बहुविध तसेच आंतरपीक पद्धतीतून शोधला हमखास उत्पन्नाचा मार्ग 

भागवत सोमटकर यांची कारले पिकाची शेती
भागवत सोमटकर यांची कारले पिकाची शेती

वाशिम जिल्ह्यात घाटा (ता. मालेगाव) येथील भागवत देवराव सोमटकर या तरुण शेतकऱ्याने द्राक्ष लागवडीचे धारिष्ट्य केले. काही अडचणींमुळे हा प्रयोग फसला. मोठे नुकसान झेलावे लागले. परंतू हार न मानता त्यांनी पीकपद्धतीचा अभ्यास केला. दीर्घ व कमी कालावधीची पिके यांची सुसंगती ठेवून बारमाही उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. संत्रा, कारले, टोमॅटो, हळद आदी त्यांची म्हणूनच हुकमी पिके तयार झाली आहेत.  वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील घाटा येथे भागवत सोमटकर यांची शेती आहे. त्यांचे वडील देवराव सेवानिवृत्त शिक्षक आहेत. भागवत यांना दोन बंधू असून सर्वजण शेतीतच आहेत.  सर्वात लहान असलेले भागवत ‘एमएस्सी फिजिक्स’ असून त्यांच्या वाट्याला १६ एकर जमीन आली आहे. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीतच प्रयोगशीलता सिद्ध करायचे ठरवले.  संपूर्ण शेती आणली सिंचनाखाली  वाट्याला आलेल्या शेतीपैकी आठ एकरांत सिंचन व्यवस्था होती. उर्वरित शेती कोरडवाहू होती. भागवत यांनी २००७ मध्ये व पुन्हा २००९ मध्ये विहीर खोदली. त्या आधारे आज संपूर्ण शेती ओलिताची केली आहे. दरवर्षी पाऊस कमी होत असल्याने विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे पाण्याचा शाश्वत स्रोत म्हणून २४ बाय २४ बाय २ मीटर आणि ३४ बाय ३४ बाय २ मीटर अशा आकाराची दोन शेततळी उभारली. यामुळे फळबाग, भाजीपाला तसेच पारंपरिक पिकांना पाणी देण्याची सोय झाली. सध्या ते प्रत्येकी चार एकरात संत्रा, मूग किंवा उडीद, सोयाबीन, दोन एकरांत हळद घेतात. वर्षातून दोन हंगामात कारलेही घेतात. मिश्र पीक किंवा आंतरपीक अशी त्यांची पद्धती आहे.  द्राक्षाच्या तारांवर कारल्याचे पीक  वाशीम जिल्ह्यात आणि त्यातही घाटासारख्या गावात द्राक्ष लागवडीचे धाडस भागवत यांनी केले. सन २०१५ मध्ये दोन एकरांत द्राक्षबाग उभारली. सुरुवातीपासून चोख व्यवस्थापन सांभाळले. प्रत्येक तांत्रिक बाब समजून घेतली. अडचणींवर मात करीत द्राक्षबाग उभी केली. परंतु हवामान मानवले नाही. सातत्याने ओढाताण होऊ लागली. दोन एकरांतील बागेसाठी २० लाखांवर खर्च झाला होता. उत्पन्न त्या तुलनेत फारच कमी मिळाले. अन्य शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. कर्जबाजारी स्थिती उत्पन्न झाली. अखेर तातडीने निर्णय घेत बाग काढून टाकली. द्राक्षाच्या तारांवर कारल्याचे पीक घ्यायला सुरवात केली.  कारल्यातून प्रयोगशीलता जपली  द्राक्ष पीक बंद केले तरी बागेचे स्ट्रक्चर कायम ठेवले. त्या आधारे कारले पिकाचा प्रयोग सरू केला.  वर्षातून दोन हंगामात हे पीक घेण्याचा पायंडा भागवत यांनी ठेवला आहे. गेल्या ऑक्टोबर हंगामात  एक एकरात लावलेल्या कारले पिकातून त्यांनी एकरी चार टन उत्पादन घेतले. जानेवारी ते मार्च या कालावधीत थंडीत अन्य कुठून आवक नसल्याने त्यांना किलोला ४५ ते ५५ रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला. सरासरी दर ३० रुपये मिळाला. या पिकाने त्यांना लाखाचे उत्पन्न मिळवून दिले. कारल्यासह टोमॅटो पिकातही त्यांनी कुशलता संपादन करण्यास सुरवात केली आहे.  कारल्याच्याच बरोबरीने सुमारे एक एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. त्यातून ८०० क्रेट उत्पादन मिळाले. त्यातूनही ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. कारले, टोमॅटो, मिरचीची मालेगाव बाजारपेठेत विक्री केली जाते.  आंतरपिकांवर जोर  बहुविध पीक पद्धतीचा आदर्श जोपासताना भागवत मिश्र किंवा आंतरपीक पद्धतीचा वापर करतात.  कारल्याचे पीक घेताना यंदा पॉली मल्चिंगवर मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. यामध्ये वर्षभरापूर्वी संत्र्याची रोपेही लावली. येत्या काही वर्षात या ठिकाणी संत्रा बाग उभी राहील. तोपर्यंत आंतरपीक घेत उत्पन्न मिळवत राहू असे भागवत म्हणतात. आंतरपिकामुळे एका पिकावरील भार कमी होतो. एक पीक साध्य न झाल्यास दुसरे पीक उत्पन्न देऊन जाते. दोन्ही पिके चांगली जमली तर उत्पन्न अधिक मिळते. पारंपरिक सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचेही चांगलेच उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. सोयाबीनचे एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन येते.  संत्र्यातून शाश्वत उत्पन्न  भागवत यांची चार एकरात संत्रा बाग आहे. त्यातील सुमारे २५० झाडांपासून दरवर्षी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत राहते. वर्षभरापूर्वी ३६० नवी रोपे लावली आहेत. बागेची जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. यावर्षी ४८० रुपये प्रतिक्रेट दराने ही विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. संत्र्यातही भाजीपाल्याचे आंतरपीक घेण्याचा प्रयत्न असतो.  हळदीत सातत्य  दरवर्षी दोन एकरांत सेलम जातीच्या हळदीची लागवड होते. संत्र्यात आंतरपीक म्हणून तसेच सलग क्षेत्रातही फेरपालट करून या पिकाचे नियोजन केले जाते. एकरी २२ ते २५ क्विंटलपर्यंत वाळलेले उत्पादन मिळते. त्यासाठी एकरी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. दरवर्षी ६५०० ते ७००० हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होते. बहुविध पीक पद्धतीतून भागवत यांनी आपला वार्षिक उत्पन्नाचा ताळेबंद  चांगल्या प्रकारे बसवला आहे. दोन मजूर कायमस्वरूपी आहेत.  घाटा गावाविषयी  मालेगाव तालुक्यातील घाटा हे सुमारे ७५० लोकसंख्येचे गाव आहे. गावाचे क्षेत्र ३५० हेक्टर आहे. त्यापैकी १०० हेक्टरवर संत्रा आहे. गावात ४५ शेततळी उभारली आहेत. तर २५ पर्यंत शेडनेटस दिसून येतात. मिरची, टोमॅटो आदींच्या संकरीत बियाण्यांचे उत्पादन त्याद्वारे घेतले जाते. गावाने अलीकडील चार पाच वर्षांत प्रयोगशील शेतीत चांगली झेप घेतली आहे.  संपर्क- भागवत सोमटकर- ९८६०२९३९८५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com