सहाशे एकरांवर विस्तारली केळीची गटशेती, दीडशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

उसापेक्षा केळीची गटशेती किफायतशीर वाटू लागली आहे. यंदा सह्याद्री कंपनीस केळीचे सुमारे १५ कंटेनर्स दिले आहेत. शेटफळ परिसरातील अन्य शेतकरी गटांसोबतही आम्ही नेटवर्क उभे केले आहे. स्थानिक पातळीवरच रोपांचीही उपलब्धता होत आहे. -विष्णू पोळ- ७७५५९३६२६२ अध्यक्ष, लोकविकास फार्मर्स प्रोड्यासुर कंपनी, शेटफळ (ना)
शेटफळचे शेतकरी वजनदार केळी घडांची मिर्मिती करतात.
शेटफळचे शेतकरी वजनदार केळी घडांची मिर्मिती करतात.

उसाचा दीर्घ कालावधी, त्या तुलनेत त्याचे अर्थकारण पाहता शेटफळ (नागोबाचे) (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी केळीची गटशेती सुरू केली. आज गावात नागनाथ शेतकरी गटाच्या माध्यमातून सुमारे ६०० एकरांत केळी क्षेत्र विस्तारले आहे. दोन कंपन्यांना केळीचा पुरवठा होतो. परिसरातील शेतकरीही या उपक्रमाचे यश पाहता गटासोबत जोडले जात आहेत.  सोलापूर जिल्ह्यात टेंभूर्णी-करमाळा महामार्गावर जेऊरनजीक शेटफळ (ता. करमाळा) आहे. उजनी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. आत्तापर्यंत या भागात ऊस हेच मुख्य पीक होते. मात्र, त्याचा दीर्घ कालावधी, दर व उत्पन्न यांचा विचार करता हे पीक परवडेनासे झाले. पाण्याचाही वापर अधिक होत असल्याने अनेक तरुण शेतकरी या पिकाला पर्याय शोधत होते.  केळीत ओळख मिळवण्याचा प्रयत्न  शेटफळच्या शेजारील कंदर गावाने केळीत ओळख तयार केली आहे. आपणही असा प्रयत्न केला पाहिजे, असा विचार येथील काही शेतकऱ्यांनी केला. यात वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, नानासाहेब साळुंके, गजेंद्र पोळ, कैलास लबडे, विजय लबडे, विष्णू पोळ यांचा समावेश होता. कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांनी नागनाथ शेतकरी गटाची स्थापना केली. त्याद्वारे केळी उत्पादकांकडे सहली, प्रदर्शने याद्वार ज्ञानवृद्धीचे प्रयत्न सुरू झाले. जेऊरचे कृषिरत्न आनंद कोठाडिया, कंदरचे किरण डोके, नाशिक येथील सह्याद्री या शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. नानासाहेब साळुंखे, विजय लबडे हे अनुभवी केळी उत्पादक गटासोबत होते. त्याचाही चांगला फायदा झाला. त्यातून केळीचे उत्पादन, गुणवत्ता याबरोबरीने मार्केटिंगमध्येही आघाडी घेण्यात शेटफळच्या शेतकऱ्यांना यश आले आहे.  केळी व्यवस्थापन  लागवडीची सुरुवात डिसेंबरपासून होते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ग्रॅंड नैन या टिश्‍यू कल्चर रोपांची लागवड 'फ्रूट केअर’ पद्धतीचे व्यवस्थापन होते. घडांच्या सुरक्षिततेसाठी स्कर्टिंग बॅग्जचा वापर होतो.  सन २०१६ मध्ये शेतकऱ्यांनी उसाखालील क्षेत्र कमी करून केळीची लागवड केली.  त्या वर्षी सुमारे २५ ते ५० एकरांत एकूण लागवड झाली. पहिल्या वर्षी तांत्रिक ज्ञान व अनुभव फारसा जमेत नव्हता. पण, गटातील अनुभवी शेतकऱ्यांनी इतरांना मार्गदर्शन केले.  खर्चात केली बचत  पहिल्या वर्षी सरासरी २० ते २५ टन उत्पादन गटातील शेतकऱ्यांना मिळाले. त्यातून शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढला. मग उत्पादन खर्चात बचत करण्याच्या अनुषंगाने गटाने पुढचे पाऊल टाकले. शेतकऱ्यांची संख्याही वाढू लागली. त्यासाठी लागणारी रोपे, रासायनिक खते, कीडनाशके आदींची एकत्रित खरेदी सुरू झाली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली. त्यातून कामाला अधिक हुरूप आला.  सहाशे एकरांपर्यंत पोचले क्षेत्र  सामूहिक शेती व विक्रीचा प्रयत्न यशस्वी ठरतो आहे, हे पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांना या उपक्रमात भाग घ्यावसा असे वाटू लागले. त्यामुळेच सुमारे चार वर्षांपूर्वी शेटफळमध्ये केळीखाली जे क्षेत्र सुमारे २५ एकरांपर्यंत मर्यादित होते, ते आज सहाशे ते साडेसहाशे एकरांपर्यंत विस्तारले आहे. यामध्ये १५० ते २०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.  गट ते कंपनी  केवळ लागवडीपुरते न थांबता मार्केटिंग करून उत्पादित केळीला चांगला दर मिळवून देण्यात नागनाथ गटाने पुढाकार घेतला. एवढ्यावरच न थांबता परिसरातील सात शेतकरी गटांना त्यात सामावून घेण्यात आले. या सर्वांच्या माध्यमातून आता लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली आहे.  आता कंपनीच्या वतीने लागवडपूर्व मशागतीपासून ते रोपे, ठिबक संच, रासायनिक खते यासह प्रत्यक्ष प्लॉटवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे सर्वोतोपरी साह्य देण्यात येत आहे. एकेकाळी उसाचे गाव म्हणून ओळख असलेल्या शेटफळची ओळख आज केळी उत्पादक म्हणून झाली आहे.  निर्यातीसाठी मागणी  उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनवाढीवर लक्ष ठेवताना मार्केटिंगमध्येही शेतकरी कमी पडले नाहीत.  उत्पादित केळी निर्यातक्षम दर्जाची असावीत, असा प्रयत्न होत आहे. त्याचे कारण म्हणजे निर्यातीशी संबंधित दोन कंपन्यांसोबत शेटफळचे शेतकरी कार्यरत आहेत. संबंधित कंपन्यांनादेखील एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध होत असल्याचा फायदा मिळतो आहे. साहजिकच केळीची उत्पादनक्षमता, गुणवत्ता एकाच पातळीवर आणण्याचा प्रयत्न असतो. शेतकरी कंपनीच्या अंतर्गत जवळपास २०० एकरांवरील केळीची निर्यात आखाती देशात कंदर येथील के. डी. एक्‍सपोर्ट आणि नाशिक येथील ‘सह्याद्री’ यांच्या माध्यमातून होत आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, हरियाना राज्यांपर्यंतही शेटफळची केळी पोचली आहेत.  मूल्यवर्धनावर भर  शेतकरी कंपनीने आता प्रतवारी, मार्केटिंग व प्रक्रिया प्रकल्पही सुरू केला आहे. कृषी विभागाने लोकविकास शेतकरी कंपनीचा गटशेती सबलीकरण योजनेत समावेश केला आहे. लवकरच कंपनीच्या माध्यमातून प्री-कलिंग व केळी वेफर्स युनिट सुरू करण्यात येणार आहे. प्रकिया किंवा मूल्यवर्धनाच्या माध्यमातून अतिरिक्त नफ्याच्या दृष्टीनेही वाटचाल केली आहे.  उत्पादन व दर (रूपये प्रति किलो)

  • वर्ष          एकरी उत्पादन    दर  
  • २०१७           २७ टन        ८ रु. 
  • २०१८           ३० टन        १० रु. 
  • २०१९-       ३० ते ३५ टन   १२ ते १५ रु. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com