अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून स्वतःसह परिसराची प्रगती

आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील अमृतवाहिनी दूध संस्थेत दररोज पंधराशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. शेतकऱ्यांसाठीही स्थानिक स्तरावरच रोजगार उत्पन्न तयार केला आहे.
बाळासाहेव व जीजाबाई हे मुढे दांपत्य
बाळासाहेव व जीजाबाई हे मुढे दांपत्य

आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बाळासाहेब मुंढे यांनी संकरित गायींच्या दुग्धव्यवसायाला चालना दिली. त्याचबरोबर गावात अमृतवाहिनी दूध संस्थेची स्थापना केली. सुमारे १०० ते १२५ सभासद असलेल्या या संस्थेत दररोज पंधराशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. दुग्धव्यवसायातून आपल्या कुटुंबाची धवल प्रगती करण्याबरोबर परिसरातील अन्य शेतकऱ्यांसाठीही त्यांनी स्थानिक स्तरावरच रोजगार उत्पन्न तयार केला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासी प्रवण व अतिदुर्गम असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. साहजिकच येथे शेतीत प्रयोग करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तालुक्यातील शेलद- मुंढेवाडी या आदिवासी वाडीतील बाळासाहेब भाऊराव मुंढे यांनी पुण्यातील खासगी नोकरी सोडून सन २००५ च्या सुमारास एका संकरित गायीपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. अनेक संकटांना सामोरे जात नियोजन, काटकसर, श्रम, सातत्य यांची सांगड घातली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नव्हते. हळूहळू गायींची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. दहा गायींचा आदर्श गोठा तयार केला मजुरांच्या गावाची ओळख पुसली दुग्धव्यवसायातून केवळ स्वतःची प्रगती पाहण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनाही व्यवसायासाठी उभे करावे असे मुंढे यांनी ठरवले. त्या दृष्टीने अमृतवाहिनी दूध संस्थेची स्थापना केली. त्या काळात आपल्याकडील ५० लिटर दूध ते तालुक्यातील अमृतसागर दूध संघाला डोक्यावर नेऊन पुरवत असत. याच अतिदुर्गम मुंढे वाडी, घिगे वाडी, मेचकर वाडी व परिसरातील बहुतांश शेतकरी मजुरीसाठी पुणे, नारायणगाव, अकोले परिसरात जात. मजुरांचे गाव म्हणून परिचित असलेल्या या गावाची ओळख मग बाळासाहेब यांनी पुसून टाकण्यास सुरवात केली. परिसरातील शेतकऱ्यांना गायी, कालवडी घेऊन देण्यास मदत केली. आज परिसरातील गावांतील मिळून संस्थेचे सुमारे १०० सभासद आहेत. संस्थेचे एकूण दूध संकलन १००० ते १५०० लिटरपर्यंत आहे. जनावरांचे संगोपन

  • सध्या लहान- मोठ्या मिळून सुमारे २५ ते ३० होल्स्टीन फ्रिजीयन गायींचे संगोपन
  • नियमित ओला चारा उपलब्ध व्हावा यासाठी चार एकरांत ऊस, कडवळ, मका, अन्य चारा पिके
  • कुट्टीचाही वापर
  • संतुलित आहार दिल्याने दूध उत्पादनात सातत्य राहते. गायींची शारीरिक क्षमता चांगली राहते.
  • वर्षांतून दोन वेळा लाळ्या खुरकूत तसेच अन्य आवश्‍यक लसीकरण.
  • व्यवसायात वाढ करायची असेल तर आधुनिक व्यवस्थापनाची जोड द्यावी लागते. त्याप्रमाणे गोठा स्वच्छ, मोकळ्या वातावरणात ६० फूट लांब व २७ फूट रुंद उत्तर- दक्षिण उभारला आहे.
  • गोठ्यातच चारा-पाण्याची सोय
  • गरजेएवढेच पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते.
  • रात्रभर पुरेसा प्रकाश राहावा यासाठी हॅलोजन बल्बची व्यवस्था आहे.
  • मिल्किंग मशिनचा वापर. वीज गेल्यास जनरेटरचा वापर.
  • दररोज २०० लिटर दूध उपलब्ध
  • एका गायीपासून व्यवसाय सुरू केला असल्याने प्रत्येक गाईचे महत्त्व पटले आहे. पंधरा वर्षांच्या अनुभवात ९० हून अधिक कालवडींची पैदास वाढवली आहे. त्यातील काही गोठ्यात ठेवल्या. काहींची विक्री केली.
  • अतिरिक्त उत्पादन दरवर्षी सुमारे ५० ट्रॉली शेणखत मिळते. सध्या तीन ते चार हजार रुपये प्रति ट्रॉली शेणखताचा दर आहे. त्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी सुमारे सहा ते सात कालवडी विक्रीसाठी तयार होतात. किमान १८ महिने वयाच्या प्रति कालवडीपासून १५ ते २० हजार रुपये मिळतात. शेणखतापासून मिळालेले पैसे जनावरांच्या खाद्यासाठी वापरले जातात. त्यामुळे दूध व कालवडीपासूनचे उत्पन्न फायद्यात राहते असे बाळासाहेब सांगतात. गोमूत्राचा वापर पिकांसाठी गोठ्यातून बाहेर पडलेले मूत्र एका खड्ड्यात साठवले जाते. तेथून पाइपमधून ते थेट शेतापर्यंत म्हणजे पिकांपर्यंत पोचवले जाते. जमिनीची प्रत वाढविण्यासाठी त्याची चांगली मदत झाली आहे. स्लरी व गोमूत्रामुळे चारा पिकांना रासायनिक खतांचा वापर मर्यादित केला जातो. व्य़वसायातून प्रगती अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभव पिचड यांच्या सहकार्यातून संस्थेला ‘बल्क मिल्क कुलर’ मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील दूध उत्पादकांचे हजार लिटर दूध संरक्षित राहते. संस्था आपल्या सभासदांना एक टक्का रिबिट देते. प्रत्येकी १० किलो साखर देऊन त्यांची दिवाळीही आनंदाची केली आहे. उत्कृष्ट दूध संकलन करून ते अमृतसागर संघाला पाठवत असल्याबद्दल दहा वर्षांपासून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेबांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र जिद्दीने व चिकाटीने त्यांनी टप्प्याटप्प्याने कुटुंबाची प्रगती साधली आहे. सध्या ते अमृत वाहिनी संस्थेचे अध्यक्ष आहेत.

    प्रतिक्रिया दुग्ध व्यवसायामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळतो. आज माझ्याकडे १५ गायी आहेत. अमृतवाहिनी संस्थेने चार लाखांची मदत केली. सध्या १५० लिटर च्या पुढे दूध पुरवतो. ५०० लिटरचे उद्दिष्ट आहे. -विजय श्रावण घिगे, शेतकरी

    संपर्क- बाळासाहेब मुंढे- ९३२२०५६६५०,९४२१३३३६९७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com