संयुक्त कुटुंबाने दुग्धव्य़वसायातून दिली शेतीला बळकटी

खडकी (ता. जि. नांदेड) येथील कदम यांचे तब्बल ३५ सदस्यांचे मोठे कुटुंब एकत्रित गुण्यागोविंदाने नांदते आहे. सुमारे ९० एकर शेतीत फळपिके, हंगामी पिके घेताना ४० म्हशींच्या संगोपनातून दुग्धव्यवसाही त्यांनी आकारास आणला आहे.
कदम यांचा मुक्तसंचार पध्दतीचा गोठा
कदम यांचा मुक्तसंचार पध्दतीचा गोठा

खडकी (ता. जि. नांदेड) येथील कदम यांचे तब्बल ३५ सदस्यांचे मोठे कुटुंब एकत्रित गुण्यागोविंदाने नांदते आहे. सुमारे ९० एकर शेतीत फळपिके, हंगामी पिके घेताना ४० म्हशींच्या संगोपनातून दुग्धव्यवसाही त्यांनी आकारास आणला आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी समर्थपणे पार पाडत एकोप्यातून कुटुंबाच्या अर्थकारणाला बळकटी दिली आहे.   नांदेडपासून सुमारे आठ किलोमीटरवरील खडकी येथील मारोतराव, रामराव व शंकरराव या कदम बंधूंचे एकत्रित मोठे कुटुंब आहे. गावच्या शिवारात त्यांची सुमारे ९० एकर मध्यम ते भारी जमीन आहे. ऊस, मोसंबी, हळद, ज्वारी, सोयाबीन, गहू, मूग, उडीद, भाजीपाला, चारा अशी बहुविध पीक पद्धती त्यांनी जोपासली आहे. सिंचनासाठी चार विहिरी, दोन बोअर्स आहेत. अवर्षणामुळे शेतीत पर्याय हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येलदरी-सिध्देश्वर धरणाच्या एकमेव कालव्याच्या लाभक्षेत्रात कदम कुटुंबाची शेती आहे. घेल्या पाच वर्षांतील अपुऱ्या पावसामुळे धरण भरण्याची खात्री राहिली नाही. धरणाच्या कालव्याचे पाणीही त्यामुळे पुरेसे मिळत नसल्याने कदम यांच्या शेतीवर परिणाम झाला. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात सहा किलोमीटरवरून पाणी विकत आणून मोसंबीची बाग जगवली. सततच्या अवर्षणात पीक उत्पादन धोक्यात आले. तेवढ्या उत्पन्नावर मोठ्या कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड झाले होते. पर्याय शोधताना दुग्धव्यवसायाचा विचार पुढे आला. दोन म्हशींपासून सुरुवात दोन वर्षांपूर्वी दोन जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. नांदेड शहरात दूधविक्री सुरू केली. दोन वेळेचे मिळून दररोज २० ते २५ लीटर दूध मिळायचे. त्यातून ताजे उत्पन्न मिळू लागले. त्यासह पीक उत्पन्नातील बचतीतून कदम यांनी टप्प्याटप्प्याने म्हशी खरेदी करून व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. ठळक बाबी

  • सध्या म्हशींची संख्या ४०
  • भाकड म्हशी खरेदी करून त्यांचाही सांभाळ
  • दररोजचे दूध संकलन १५० ते २०० लीटर
  • १०० बाय ३५ फूट आकाराचा सुसज्ज गोठा
  • सिमेंट विटांच्या भिंती, टीन पत्र्याचे छत असलेल्या गोठ्यामध्ये जमिनीवर सिमेंटचा थर. त्यामुळे
  • साफसफाई करणे सोपे.
  • परस्पर विरुद्ध दिशेला गव्हाणीची रचना
  • तापमानामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी छताला पंखे
  • १०० बाय ४० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा.
  • त्यासाठी बांबू, उसाचे पाचट, तुऱ्हाट्यांचा वापर
  • चारा व्यवस्थापन

  • जनावरांची संख्या अधिक असल्याने पाच ते सहा एकरांत विविध जातीच्या गवतांची लागवड
  • त्यामुळे सुका तसेच हिरवा चारा उपलब्ध
  • -कडब्याची नासाडी टाळण्यासाठी यंत्राव्दारे कुट्टी
  • विविध पिकांचा भुस्सा जमा करून साठवणूक
  • दुधाळ म्हशीला दररोज एका वेळेस अडीच किलो सरकी पेंडीचा खुराक
  • कुटुंबाची एकी हेच यशस्वी शेतीचे कारण कदम यांच्या कुटुंबात तब्बल ३५ सदस्य आहेत. नांदेडसह शेजारील जिल्ह्यांमधील मोजक्या मोठ्या कुटुंबांपैकी त्यांचे कुटुंब आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवरच आधारलेले आहे. मारोतराव यांना संभाजी, गजानन, संदीप, शंकरराव यांना शिवाजी, त्र्यंबक, अर्जुन हे तीन तर रामराव यांना वसंत, उद्धव, आदिनाथ हे तीन मुलगे आहेत. उद्धव आणि संदीप पैलवान आहेत. घरची कुस्तीची परंपरा त्यांनी जपली आहे. विविध कुस्त्यांच्या स्पर्धेतील विजयाचे ते मानकरी आहेत. हे दोघे तसेच अर्जून यांच्यावर दुग्धव्यवसायाची जबाबदारी आहे. अन्य भाऊ शेतीकामांचे व्यवस्थापन पाहतात. प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून स्वयंस्फूर्तीने राबतो. कदम वारकरी व माळकरी कुटुंब आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांवर आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत. सर्वांमध्ये एकोपा असल्यानेच शेतीतील ताण हलका होण्यास व अर्थकारणाला बळकटी मिळण्यास मदत झाल्याचे कुटुंबातील उद्धव सांगतात. दूध विक्री नांदेड येथे सोयरिकांचेच दूध विक्री केंद्र आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी मोटरसायकलला कॅन बांधून तेथे दूध पोचविले जाते. प्रतिलीटर सरासरी ५० रुपये दर मिळतो. या व्यवहारातून कदम व सोयरीक अशा दोघांचा फायदा होतो. शेणखतामुळे जमिनीची वाढली सुपीकता म्हशी, बैल, गीर गायी अशी लहान मोठी मिळून ५५ जनावरे आहेत. दरवर्षी १०० ते १२५ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत मिळते. त्यातून जमिनीची सुपीकता वाढली आहे. रासायनिक खतांचा वापर व खर्चही कमी झाला आहे. उत्पादनात वाढ झाली आहे. पीक पद्धती

  • मोसंबी १५ एकर
  • हळद १० एकर, ऊस ३५ एकर, ज्वारी ५ एकर, सोयाबीन २० एकर, मूग, उडीद प्रत्येकी १ एकर, गहू १० एकर, उर्वरित क्षेत्रावर चारा तसेच भाजीपाला
  • मोसंबीचे एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन. नागपूर येथील कळमना बाजार समितीत विक्री
  • उसाचे एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन
  • अन्नधान्य पिकांच्या उत्पादनातून कुटुंबाच्या गरजा भागतात.
  • कृषी विभागाचे सहकार्य...

  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील, कृषी पर्यवेक्षक एस.एम. करंजकर, कृषी सहाय्यक यू.जे.मगर यांचे मार्गदर्शन
  • कांदा चाळ, मागेल त्याला शेततळे, कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर आदी साधनांचा लाभ
  • शेततळ्याला अस्तरीकरण केल्याने संरक्षित सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता
  • संपर्क- उद्धव कदम- ९९२१३०००३० संभाजी कदम-९८२२६४०८२१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com