प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’ तंत्राने किमया

जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके) यांनी बीबीएफ ( रुंद सरी-वरंबा टोकण तंत्रज्ञान) तंत्राचा चांगला प्रसार केला. त्यातून जिल्ह्यात विविध पिकांत सुमारे सहाशे हेक्टरपर्यंत हे तंत्रज्ञान विस्तारले. अवर्षण, पावसाची अनियमितता वा खंड, अति जास्त पाऊस अशा विविध समस्या निवारण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाच. शिवाय एकरी उत्पादनात वाढ होऊन अर्थकारणही सुधारण्यास मदत झाली.
केव्हीके, जालना येथे बीबीएफ तंत्राद्वारे पेरणी
केव्हीके, जालना येथे बीबीएफ तंत्राद्वारे पेरणी

जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके) यांनी बीबीएफ ( रुंद सरी-वरंबा टोकण तंत्रज्ञान) तंत्राचा चांगला प्रसार केला. त्यातून जिल्ह्यात विविध पिकांत सुमारे सहाशे हेक्टरपर्यंत हे तंत्रज्ञान विस्तारले. अवर्षण, पावसाची अनियमितता वा खंड, अति जास्त पाऊस अशा विविध समस्या निवारण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाच. शिवाय एकरी उत्पादनात वाढ होऊन अर्थकारणही सुधारण्यास मदत झाली.   सन २०१५ ते २०२० काळात जालना-खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने बीबीएफ तंत्राचा (रुंद सरी-वरंबा टोकण तंत्रज्ञान) प्रसार शेतकऱ्यांपर्यंत केला. आत्मा व क्रीडा संस्थेच्या समन्वयातून त्यासंबंधीची प्रशिक्षणे दिले. त्यात ८२२ शेतकऱ्यांचा सहभाग राहिला. पहिल्या वर्षी केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर एक हेक्‍टरवर प्रात्यक्षिक झाले. या यंत्राचे चार ते सात फणी असे प्रकार आहेत. रुंद गादी वाफा तयार करून दोन्ही बाजूस दोन सऱ्या तयार करणे, वरंब्यावर आंतरपीक घेणेही त्याद्वारे शक्य होते. तंत्राचे होणारे फायदे

  • पावसाच्या खंडामध्ये मूलस्थानी जलसंधारण
  • अतिरिक्त पावसाचे पाणी सऱ्यांद्वारे बाहेर काढता येते.
  • गादीवाफा असल्याने मुळांची वाढ होऊन पिकाची वाढ जोमाने
  • गादीवाफ्यामुळे जमिनीमध्ये सच्छिद्रता
  • उत्पादनात वाढ
  • अवर्षण ,पावसाची अनियमितता वा खंड, अति जास्त पाऊस आदी परिस्थितीत उपयोगी पडल्याचे केव्हीकेचे निष्कर्ष
  • यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत
  • खरीप, रब्बी अशा दोन्ही हंगामात तसेच तूर, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, मका, कांदा, भुईमूग, एरंडी आदी पिकांत वापर.
  • जमिनीची धूप अन् सेंद्रिय कर्ब मराठवाडा- विदर्भात पाच टन प्रति हेक्‍टर प्रति वर्ष प्रमाणात जमिनीची धूप होते. सेंद्रिय कर्ब ०.३५ टक्के ते ०.४० टक्के एवढा कमी आहे. त्यामुळे जमिनीच्या जलधारण क्षमतेवर त्याचा थेट परिणाम होतो. बीबीएफ तंत्रामुळे मूलस्थानी जलसंधारणासह अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा झाल्याने उत्पादकतेत शाश्वतता येण्यास मदत होत असल्याचे केव्हीकेच्या निष्कर्षातून समोर आले आहे. या पद्धतींचा वापर शक्य

  • चार ओळी सोयाबीन अधिक एक ओळ तूर
  • दोन ओळी सोयाबीन व दोन ओळी तूर
  • दोन ओळी मूग व दोन ओळी तूर
  • चार ओळी मूग एक ओळ तूर
  • यंत्राच्या वापरासाठी डॉ. पंडित वासरे यांच्या टीप्स

  • तिरपी प्लेट पिकानुसार बसवावी
  • दोन्ही बाजूचे रेझर समान पातळीत घ्यावेत.
  • बाजूच्या चाकाची उंची जमिनीच्या मगदुरानुसार ठेवावी
  • 'मिटरिंग सिस्टीम’ची चेन जास्त ताणलेली अथवा जास्त सैल असू नये
  • केव्हीकेच्या प्रात्यक्षिकांचे निष्कर्ष

  • ऑक्टोबरपर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या ५० टक्के पर्जन्यमानातही पिकाची वाढ चांगली
  • २० ऑक्टोबर, २०१९ नंतर झालेल्या जोरदार पावसानंतरही पाण्याचा निचरा झाल्याने पिकाचे नुकसान झाले नाही.
  • उत्पादनात १८ टक्के वाढ
  • प्रतिक्रिया यंदा कपाशीचीही लागवडही ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाद्वारे केली आहे. पुढील वर्षी त्याचे निष्कर्ष आमच्या हाती येतील. -पंडित वासरे-७३५००१३१५१ कृषी अभियंता, केव्हीके, जि. जालना शेतकरी अनुभव घरच्या सात फणी पेरणी यंत्रात सुधारणा करून केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली बीबीएफ पेरणी यंत्र तयार केले. तीन वर्षे वापर केल्यानंतर यंदा नव्याने पाच फणी यंत्र विकत घेतले. आधीच्या यंत्रात सातऐवजी चार फण ठेवून दोन तासातील १३ ते १४ इंच अंतर १६ इंचावर नेले. हरभऱ्यात वापरलेल्या तीन फणी यंत्रामुळे सातत्याने होणारी मर वाचली. केवळ सरीतच गवत उगवले. ३२ ते ३५ किलोपर्यंत सोयाबीन बियाण्याचा एकरी वापर २६ ते २८ किलोवर आला. पूर्वी ६ ते ७ क्विंटल एकरी उत्पादन १० ते ११ क्विंटलपर्यंत मिळाले. हरभऱ्याचेही एकरी तीन क्विंटल उत्पादन वाढले. एकरी एक बैलजोडी व एक मजूर व एकहजार ते पंधराशे रुपयांची बचत झाली. सरी-वरंबा पद्धतीमुळे जमिनीत हवा खेळती राहिली. पिकाचे पोषण चांगल्या प्रकारे झाले. -पांडुरंग डोंगरे-९९२१२५७५९१ कर्जत, ता. अंबड, जि. जालना पाच वर्षांपासून एकत्रित कुटुंबातील २५ एकरांपैकी १० एकरांत खरीप व रब्बी हंगामात बीबीएफ च्या माध्यमातून पेरणी करतो. जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा होऊन जमिनीचा वाफसा येण्यास मदत होते. कमी पाऊस झाल्यास ओलावा टिकून राहून पिकाची पाण्याची गरज भागवण्यास मदत होते. तुरीचे दोन ते अडीच क्विंटल एकरी उत्पादन तीन ते साडेतीन क्विंटल तेही कोरडवाहू क्षेत्रात तर सोयाबीनचे चार ते पाच क्विंटल एकरी उत्पादन सात ते आठ क्विटंलपर्यंत पोचले आहे. सोयाबीन बियाण्याचा एकरी ३० किलो वापर २० ते २२ किलोवर आला. एकरी सातशे ते आठशे रुपये बचत झाली. एकरी तीन मजुरांची गरज केवळ एका मजुरावर आली. एकरी सहा ते आठ हजार रुपये निव्वळ नफा झाला. तीन-चार वर्षांपूर्वी केवळ शंभर एकरांवर या तंत्रज्ञानाने होणारी पेरणी गटाद्वारे पाचशे ते सहाशे एकरांवर पोचली आहे. आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीअंतर्गत सुमारे ७० टक्के शेतकरी या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करू लागले आहेत. -डॉ. श्रीहरी काळे-९४२३५५१४५१ अध्यक्ष, हरियाली ग्रीन व्हेज प्रोड्यूसर कंपनी वडीकाळ्या, ता. अंबड जि. जालना जिल्हा परिषदेच्या आग्रहामुळे दहा वर्षांपूर्वी बीबीएफ यंत्र विकत घेतले. पावसाच्या खंडात जमिनीतील ओलावा टिकून राहून पिकाची पाण्याची गरज भागवण्याची क्षमता या तंत्रात कमालीची आहे असा अनुभव आला. दोन रोपांतील अंतर गरजेनुसार ठेवण्याची सोय त्यात आहे. त्यामुळे झाडांची संख्या अपेक्षित राहून मोकळी हवा व सूर्यप्रकाश पिकाला मिळतो. पावसाचा खंड व अति पाऊस या दोन्ही परिस्थितीत पिके तग धरतात. सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कांदा आदी पिकात एकरी १५ ते २० टक्के उत्पादनवाढ अनुभवतो आहोत. -उद्धवराव खेडेकर-९४२३७३०६५७ शिवनी, ता. जि. जालना  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com