भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका, राज्यात ठरावे पहिलेच गाव

काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी परिवर्तनाची कास धरली आहे. भिडी (ता. देवळी, जि. वर्धा) हे त्यापैकीच एक गाव शेती यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. गावात महिला समूहांच्या माध्यमातून तब्बल ११ भाडेतत्तावावरील यंत्रे उपलब्ध करणाऱ्या केंद्रांची ( कस्टम हायरिंग सेंटर्स) उभारणी झाली आहे. सर्वाधिक अवजार बॅंक आणि ‘बीबीएफ’ तंत्राखालील क्षेत्रात वाढ केलेले भिडी हे राज्यातील एकमेव गाव असावे असे सांगितले जात आहे.
ट्रॅक्टर चालविताना भिडी गावातील महिला गटाच्या सदस्य.
ट्रॅक्टर चालविताना भिडी गावातील महिला गटाच्या सदस्य.

काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी परिवर्तनाची कास धरली आहे. भिडी (ता. देवळी, जि. वर्धा) हे त्यापैकीच एक गाव शेती यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. गावात महिला समूहांच्या माध्यमातून तब्बल ११ भाडेतत्तावावरील यंत्रे उपलब्ध करणाऱ्या केंद्रांची ( कस्टम हायरिंग सेंटर्स) उभारणी झाली आहे. सर्वाधिक अवजार बॅंक आणि ‘बीबीएफ’ तंत्राखालील क्षेत्रात वाढ केलेले भिडी हे राज्यातील एकमेव गाव असावे असे सांगितले जात आहे.   वर्धा-यवतमाळ मार्गावर वर्ध्यांपासून २८ किलोमीटरवर भिडी हे टूमदार गाव वसले आहे. लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. ग्रामपंचायतीला ‘आयएओ’ दर्जा मिळाला असून कार्यालय प्रशस्त आहे. नागरिकांना रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सामूहिक सिंचनाचा पहिला प्रयोग राज्य शासनाच्या गटशेती योजनेतून २०१७-१८ मध्ये गावात परिवर्तनाचे पहिले पाऊल पडले. त्या वेळी स्वयंसाह्यता समूहाची उभारणी होऊ शकेल काय? या संदर्भाने अधिकाऱ्यांकडून चाचपणी करण्यात आली. त्यांच्या या प्रयत्नाला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भिडी शेतकरी समूह असे नामकरण करून गटाची उभारणीही झाली. अध्यक्ष अजय झाडे, तर सचिव गजानन फाळे यांच्यासह २० जण सदस्य झाले. गटाने सामूहिक सिंचनाचा आदर्श प्रकल्प राबविला. सदस्य सचिन गायकवाड यांची शेती वीस वर्षांसाठी करारावर घेण्यात आली. पाच एकरांत सामूहिक विहीर खोदण्यात आली.नऊ शेतकरी त्याचा लाभ घेतात. या माध्यमातून ७५ एकर शेती सिंचनाखाली आणणे शक्‍य झाले आहे. बीबीएफ लागवडीत पुढाकार मागील वर्षी गावात ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर सोयाबीन पिकात करण्यात आला. पूर्वी एकरी ३० किलोपर्यंत लागणारा बियाणे दर त्यातून २२ ते २४ किलोपर्यंत खाली आला. एकरी उत्पादकता ९ क्‍विंटल वरून १२ क्‍विंटलपर्यंत पोहोचली असे शेतकरी सांगतात. फवारणी, सिंचन सुलभ झाले. यंत्र वापराचे फायदे लक्षात आल्यानंतर अनेकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. परिणामी, पुढील हंगामात ‘बीबीएफ’ वापरकर्त्यांची संख्या आणि क्षेत्रही वाढले. यंदाच्या खरिपात २५० ते ३०० एकरांवर या तंत्राचा वापर झाला. राज्यात ‘बीबीएफ’ खाली एवढे मोठे क्षेत्र असलेले हे पहिलेच गाव असू शकेल. यांत्रिकीकरणात महिलांची भरारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून तब्बल ११ महिला समूहांना अवजार बॅंक वितरीत केल्या. इतक्‍या संख्येत अवजार बॅंक असणारे गाव हे देखील भिडीचे दुसरे वैशिष्ट्य सांगता येणार आहे. ‘पोकरा’ प्रकल्पातून शेडसहित अवजार खरेदीसाठी ६० टक्‍के अनुदान दिले जाते. उर्वरित लाभार्थी हिस्सा राहतो. महिलांचा उत्साह पाहता ‘बॅंक ऑफ इंडिया’चे व्यवस्थापक प्रकाश मून यांनी प्रत्येक समूहाला पाच लाख रुपयांच्या कर्जाची उपलब्धता केली. प्रेरणा स्वयंसाह्यता गटाच्या अध्यक्ष सुरेखा ढोमणे, तर सचिव वनीता फाळे असून सदस्य बारा आहेत. शंभर रुपये महिना बचतीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गावशिवारातील शेतकऱ्यांसोबतच नजीकच्या गावातील शेतकऱ्यांनाही या बॅंकेतून अवजारे उपलब्ध केली जातात. राणी लक्ष्मीबाई महिला समुहाच्या अध्यक्षा सपना काळे, तर सचिव प्रियंका आठवले असून, बारा सदस्य आहेत. या समूहाने देखील आपला आर्थिक ताळेबंद जपला आहे. यंत्रांची सामूहिक खरेदी मध्यस्थ किंवा वितरकाशी संपर्क न साधता थेट कंपनीसोबतच संपर्क साधून ११ ट्रॅक्‍टर्स खरेदी करण्यात आले. त्यातून प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे ११ लाख रुपये वाचविण्यात यश आले. अवजार बॅंकसाठी लागणाऱ्या अन्य यंत्रांच्या खरेदीसाठीही असाच प्रयत्न करून समूहाने मोठी आर्थिक बचत केली. ट्रॅक्‍टर व चलित अवजार एकमेकांना वापरण्यासाठी देण्याचा निर्णय समूहांनी घेतला.त्यामुळे वेळ, पैसा, श्रम यांच्यात बचत करता आली. पंजी, रोटावेटर, पल्टी नांगर, बीबीएफ पेरणी यंत्र अशी उपलब्धता आहे. गावने मिळवली ओळख निम्न वर्धा प्रकल्पातून गावाला पाण्याची उपलब्धता होते. त्यामुळे ८५ टक्‍के क्षेत्र ओलिताखाली आहे. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत प्रकल्पातून पाणी मिळते. त्याचा वापर करून गहू, हरभरा, मूग, तीळ आदी पिके घेतली जातात. सिंचन प्रकल्पामुळे गावशिवारात संपन्नता नांदत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी अजयकुमार राऊत, प्रभारी देवळी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प विशेषज्ञ प्रशांत साठे, कृषी सहायक संतोष पानगावे यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांची सकारात्मक जोड मिळाली आहे.

प्रतिक्रिया गावाला अवजार बॅंक देण्याच्या योजनेला ग्रामस्थांचा प्रतिसाद सुरुवातीला कमी होता. मात्र आज त्यासाठी स्पर्धाच निर्माण झाली आहे. बहुतांशी महिला समूहांनी त्यासाठी उत्सुकता दर्शविली. परिणामी, गावात ११ अवजार बॅंका उभ्या राहिल्या. यंत्रे ठेवण्यासाठी शेडस बांधले आहेत. राज्यात सर्वाधिक अवजार बॅंक असलेले आणि त्याच्या वापरातून ‘बीबीएफ’खालील क्षेत्रात वाढ करणारे हे एकमेव गाव असावे. - अजयकुमार राऊत, ९४२३११०८१० उपविभागीय कृषी अधिकारी, वर्धा रस्त्यांअभावी पावसाळ्यात शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे योजनांमधून गावशिवारात १४ पाणंद रस्त्यांची कामे केली जातील. ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवून गावाची सुरक्षा तसेच वृक्षलागवड व जलसंधारणावर भर दिला जाईल. - सचिन बिरे, ९९७०३२०९६२ सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com