केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग  

केळीच्या विलियम्स वाणाची वैशिष्ट्ये झाडांची उंची ग्रॅंड नैन वाणांच्या झाडापेक्षा ४० ते ५० सेंमीने कमी. वाणाचा कालावधी सुमारे १० ते ११ महिने. हा वाण अन्य वाणांपेक्षा १५ ते ३० दिवस आधी काढणीस येतो. वाणाच्या झाडाचा बुंधा अर्धापुरी वाणासारखा. त्यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे झाड खाली तुटून पडत नाही.
 वसंतराव कदम यांनी सुनियोजित जपलेली केळीची बाग
वसंतराव कदम यांनी सुनियोजित जपलेली केळीची बाग

परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम यांनी केळी लागवड पद्धतीमध्ये सुधारणा करत यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही केळीचे चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक वाणांवर भर देत त्यांनी केळीची शेती जपली आहे. यंदा विलियम्स या नव्या वाणाचा प्रयोग करीत घेतलेल्या दर्जेदार उत्पादनाला थेट बांधावर बाजारपेठ मिळवून दिली आहे.    सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे शिक्षण एम.कॅाम.बीपीएड.पर्यंत झाले आहे. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु, पुढे शेतीतच मुख्य करिअर करण्याचे व त्यातून आर्थिक सक्षमता मिळवायचे ठरविले. खरिपात सोयाबीन, कापूस, रब्बीत ज्वारी, हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात. दरवर्षी १० एकरांवर केळी, २० एकरांवर ऊस तर ३० एकरांवर सोयाबीन लागवड केली जाते. सिंचनासाठी चार विहिरी आहेत. जायकवाडी डाव्या कालव्याचा लाभ होतो. परंतु कालव्याचे पाणी दरवर्षी मिळेलच याची खात्री नसते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार केळी आणि ऊस यांचे नियोजन केले जाते.  केळी वाणांतील प्रयोगशीलता  कदम यांच्या वडिलांच्या काळापासून केळीची शेती केली जाते. पूर्वी देशी, अर्धापुरी, महालक्ष्मी अशा वाणांचे उत्पादन घेतले जायचे. जून महिन्यात जमीन तयार करून पाच बाय पाच फूट अंतरावर लागवड व्हायची. प्रवाही पद्धतीने (पाट पाणी) दिले जायचे. त्यामुळे जास्त पाणी लागत असे. या वाणांचे एकरी सुमारे २० टनांपर्यंतच उत्पादन मिळायचे. कंदापासून लागवड केलेल्या या केळीचा कालावधी जवळपास १४ ते १५ महिन्यांचा असल्यामुळे पाण्याची गरज अधिक असायची. एप्रिल-मे महिन्यात निसवण्याच्या काळात उन्हाच्या झळा, वाऱ्यामुळे पाने फाटून नुकसान होणे आदी समस्या उद्‌भवायच्या. परिपक्वतेच्या काळात पाणी कमी पडले तर उत्पादनात मोठी घट येऊन नुकसान व्हायचे.  नव्या वाणाची लागवड 

  • केळी पिकातील मोठा अनुभव जमा केलेल्या कदम यांनी यदा वाणबदल करायचे ठरवले. 
  • अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील शेतकऱ्याकडून त्यांना विलियम्स वाणाविषयी माहिती मिळाली. 
  • अधिक अभ्यासाअंती त्यांनी हा प्रयोग करायचे यंदाच्या वर्षी ठरवले. प्रतिनग पाच रुपये याप्रमाणे त्याचे कंद आणले. जमीन तयार करून जानेवारी महिन्यात सहा बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. 
  • सिंचनासाठी पाटपाणी पद्धत बंद करून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले. सुमारे ११ महिन्यांच्या कालावधीत केळी उतरण्यास आली. केळीचे घड परिपक्व होत असताना झाडाला आधार देण्यासाठी बांबूऐवजी त्यांनी पॅकिंग पट्ट्यांचा वापर करून खर्च कमी केला. 
  • थेट विक्री  अर्धापूर, वसमत येथील व्यापाऱ्यांकडून खरेदीची विचारणा झाली. त्यानुसार वसमत येथील व्यापाऱ्याला आत्तापर्यंत सुमारे ४५ टन केळीची विक्री झाली आहे. किलोला ११ रुपयांपासून ते साडे १४ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. घडांचे वजन करून व्यापारी वाहन भरून घेऊन जात असल्याने वाहतुकीचा खर्च वाचला आहे.  अन्य व्यवस्थापन 

  • वसंतराव यांच्याकडे दोन बैलजोड्या व चार सालगडी आहेत. मशागत, पेरणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. त्या त्या हंगामी पिकांबरोबर वैरणीसाठी ज्वारीदेखील असते. उसाचे एकरी ५० ते ५५ टन तर सोयाबीनचे १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. 
  • वसंतराव म्हणाले, की केळीची जानेवारीत लागवड केल्यामुळे तुलनेने कमी पाणी लागते. निसवण्याच्या काळात पोषक वातावरण असते. त्यामुळे चांगले उत्पादन मिळते. सुमारे अकरा महिन्यांच्या कालावधीत केळी काढणीस येते. त्यानंतर पील बाग किंवा अन्य पिकांचे उत्पादन घेण्याकडे वळता येते. यंदा त्यांनी सहा बाय पाच फूट अंतरावर लागवड केली आहे. 
  • ॲग्रोवन मार्गदर्शक  वसंतराव सुरवातीपासून ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यातील हवामान सल्ला, बाजारभाव, पीक व्यवस्थापन सल्ला आदी माहिती मार्गदर्शक असते. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथा प्रेरणादायी असतात असे ते सांगतात.  सर्व काही पाण्याच्या उपलब्धतेवर   परभणी तालुक्यातील सिंगणापूर हे प्रमुख भाजीपाला उत्पादक गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गावातील शेतकरी भाजीपाला शेतीसोबतच केळी, ऊस तसेच अन्य फळपिकांची शेती करतात. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विहिरी, बोअर्सना पुरेसे पाणी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे केळी, ऊस या पिकांच्या क्षेत्रात घट झाली. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असल्यामुळे धरण भरल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची तशी चिंता राहात नाही. मात्र गेल्यावर्षी भागात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. विहिरी, बोअर्सचे पाणी घटले. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पैठण येथील जायकवाडी धरण भरल्याने रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पाणी आवर्तनाची खात्री झाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन करता आले.    पाणी व्यवस्थापनावर भर   वसंतराव यांच्या गावाजवळील शेतात एक आणि अन्य ठिकाणच्या शेतात तीन अशा एकूण चार विहिरी आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात गावाजवळच्या शेतातील विहिरीचे पाणी कमी झाल्यामुळे केळीला पाणी पडू लागले. त्यामुळे अन्य ठिकाणच्या विहिरीवरून महिनाभर टॅंकरने पाणी आणून विहिरीत सोडण्याची पराकाष्ठा वसंतरावांना करावी लागली. त्यावर तीन एकर केळी बाग जोपासली. जुलैमध्ये निसवण सुरू झाल्यानंतर पाण्याची गरज जास्त असते. परंतु, त्या वेळी पावसाळा असल्यामुळे दिलासा मिळतो. परंतु खंड काळात विहिरीतील संरक्षित पाणी उपयोगी पडते. ठिबकद्वारे सिंचन होतेच. मात्र महिन्यातून एकदा प्रवाही पद्धतीने पाणी दिले. झाडे मोठी झाल्यानंतर ठिबक सिंचन अधिक तास सुरू ठेवावा लागतो.  केळीच्या विलियम्स वाणाची वैशिष्ट्ये 

  • झाडांची उंची ग्रॅंड नैन वाणांच्या झाडापेक्षा ४० ते ५० सेंमीने कमी. 
  • वाणाचा कालावधी सुमारे १० ते ११ महिने. 
  • हा वाण अन्य वाणांपेक्षा १५ ते ३० दिवस आधी काढणीस येतो. 
  • वाणाच्या झाडाचा बुंधा अर्धापुरी वाणासारखा. त्यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे झाड खाली तुटून पडत नाही. 
  • घडावरील केळींच्या दोन फण्यांतील अंतर जास्त. 
  • केळीवरील चकाकीमुळे घड आकर्षक दिसतो. त्यामुळे बाजारात जास्त दर मिळतात. 
  • ग्रॅंड नैन वाणाच्या तुलनेत करपा रोगास कमी बळी पडतो. 
  • हेक्टरी ८० ते ८५ टन उत्पादन मिळू शकते. 
  • या वाणाची लागवड तीन- चार वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड तालुक्यांतील शेतकरी करीत आहेत. सरस उत्पादन देणारा हा वाण शेतकऱ्यांत लोकप्रिय होत आहे. 
  • या वाणाच्या ऊती संवर्धित रोपांची लागवड केल्यास ७० ते ८० टक्के बागा एकाच वेळी काढणीस येते. त्यामुळे शेत लवकर मोकळे होऊन अन्य पिके घेता येतात. 
  • -आर. व्ही. देशमुख, प्रभारी अधिकारी, 
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, केळी संशोधन केंद्र, नांदेड 
  • संपर्क- वसंतराव कदम-९८५०९४३६२६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com