उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणाम

केळी पिकाच्या संरक्षणासाठी वारारोधक सजीव कुंपणाची उभारणी आवश्‍यक ठरते.
केळी पिकाच्या संरक्षणासाठी वारारोधक सजीव कुंपणाची उभारणी आवश्‍यक ठरते.

उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो. वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. सध्याच्या काळात पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये केळी पिकाची जून महिना (मृगबाग) आणि ऑक्टोबर महिन्यात (कांदे बाग) लागवड केली जाते. उन्हाळ्यात मृगबाग ही घड निसवणीची अवस्था पूर्ण करून घड पक्वतेच्या आणि कांदे बाग मुख्य शाखीय वाढीच्या अवस्थेत असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमानात होणारी वाढ, वादळी वारे व गारपीट यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात केळी बागांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते.

  • केळी हे मुख्यतः उष्णकटीबंधीय हवामानात मोडणारे फळपीक आहे. पिकाच्या वाढीसाठी उष्ण दमट हवामान पोषक असते.
  • वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी २० ते ३३ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
  • पाने उमलण्यासाठी ३० अंश सेल्सिअस आणि घडाच्या वाढीसाठी २१ ते २२ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते.
  • उन्हाळ्यात होणारा परिणाम ः - उन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे तसेच गारपीट या घटकांचा केळीवर परिणाम होतो. अधिक तापमानाचा वातावरणातील सापेक्ष आर्द्रता व जमिनीतील उपलब्ध पाण्याच्या साठ्यावर परिणाम होऊन त्याचा बागांवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो.   अधिक तापमान व तीव्र सूर्यप्रकाशाचा होणारा परिणाम ः

  • तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांची प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्‍चिमेकडील कडा करपते.
  • नवीन लागवड केलेल्या रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी राहून करपली जातात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटले जातात.
  • तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांमधील पाण्याचे होणारे उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होते. झाडांमधील विकर आणि संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याच वेळा ते नष्ट होतात.
  • उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक असते. यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत जातो. याचा झाडाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते.
  • वातावणातील आर्द्रता २० ते १० टक्के पर्यंत खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते.
  • घड निसवणीच्या अवस्थेत असताना निसवण पूर्णपणे न होऊन घड अडकतात, बाहेर पडत नाही. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळून जातात. घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे व फण्या गळण्याचे प्रमाण वाढते. झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.
  • उष्णलाटा, वेगवान वाऱ्याचा बागेवर होणारा परिणाम ः

  • उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो.
  • वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. वादळी वारा व गारपिटीमुळे झाडांची पान फाटून पूर्णंत नष्ट होतात, घड पडतात, घड व खोडावर जखमा होतात, झाडे उन्मळून पडतात.
  • संपर्क ः ०२५७-२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com