agriculture story in marathi, Bari Family has raised their economics through floriculture round the year. | Page 2 ||| Agrowon

गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं भक्कम

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 20 जुलै 2021

शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व जयराम हे बारी बंधू अनेक वर्षांपासून गुलाब, लिली, शेवंती व फिलर अशी फूलकेंद्रित शेती यशस्वीपणे करीत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांची मेहनत व एकोपा, स्वतः उभारलेली विक्री व्यवस्था यातून आपले अर्थकारण त्यांनी भक्कम केले आहे.

शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व जयराम हे बारी बंधू अनेक वर्षांपासून गुलाब, लिली, शेवंती व फिलर अशी फूलकेंद्रित शेती यशस्वीपणे करीत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांची मेहनत व एकोपा, स्वतः उभारलेली विक्री व्यवस्था यातून आपले अर्थकारण त्यांनी भक्कम केले आहे.
 
शिरसोली (ता..जि.. जळगाव) गावशिवारात पाण्याची टंचाई आहे. अशा स्थितीत काटेकोर पाणी व्यवस्थापन करून रामकृष्ण, श्रीराम व जयराम या बारी बंधूंनी आपल्या ११ एकर शेतीची जबाबदारी पेलली आहे. त्यांचे वडील प्रभाकर बाबूराव बारी देखील शेतीच करायचे. त्‍यांची कोरडवाहू सात एकर शेती होती. कष्ट, जिद्दी व व्यावसायिक वृत्तीतून उत्पन्न वाढवत त्यात चार एकरांची भर घातली. बारी यांची मुख्य शेती फुलांची आहे. त्यामुळे वर्षभर त्यांच्या शेतात कोणते ना कोणते फूलपीक दिसून येतेच. गुलाब, लिली, शेवंती, बुकेसाठी फिलर असलेली कामिनी व झेंडू अशी विविधता त्यांच्या शेतात असते. मध्यम प्रकारच्या जमिनीत कांदा, वांगी, मुळा अशीही पिके दृष्टीस पडतात. पशुधनाचे संगोपनही होते.

शेतमजुरी व पानमळा
सुरवातीला बारी बंधू वडिलोपार्जित जमिनीत कोरडवाहू पिके घ्यायचे. इतर वेळी मजुरी करायचे. पडेल ते काम परिसरातील शिवारात करायचे. सातत्यपूर्ण कष्टातून यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांकडून त्यांना प्रेरणा मिळाली. शिरसोली फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी कमी पाण्यात ही शेती यशस्वी करतात. याचा चांगला अभ्यास तिघा भावांनी केला. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात ते आले. पंधरा गुंठ्यात पानवेलीचा मळा साकारला. विक्री जळगाव, बुलडाणा, नांदुरा, मलकापूर आदी भागात करण्यासाठी श्रीराम जायचे. त्यातून बाजारात कुठल्या शेतमालाला कशी मागणी असते, काय दर मिळतात, कुठली पिके घ्यावीत याचा अभ्यास झाला.

आयुष्याला मिळाले वळण
श्रीराम यांनी धाडस करून फुलांचा व्यापार करण्याचे ठरविले. हाती पैसे नव्हते. आईकडून बाराशे रुपये घेतले. परिसरातून विविध फुलांची खरेदी केली. त्यांची सुरत (गुजरात) येथील बाजारात विक्री केली. तेथे बाराशे रुपयांच्या फुलांची ३८०० रुपयांत विक्री झाली. त्यातून हुरूप आला. मग श्रीराम सुरतलाच थांबले. बंधू जयराम शिरसोली परिसरातून फुलांची खरेदी करून रोज रेल्वेद्वारे सुरतला पाठवायचे. तेथे श्रीराम व्यापार करायचे. चार वर्षे सुरतला हा व्यापार केला. नंतर नागपुरातही दोघा भावांनी मिळून फुलांचा चार वर्षे व्यापार केला. चांगला नफा त्यात मिळाला. बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर मग आपल्याच शेतात फूलकेंद्रित शेती करायचे असे ठरले.

फूलशेतीचे नियोजन
गुलाबाची सुमारे दोन एकरांत, शेवंतीची तीन एकर, लिली दोन एकर तर कामिनी (फिलर) सुमारे एक एकर असे क्षेत्र असते. मागणीनुसार झेंडू असतो. गुलाब व लिलीचे उत्पादन वर्षभर मिळत राहते. गुलाब दररोज १००० ते १५०० पर्यंत तर लिली १०० ते १५० बंडल (प्रति बंडल ४५ फुले) असे उत्पादन मिळते. फिलरची दररोज १०० बंडल (प्रति बंडल१० काड्या) तर शेवंतीचे दररोज १०० किलो असे चार महिने उत्पादन मिळत राहते. गुलाब प्रति किलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. मागणी हंगामाच्या काळात तो १०० रुपयांपर्यंतही जातो. फिलरला सहा रुपये प्रति बंडल, शेवंती ५० रुपये प्रति किलो तर लिली पाच रुपये प्रतिबंडल असे दर मिळतात. वर्षाला चांगले उत्पन्न हाती येते.

विक्री व्यवस्था
फुलांची विक्री व्‍यवस्थाही बारी यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. जळगाव शहरातील वल्लभदास वालजी (गोलाणी) व्यापारी संकुलातील फूल बाजारात त्यांनी दुकान घेतले आहे. अन्य फूल उत्पादकांसोबतही त्यांचा संपर्क असतो. त्यांच्याकडूनही फुलांची खरेदी होते. नागपूर, पुणे, अमरावती, गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद आदी भागातील खरेदीदार, ग्राहकांना मागणीनुसार ते फुलांची पाठवणूक करतात. जळगाव व अन्य शहरांत लग्न समारंभ, अन्य कार्यांसाठी फुलांची सजावट, बुके, माळा, हार पुरविण्याचे कामही करतात. त्यासाठी चार जणांना रोजगारही दिला आहे. शेतात पॅकहाऊसची उभारणीही केली आहे.

एकोप्यामुळे प्रगती
बारी कुटुंबाचा दिवस पहाटे चार वाजताच सुरू होतो. कुटुंबात सुमारे १७ सदस्य आहेत. बहुतांश सदस्य
शेतात राबतात. श्रीराम व जयराम हे फुलांचा बाजार व अन्य बाबी सांभाळतात. वडील बाबूराव दिवसातील अधिक वेळ शेतालाच देतात. फुलांच्या विक्रीसाठी मालवाहू लहान वाहन खरेदी केले आहे. काहीवेळा रामकृष्ण विक्रीसाठी थेट हैदराबादलाही जातात. शेती सांभाळून बाजारपेठांत प्रत्यक्ष जाण्यासाठीही ऊर्जा ते राखून ठेवतात. सर्वांच्या एकोप्यामुळेच प्रगती झाल्याचे श्रीराम आवर्जून सांगतात. दुमजली टुमदार घरही बांधले आहे. शेतीचा एवढा पसारा असूनही सालगडीची नियुक्ती करण्याची गरज अद्यापही भासलेली नाही. वांगी, मुळा यांची गावातील आठवडी बाजारात हात विक्री होते. कृषी सहायक कमलेश पवार, भारत पाटील यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती घेतली जाते. कोव्हिड काळात फूलशेतीला काही महिने फटका बसला. पण यातून सावरून बारी कुटुंबीय पुन्हा उभारीने आपली शेती सांभाळत आहे. आषाढी एकादशीसाठीही फुलांना मागणी असते. त्यांचे दरही वाढलेले असतात. यंदाही ती आशा असल्याचे श्रीराम यांनी सांगितले.

संपर्क- श्रीराम बारी- ८८३०२०९४७०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...