाते. कापसाचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य होते. एक बैलजोडी, छोटा व मोठा ट्रॅक्‍टर आहे. बाजरी हे नितीन यांचे काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यातील मुख्य पीक होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी हे पीक घेणे थांबवले. यंदा मात्र त्याची तीन एकरांत पुन्हा लागवड केली आहे.  बाजरी का ठरते फायदेशीर?  कमी पाण्यात येते  नितीन सांगतात की उन्हाळी बाजरी हे किफायशीर पीक आहे. घरी खाण्यासाठी धान्य तसेच पौष्टीक चारादेखील उपलब्ध होतो. उत्पादन एकरी १० ते १२ क्विंटल मिळते. या पिकाला कमी पाणी लागते. पाण्याचे साधारण तीन हप्ते पुरेसे ठरतात. यंदा तीन एकरांत हे पीक घेतले आहे. बैलजोडीचलित कांदा पेरणी यंत्राचा वापर केला आहे.  बेवड फायदेशीर  नितीन खरिपात सोयाबीन घेतात. त्यानंतर केळीचे पीक घेतले जाते. केळीची काढणी साधारण फेब्रुवारी दरम्यान होते. त्यानंतर बाजरीचे पीक घेण्यात येते. त्यानंतर पुढे खरिपात केळीची लागवड होते. सोयाबीन व बाजरी यांचा बेवड चांगला असतो असे नितीन सांगतात.  खर्च कमी, व्यवस्थापन चांगले  हे सुमारे तीन ते सव्वातीन महिन्याचे पीक आहे. काळ्या कसदार जमिनीत फक्त चार वेळेस पाट पद्धतीने पाणी लागते. ठिबक असल्यास आणखी कमी पाणी लागते. मध्यम, हलक्‍या जमिनीतही हे पीक खानदेशात जोमात येते. उत्पादन खर्च तुलनेने कमी असतो. एकरी एक किलो बियाणे लागते. त्याची किंमत ३५० रुपये असते. फवारण्यही शक्यतो फार होत नाहीतच. जो काही अधिक खर्च असेल तो पाण्यासाठीच असतो. केळीसाठी ठिबक आहे. त्याचा फायदा बाजरीला होतोच. पक्षी अधिक नुकसान करणार नाहीत या बेताने कणसाला काटे येणाऱ्या वाणाची निवड केली आहे. यंदाचे पीक कापणीवर आले आहे. उंची नऊ फुटांच्या वर गेली असून कणसाची लांबी एक फुटापेक्षा जास्त आहे. जमीन काळी कसदार व केळी पिकाखालील असल्याने पीक जोमात वाढले. यंदाही १२ ते १३ क्विंटलचा उतारा अपेक्षित आहे. उन्हाळी बाजरीचे एकरी १३ ते १७ क्विंटल उत्पादनदेखील काही शेतकऱ्यांनी साध्य केले आहे. कापणी, सोंगणी, कडबा एका ठिकाणी गोळा करण्यासाठी एकरी तीन हजार रुपये खर्च येतो. मळणीसाठी प्रती क्विंटल १५० रुपये दर यंत्रचालक घेतात.  धान्य व चारा दर बाजरीचे हमीचे मार्केट खानदेशात आहे. नितीन यांच्या गावानजीक किनोद (ता. जळगाव) येथे व्यापारी प्रती क्विंटल २१८० ते २२०० रुपये या दरात सध्या बाजरीची खरेदी करीत आहेत. बाजरीचा चारा प्रती शेकडा साडेचार हजार रुपये या दरात विक्रीस जातो. एकरी सुमारे १५० पेंढ्या मिळतात. बाजरी अधिक प्रमाणात जागेवरच उपलब्ध असली तर खरेदीदार थेट शेतातून खरेदी करतात. यंत्राच्या साह्याने शेतकऱ्याने स्वच्छ केलेल्या बाजरीला थेट जागेवर २४०० रुपये देखील दर मिळतो.  प्रसिद्ध बाजारपेठा  धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चाळीसगाव, यावल, जळगाव, पाचोरा हे भाग बाजरी पिकासाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक खरिपात व उन्हाळी हंगामात जोमात सुरू असते. बाजरीचे दर नोव्हेंबर २०१८ पासून टिकून आहेत. खानदेशात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र १५ ते १७ हजार हेक्‍टर एवढे आहे. बाजरीत लोह अधिक असल्याने शहरातील अनेक कुटुंबांनी बाजरीचा समावेश अलीकडील काळात आहारात केला आहे. यामुळे बाजरीला उठाव कायम आहे. बाजरीची पाठवणूक खानदेशातून राजस्थान, नाशिक, छत्तीसगड, नगर या भागांत केली जाते.  आवक एप्रिलमध्ये अधिक  चोपडा (जि. जळगाव) बाजार समितीमध्ये एप्रिल महिन्यात मागील दोन वर्षे बाजरीची अधिक आवक राहिली आहे. या हंगामातही एप्रिलमध्ये अधिक आवक झाली. सन २०१७ एप्रिलमध्ये सरासरी प्रतिदिन ८० क्विंटल तर २०१८ मध्ये यात काळात ती सुमारे ९५ क्विंटल राहिली. मेच्या मध्यानंतर आवक कमी होते. सध्या प्रती दिन ५० क्विंटलपर्यंत आवक बाजारात होत आहे.  दुष्काळाचा फटका  दुष्काळाचा फटका या हंगामात पिकाला बसला असून पेरणी कमी झाली होती. परिणामी, दरात चांगली वाढ झाली आहे. पेरणी तापी व गिरणा नदीकाठी अधिक झाल्याचे जाणकारांनी सांगितले.  बाजरीचे दर (रु.)  वर्ष किमान कमाल  २०१६- ११०० १३००  २०१७- १००० १५००  २०१८- १२०० १६५०  २०१९- १७०० २५०० 

संपर्क- नितीन पाटील-९९२३०३९३१३  प्रतिक्रिया  आजोबांच्या काळापासून बाजरी पेरणीचा प्रघात आहे. आमच्या भागात सालगड्यांना दरवर्षी धान्य म्हणून बाजरी द्यावी लागते. शिवाय चारा म्हणूनही बाजरीचे महत्त्व आहे. अलीकडील पाच-सात वर्षांत बाजरीत चांगले वाण आले. यामुळे हे पीक नफ्याचे ठरत आहे. एकरी सुमारे दहा हजार रुपये खर्चात आणि सव्वातीन महिन्यांत हे पीक येते. केळी पिकासाठी चांगले बेवड ठरते. मका व अन्य तृणधान्य पिकांपेक्षा बाजरी लाभदायी ठरते. आम्ही दरवर्षी तीन ते पाच एकरांत उन्हाळी बाजरी घेतो. उत्पादन एकरी १० क्विंटलपर्यंत हमखास मिळते. या हंगामात प्रती क्विंटल सर्वाधिक २३०० रुपये पर्यंतचे दर मिळाले.  -दीपक पाटील  माचला, ता. चोपडा, जि. जळगाव  संपर्क- ९७६४९५६०६२ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com