बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट खतनिर्मिती

कपाशीच्या पऱ्हाट्यापासून बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार करता येते. दीड फूट उंचीचा एक थर करून त्यात शेणकाला, बायोडायनॅमिक कल्चर मिसळून पुन्हा दुसरा थर रचावा. संपूर्ण थर रचून झाल्यानंतर शेणाच्या साह्याने लिंपून घ्यावे.
कपाशीच्या पऱ्हाट्यापासून बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार करता येते. दीड फूट उंचीचा एक थर करून त्यात शेणकाला, बायोडायनॅमिक कल्चर मिसळून पुन्हा दुसरा थर रचावा. संपूर्ण थर रचून झाल्यानंतर शेणाच्या साह्याने लिंपून घ्यावे.

बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर आधारित जैव ऊर्जा म्हणजेच बायोडायनॅमिक तंत्र होय. यात ब्रह्मांडातील ग्रह, तारे यांचा पृथ्वी, वनस्पती, जल स्तरावर होणारा सकारात्मक परिणामांचा विचार केलेला असतो. यामध्ये कोणत्याही रसायनांचा वापर केलेला नसतो. कमी वेळेमध्ये फारशी देखभालीशिवाय उत्तम दर्जाचे कंपोस्ट या पद्धतीतून मिळू शकते. बायोडायनॅमिक पद्धतीमध्ये प्रत्येत अन्नघटकाचा उदा. नत्र, स्फुरद, पालाश अशा वेगवेगळा विचार करण्याऐवजी समग्र अन्नद्रव्यांचा विचार केला जातो. शेतात शेणखताचा वापर महत्त्वाचा असला तरी सद्यःस्थितीत जनावरांची संख्या आणि त्यापासून शेणखतांची उपलब्धता कमी झालेली आहे. त्यातही उपलब्ध असलेल्या शेणखत वाळलेले, शेण्या अथवा गोवऱ्या झालेले, तणाचे बिया व प्लॅस्टिक असलेले असे असते. त्यामुळे शेणखताच्या वापराचे फायदे होण्यासोबतच अनेक प्रकारे नुकसानकारकही ठरते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ताज्या शेणाने खतांचे खड्डे भरण्याऐवजी मूग-उडीद -सोयाबीन अशा उपलब्ध काडाचे कंपोस्ट करण्यासाठी केला पाहिजे. अशा प्रकारचे कंपोस्ट हे बायोडायनॅमिक पद्धतीने वेगाने व कमी खर्चात करणे शक्य होते. बायोडायनॅमिक कंपोस्टसाठीची पूर्वतयारी 

  • बायोडायनॅमिक पद्धतीने पीक अवशेषांचे थरावर थर रचले जातात. त्यापासून साधारणत: दोन अडीच महिन्यांत कंपोस्ट तयार होते. याकरिता थोडी पूर्वतयारी केल्यास वेळेची बचत होते.
  • कंपोस्ट करावयाच्या पिकांचे अवशेष ४-५ दिवस पुरेसे ओले करावे. ते नरम होऊन जिवाणूंना काम करणे सोपे होते. सोयाबीन काड, मूग, उडदाच्या शेंगाची टरफले त्वरित कंपोस्टसाठी वापरता येतात. ते चांगल्या प्रकारे व पूर्णपणे कुजतात.
  • अगोदर १ बैलगाडी ओले शेण जमा करून ठेवावे.
  • हिरवा पाला कोणत्याही वनस्पतीचा २ बैलगाड्या जमा करून ठेवावा.
  • एका ढिगासाठी १ किलो बायोडायनॅमिक एस-९ हे विरजण स्वरूपात लागते.
  • कंपोस्ट करण्यासाठी खड्डा खोदण्याची गरज नाही. शेतातील उंचावरील सपाट जागा निवडून, पूर्व-पश्चिम दिशेने १५ फूट लांब आणि ५ फूट रुंद अशी जागा आखून घ्यावी. त्यावर पाणी शिंपडून ओलसर करावे.
  • अगोदरच शेणकाला तयार करून ठेवावा. एक किलो बायोडायनॅमिक एस-९ हे तेरा लिटर पाण्यात १ तासभर उलट-सुलट पद्धतीने घोळून तयार ठेवावे. गरजेनुसार ते जादा पाण्यात टाकून वाढवून घेता येते.
  • ताज्या शेणाचा शेणकाला वेगळ्या टाकीमध्ये करून ठेवावा.
  • असे रचावेत थर  पहिला थर-अगोदरच पुरेसे ओले केलेल्या पीक अवशेषांचा एक फूट उंचीचा थर रचावा. त्यावर एस-९ द्रावण शिंपडावे आणि पुरेसा शेणकाला टाकावा. या थरावर हिरवा झाड पाला एक फूट उंचीपर्यंत पसरवून, त्यावर एस-९ द्रावण शिंपडावे. शेणकाला टाकून शेतातील २ घमेले माती पसरवावी. असा पहिला थर तयार होईल. या पद्धतीने ५ फूट उंचीपर्यंत एकावर एक थर रचावेत. नंतर शेणकाला व माती मिसळून आणि उपलब्ध असल्यास गव्हांडा टाकून तयार केलेल्या मिश्रणाने ढीग पूर्णपणे जमिनीपर्यंत लिंपून घ्यावा. गोवऱ्यांचा उडा लिंपला जातो, त्याप्रमाणे लिंपन करावे. उकरी करणे   एक महिन्यानंतर या ढिगाचा आकार लहान होतो. त्या वेळी पूर्ण ढीग फावड्याने किंवा दाताळ्याने उकरून सरमिसळ करून घ्यावे. यावर पुरेसे पाणी टाकून ओले करून पुन्हा शेणकाल्याने लिंपून टाकावे. या वेळी एस-९ टाकण्याची गरज नाही. अशा प्रकारे साधारण एकूण ६०-७० दिवसांत दर्जेदार कंपोस्ट खत तयार होते. याचा रंग काळसर भुरकट असतो. सर्व पीक अवशेषांचे कंपोस्ट झालेले असते. जे पदार्थ नुसत्या शेणखड्ड्यामध्ये कुजण्यासाठी ८ ते ९ महिने लागतात, त्याऐवजी दोन ते अडीच महिन्यात चांगले कुजलेले खत उपलब्ध होते.

  • सध्या कपाशी शेवटच्या टप्प्यात असून, कपाशीच्या काढणीनंतर पऱ्हाट्यांचे कंपोस्ट करणे शक्य आहे. ज्या दिवशी कपाशी वेचणे थांबते, त्या वेळी कपाशीवर हिरवा पाला, बोंडे, फुले असतात. अशा हिरव्या पऱ्हाट्या लगेच उपटून त्याचा शेतातच १५ फूट लांब ५ फूट रुंद जागेवर १ ते १.५ फूट उंचीचा ढीग तयार करावा.
  • एक किलो एस-९ हे तेरा लिटर पाण्यात एक तास चांगल्या प्रकारे मिसळून तयार ठेवावे.
  • १०० लिटर पाण्यात ५ मोठे घमेले ताजे शेण टाकून शेणकाला तयार करून ठेवावा. पऱ्हाट्या रचलेल्या थरावर पुरेसा शेणकाला, पुरेसे एस-९ कल्चरचे मिश्रण टाकून त्यावर २-४ घमेले शेतातील माती पसरावी. यावर हिरव्या वनस्पतीचा पाला पसरवून त्यावर पुन्हा पऱ्हाट्याचा थर रचावा. या थरावर पुन्हा हिरव्या पऱ्हाट्याचा थर वरीलप्रमाणे रचावा. ४ फूट उंचीपर्यंत असे थर रचून ढिगावर सर्व बाजूने वेगळा शेणकाला माती मिसळून लिंपून घ्यावा.
  • एकदा लिंपल्यानंतर ढिगावर पाणी टाकण्याची गरज नाही.
  • दीड महिन्यानंतर ढीग उकरून पलटी देऊन सरमिसळ करून घ्यावा आणि त्यास पुरेसे ओले करून ढीग रचून पुन्हा लिंपून घ्यावे. पुढील दीड महिन्यात पऱ्हाट्यांचे बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार होईल.
  • एक एकरातील पऱ्हाट्यांचे साधारणत: वरील आकाराचे दोन ते अडीच कंपोस्ट ढीग तयार होतात. कपाशीच्या बोंडामध्ये असलेल्या बोंड अळ्या, कोष, याबरोबरच कपाशीतील रेडबग यांचेही नियंत्रण होईल.
  • पऱ्हाट्या जाळण्याऐवजी या पद्धतीने जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
  • पुढील पिकासाठी नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होईल.
  • काळजी 

  • ढीग तयार करताना किंवा लिंपताना त्यावर चढू नये. कारण ढीग दबून आतील हवा निघून जाऊ शकते.
  • गुरांनी किंवा इतर कारणांनी ढीग फुटल्यास किंवा तडा गेल्यास तेवढा शेणकाल्याने लिंपून घ्यावा.
  • ढीग लिंपून बंद केल्यानंतर त्यावर शेणखत किंवा काडी कचरा टाकू नये.
  • ढीग लिंपून झाल्यानंतर त्यावर पुन्हा पाणी टाकण्याची गरज नाही.
  • तयार झालेले कंपोस्ट खत लगेच शेतात पेरून किंवा रांगोळी पद्धतीने वापरता येते. पुढील हंगामासाठी ठेवायचे झाल्यास सावलीत साठवून त्यात ओलावा टिकवून ठेववल्यास त्यातील अन्नघटक व जीवाणूंचे संवर्धन होईल.
  • फायदे 

  • १५ फूट लांब व ५ फूट रुंद आकाराच्या ढिगातून साधारणत: १० क्विंटल पूर्णपणे कुजलेले कंपोस्ट मिळेल. पीक अवशेष उदा. मूग, उडीद, शेंगाची टरफले, सूर्यफुलाचे काड, पऱ्हाट्या, गव्हांडा हे जाळून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याऐवजी त्याचे कंपोस्ट केल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढून सुपीकता वाढेल.
  • बायोडायनॅमिक कंपोस्ट ढिगातून साधारणत: पिकांसाठी नत्र १८-२० किलो, उपलब्ध स्फुरद १८-२० किलो व पालाश १० किलोपर्यंत मिळू शाकतो. याचबरोबर गंधक, झिंक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आणि लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात.
  • बायोडायनॅमिक कंपोस्ट हे पिकाच्या आवश्यकतेनुसार नायट्रोजन कंपोस्ट, फॉस्फरस कंपोस्ट, पोटॅश कंपोस्ट आणि सल्फर कंपोस्ट असेही करता येते.
  • बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार करण्यासाठी खड्डा खोदण्याची आवश्यकता नाही. सावलीकरिता शेड उभारण्याचा खर्च नाही किंवा दररोज पाणी देणे व देखभालीचीसुद्धा गरज नाही.
  • पूर्वतयारी केली असल्यास दोन मजूर एका दिवसांत २ ढीग बनवू शकतात.
  • पूर्णपणे तयार झालेल्या कंपोस्ट ढिगाखाली बऱ्याच वेळा शेतातील गांडुळे जमा झालेली दिसून येतात. जमिनीमधील जिवाणू व गांडूळांना सक्रिय करण्यास बायोडायनॅमिक कंपोस्ट मोलाचे कार्य करते.
  • एका ढिगातून साधारणत: १० क्विंटल म्हणजे ५० किलो वजनाची सुमारे २० पोती सेंद्रिय खत घरीच तयार होऊ शकते.
  • एका एकरामध्ये किमान २ ते ३ ढीग कंपोस्ट रांगोळी पद्धतीने किंवा पेरून दिल्यास पुरेसे होते.
  • कुंवरसिंह मोहने, ९८५०३८५१९६ (लेखक कृषी विभागातील सेवा निवृत्त अधिकारी आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com