agriculture story in marathi, banana farmers are getting good returns due to scientific handling, box packing like value added techniques. | Page 2 ||| Agrowon

शास्त्रीय हाताळणी, पॅकिंग प्रक्रियेद्वारे मिळतेय केळी निर्यातीला चालना

चंद्रकांत जाधव
बुधवार, 16 डिसेंबर 2020

खानदेश हा केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश मानला जातो. केळी निर्यातीतही खानदेश उभारी घेत आहे. त्यासाठी केळीची स्वच्छता, कोरूगेटेड बॉक्समधील पॅकिंग व शास्त्रीय पद्धतीने साठवणूक यावर भर दिला जात आहे. या पूरक कार्यवाहीमुळे केळी निर्यातीला प्रोत्साहन मिळत आहे. अनेक आघाडीचे केळी खरेदीदार, निर्यातदार कंपन्या खानदेशात केळीची खरेदी करू लागल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत आहेत. शिवाय स्थानिक बाजारातील दरांवरील दबावही दूर होत आहे.

खानदेश हा केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश मानला जातो. केळी निर्यातीतही खानदेश उभारी घेत आहे. त्यासाठी केळीची स्वच्छता, कोरूगेटेड बॉक्समधील पॅकिंग व शास्त्रीय पद्धतीने साठवणूक यावर भर दिला जात आहे. या पूरक कार्यवाहीमुळे केळी निर्यातीला प्रोत्साहन मिळत आहे. अनेक आघाडीचे केळी खरेदीदार, निर्यातदार कंपन्या खानदेशात केळीची खरेदी करू लागल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत आहेत. शिवाय स्थानिक बाजारातील दरांवरील दबावही दूर होत आहे.
 
केळीची अनेकदा अशास्त्रीय पद्धतीने वाहतूक केली जाते. यात शेतातील काढणीनंतर घडातून फण्या वेगळ्या न करता केळी थेट ट्रकमध्ये भरण्यात येते. ट्रकमध्ये घड एकमेकांवर रचले जातात. या सर्व प्रक्रियेत ( वाहतूक व लोडिंग) घर्षण होते. केळी एकमेकांवर आदळून नुकसान होते. केळी काळी पडणे, अवेळी पिकणे असे प्रकार घडतात. यात खरेदीदाराचे अधिक नुकसान होते. पुढे ग्राहकालाही चमकदार, उत्तम केळी खायला मिळत नाहीत. जेवढी केळी या अशास्त्रीय पद्धतीने बाजारात पोचते त्यातील २० ते २५ टक्के नुकसान लोडिंग, वाहतूक व वितरण यादरम्यान होते. यामुळे संबंधित भागातील केळी दर्जेदार असली तरी हाताळणी, पॅकिंगचा अभाव यामुळे फटका बसतो. या सर्व समस्यांवर मात करण्यासह केळीची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी, स्वच्छता, पॅकिंग, साठवणूक व वाहतूक यासंबंधीची कार्यवाही खानदेशात होवू लागली आहे. गेल्या चार वर्षात ही नवी पद्धती बऱ्यापैकी रुजू लागली आहे.

शेतात स्वच्छता
केळीची परदेशात तसेच जम्मू, पंजाब, दिल्ली येथे पाठवणूक करण्यासाठी स्वच्छता, पॅकिंग यावर भर दिला जाऊ लागला आहे. या कार्यवाहीत शेतात घड काढणीनंतर ते एकामागून एक असे स्टॅण्डवर टांगले जातात. त्यातील अनावश्यक बाबी तपासल्या जातात व सुधारणा केल्या जातात. त्या अशा.

 • फ्लोरेट (केळीच्या वरच्या भागातील वाळलेली फुले) काढणे व अन्य पूर्व स्वच्छतेच्या बाबी केल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी असतो.
 • यानंतर घडांतून फण्या वेगळ्या केल्या जातात.
 • त्यानंतर तुरटीच्या पाण्यात स्वच्छता केली जाते. त्यामुळे केळीच्या वरच्या भागातील सूक्ष्मजीव नष्ट होतात. केळीला चमकदारपणा येतो. तुरटीमध्ये रसायने नसल्याने ग्राहकांसाठी पुढील कुठलेही धोके शिल्लक राहात नाहीत.
 • त्यानंतर नामांकित संस्था किंवा निर्यातदार आपल्या ब्रॅण्डचे लेबल
 • केळीवर लावतात.

कोरूगेटेड बॉक्सचा उपयोग
केळीची स्वच्छता व ती वाळल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग केले जाते. त्यासाठी कोरूगेटेड बॉक्सचा (पुठ्ठ्याच्या लेअरपासून तयार केलेले खोके) वापर केला जातो. देशातील बाजारात १६ किलो क्षमतेच्या बॉक्सचा वापर अधिक केला जातो. हे प्रमाण देशातील मॉल्स, सुपर शॉप्सनी तयार केले आहे. यामुळे निर्यातदार किंवा पुरवठादाराला याच बॉक्सचा वापर देशात करावा लागतो.
खानदेशात विशेष करून जम्मू, पंजाब येथे १६ किलोच्या बॉक्समध्ये पॅकिंग केलेल्या केळीची मागणी अधिक आहे. तर परदेशात किंवा आखातात सात व साडेतेरा किलोच्या तर तुर्की, रशिया व युरोपात १४ व १८ किलोच्या बॉक्समधील केळीची मागणी अधिक आहे. खानदेशातून आखातात व जम्मू, दिल्ली, पंजाब येथे अधिकची केळी पाठविली जाते. यामुळे १६, सात व साडेतेरा किलोच्या बॉक्सचा अधिक उपयोग केला जातो.

असा असतो कोरूगेटेड बॉक्स

 • जाड पुठ्ठ्यांचा व मजबूत असल्याने केळीला कुठलीही इजा, धक्का बसत नाही.
 • बॉक्ससाठीचा खर्च, पॅकिंग व अन्य प्रक्रिया खानदेशात शेतकऱ्यांना करावी लागत नाही. खरेदीदार, निर्यातदार हा खर्च करतात.
 • खरेदीदारांना साडेतेरा किलोचा रिकामा बॉक्स ६५ रुपयांना तर सात किलोचा बॉक्स ३८ रुपयांना पडतो. -बॉक्स ठाणे, मुंबई, नाशिक, गुजरात आदी भागातून आणले जातात. प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाऊ शकतात.
 • बॉक्सला खाली व वरच्या भागात तसेच लांबीच्या भागात हवा खेळती राहावी यासाठी चार छिद्रे असतात.
 • विविध कंपन्या आकर्षक ब्रॅण्डनेम व रंगातील बॉक्स तयार करून घेतात. परदेशात वाहतुकीसंबंधी २० टन क्षमतेच्या कंटेनरमध्ये साडेतेरा किलो आकारातील १५४० बॉक्स ठेवणे शक्य असते. तर सात किलो क्षमतेचे २८०० बॉक्स ठेवले जातात. आखातात सात किलोचे बॉक्स अधिक पाठविले जातात.
 • इराणला १५ दिवस, दुबईला केळी १० दिवसात मुंबई येथील जेएनपीटी बंदरातून पोचते. या १० दिवसांत जहाजातून वाहतूक व पुढे संबंधित भागात केळी पोचल्यानंतर बॉक्स उतरविणे, हाताळणी सोपी जाते. केळीचे कुठलेही नुकसान होत नाही.
 • निश्‍चित ठिकाणी केळी पोचल्यानंतर संबंधित आयातदार केळीची पिकवणी केंद्रात साठवणूक करतात.

प्रत्यक्ष बॉक्समधील प्रक्रिया
बॉक्समध्ये खालील बाजूला जर्मिनेशन पेपर ठेवला जातो. यामुळे केळी, बॉक्समधील ओलावा नाहीसा होऊन कोरडेपणा टिकून राहतो. यानंतर फण्या ठेवल्या जातात. दोन फण्यांमध्ये फोम असतो.
त्यामुळे दोन फण्यांमध्ये घर्षण होत नाही. एका बॉक्समध्ये चार, पाच ते सहा फण्या असतात.
या फण्या नंतर प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवल्या जातात. त्यातील हवा यंत्राच्या साह्याने काढली जाते. हवा काढल्यानंतर पिशवीवर इथिलीनचा पाऊच ठेवण्यात येतो. बॉक्सच्या आकारानुसार पाच ते १० ग्रॅम वजनाचा तो असतो. वाहतुकीदरम्यान पिकण्याची प्रक्रिया रोखली जावी हा त्यामागील उद्देश असतो. त्यानंतर बॉक्स उत्तम दर्जाच्या चिकट द्रव्याद्वारे बंद करण्यात येतो.
शक्यतो परदेशात निर्यातीसाठी या पाऊचचा वापर होतो. आयातदारांकडे बॉक्स पोचल्यानंतर
तो काढून घेण्यात येतो. नंतर बॉक्स केळी पिकवणी केंद्रात ठेवले जातात.

ठळक नोंदी

 • शेतात किंवा पॅक हाऊसमध्ये केळी भरल्यानंतर बॉक्सचे तापमान किमान २८ ते ३५ अंश सें.
 • तापमान नियंत्रणासाठी प्री कुलिंग चेंबरमध्ये १३ अंश सें. तापमान. लागलीच परदेशात साठवणूक असल्यास रेफर व्हॅनमधून बंदरापर्यंत वाहतूक. अन्यथा कोल्डस्टोरेजमध्ये साठवणूक
 • पंजाब, दिल्ली, जम्मू आदी भागातही बॉक्समधील केळी रेफर व्हॅनमधून पाठविली जात आहेत.

बॉक्स पॅकिंगचा शेतकऱ्यांना लाभ
कोरूगेटेड बॉक्स पॅकिंगमुळे केळी उत्पादकांनाही दर चांगले मिळत आहेत. खानदेशातील केळी निर्यातक्षम आहे. निर्यातीसाठी आवश्यक सात ते आठ इंच लांब, ४० ते ४२ कॅलिपर्सचा घेर आवश्‍यक ठरतो. अशा दर्जाची केळी रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. कारण अनेक शेतकरी फ्रूट केअर तंत्राकडे वळले आहेत. केळीची परदेशातील निर्यात सतत वाढत आहे. मागील दोन वर्षे (लॉकडाऊनचा कालावधी वगळता)निर्यातक्षम केळीसाठी शेतकऱ्यांना प्रति किलो १३ रुपये दर अनेक खरेदीदारांनी दिला. प्रचलित खरेदीच्या दरांच्या तुलनेत निर्यातक्षम किंवा बॉक्समधील पॅकिंगमधील केळीसाठी शेतकऱ्यांना किलोमागे दोन ते तीन रुपये अधिक मिळत आहेत.
खानदेशात पणन मंडळाचे सावदा (ता.रावेर) येथे केळी निर्यात सुविधा केंद्र आहे. केळीची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी, पॅकिंग, वाहतूक यासंबंधी उत्तम कार्यवाही येथे होते. मुंबई येथील अपेडाचे अधिकारी प्रशांत वाघमारे, या केंद्राचे संचालक प्रशांत नारकर येथील व्यवस्थापन पाहतात.

बॉक्स पॅकिंगचा पहिला प्रयोग
केळीची स्वच्छता, शास्त्रीय पद्धतीने हाताळणी व बॉक्स पॅकिंग करून परदेशात निर्यातीसंबंधीचा पहिला प्रयोग २०१५ मध्ये ‘जैन इरिगेशन’ कंपनीच्या फार्मफ्रेश संस्थेने केला. त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे केळी पॅक हाऊस जळगावात साकारले. त्या अनुषंगाने २००२ मध्ये जागतिक केळी तज्ज्ञ के.बी.पाटील यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राजनाथसिंह यांच्यासमोर दिल्ली येथे सादरीकरण केले होते.

परदेशात निर्यात झाले कंटेनर्स

 • वर्ष          कंटेनर्सची संख्या
 • २०१८            ८०
 • २०१९            ७५०
 • २०२० (जूनअखेर)  ५५०
 • २०२१ मध्ये किमान अडीच हजार कंटेनर खानदेशातून परदेशात पाठविले जातील असे संकेत

प्रतिक्रिया
केळीची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी, पॅकिंगसाठी कोरूगेटेड बॉक्सचा वापर याबाबतचे महत्त्व खानदेशच नव्हे तर देशभरात वाढू लागले आहे. त्यामुळेच केळीची निर्यात खानदेशातून गेले तीन वर्षे सतत वाढली आहे. पुढील काळात युरोपातही केळी साठवणुकीसाठी सक्षम, अत्याधुनिक यंत्रणा खानदेशात उभी राहील. यासाठी शासनाने मध्यवर्ती शीतगृह (कोल्डस्टोरेज) उभारण्यासाठी ठोस सहकार्य केले पाहिजे.

-के. बी.पाटील, जागतिक केळीतज्ज्ञ

केळी निर्यातीला प्रोत्साहन दिल्याचा लाभ केळी उत्पादकांना मिळत आहे. बॉक्स पॅकिंग व शास्त्रीय पद्धतीने साठवणूक, वाहतूक यामुळे दरही चांगले मिळत आहेत.
-कृषिभूषण प्रेमानंद महाजन
केळी उत्पादक व पॅकहाऊसचालक, तांदलवाडी (जि.जळगाव)
संपर्क- ९७६३८९३७७७

केळीचे दर्जेदार उत्पादन, त्याला हाताळणी, पॅकिंगचा उत्तम समन्वय साधता आल्याने केळी उत्पादकांना त्याचा लाभ मिळत आहे. केळीचे कुठलेही नुकसान यात होत नाही. चमकदार केळी ग्राहकांना मिळते. परदेशातील मागणीची संधी साधण्यासाठी अधिकाधिक सक्षम हाताळणी, पॅकिंगची यंत्रणा आवश्यक आहे.
-विश्वपाल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, केळी निर्यात सुविधा केंद्र, सावदा (जि.जळगाव)
संपर्क- ९८२२८८६८११

बॉक्समध्ये पॅकिंग सुरू झाल्याने केळीचे नुकसान टळते. ग्राहकाला गुणवत्तापूर्ण केळी उपलब्ध होते. खरेदीदारांचे नुकसान टळते. स्वच्छता, पॅकिंग, साठवणूक याबाबतची कार्यवाही बारमाही सुरू व्हायला हवी. यामुळे केळीच्या बाजारातील दबाव कायमस्वरूपी दूर होईल. केळी उत्पादकांना चांगले दर बारमाही मिळतील.
- विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर, जि.जळगाव


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...
निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...
दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...
पाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...
पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व...
शेतीमाल वाळविण्यासाठी सोलर टनेल ड्रायर...भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा...
शास्त्रीय हाताळणी, पॅकिंग...खानदेश हा केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश मानला...
सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या...वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग,...