‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री व्यवस्थाही 

झरी (ता. लोहा) शिवारातील मारुतीराव गिरे यांचा ब्राॅयलर पोल्ट्री व्यवसाय.
झरी (ता. लोहा) शिवारातील मारुतीराव गिरे यांचा ब्राॅयलर पोल्ट्री व्यवसाय.

नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव गिरे यांनी एक हजार पक्ष्यांपासून ब्रॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला खरा, पण व्यापाऱ्यांकडून हवा तसा दर मिळेना. पण त्यांनी हिमतीने स्वतःचेच विक्री केंद्र उभारण्याचे ठरविले. त्यासाठी काही सहकाऱ्यांना भागीदारीसाठी सोबतही घेतले. आज सहा हजार ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करताना स्वकेंद्राद्वारे दिवसाला ५०० किलोपासून एक ते दोन टनांपर्यंत विक्री करण्यापर्यंत त्यांनी व्यवसायाचा आलेख वाढवला आहे.  नांदेड शहरापासून काही किलोमीटरवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाजवळून झरी गावाकडे (ता. लोहा) फाटा फुटतो. ग्रामस्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणारे गाव म्हणून झरी प्रसिद्ध आहे. येथील मारुतीराव देवराव गिरे यांचे शिक्षण एम.ए.(मराठी)पर्यंत झाले आहे. सन १९९३ मध्ये त्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. सध्या ते नांदेड येथे जमादार म्हणून कार्यरत आहेत.  पोल्ट्री व्यवसायात पदार्पण  झरी शिवारात गिरे यांची १२ एकर जमीन आहे. तेथे कापूस, सोयाबीन आदी पिके ते घेतात. आपली नोकरी सांभाळूनदेखील ते शेती उत्तम प्रकारे करतात. त्याचे कारण म्हणजे शेतीविषयी असलेली आस्था. पत्नी शारदाबाई यांची त्यांना शेतीत समर्थ साथ आहे. केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून चालणार नाही हे अोळखून पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातही  बाजारपेठेचा अभ्यास करून ब्रॉयलर प्रकाराची निवड केली.  व्यवसायाची उभारणी  सन २०१२ मध्ये योजनेंतर्गत गावालगतच्या शेतामध्ये एक हजार कोंबड्यांच्या पिलांचे संगोपन सुरू केले. पोल्ट्री व्यवसायातील प्रसिद्ध कंपनीकडून हैदराबाद येथून पक्षी मागविले. सुरवातीला मार्केटिंगबाबत काहीच माहिती नव्हती. मात्र बाजारपेठा शोधत, व्यापाऱ्यांशी चर्चा करीत विक्री सुरू होती.  स्वतःचीच उभारली विक्री व्यवस्था  साधारण ४२ ते ४५ दिवसांमध्ये पूर्ण वाढ झालेल्या पक्षाचे वजन सुमारे दोन ते अडीच किलोपर्यंत वाढले की त्यांची विक्री केली जाते. नांदेड शहरातील व्यापारी दर पाडून मागत असल्याने नुकसान सहन करावे लागत असे. परिसरातील गावातील पोल्ट्री उत्पादकांचीही अशीच परिस्थिती होती. अखेर स्वतःचेच विक्री केंद्र उभारून आपणच बाजारपेठेत खंबीरपणे उभे राहावे, असे गिरे यांनी ठरवले. त्यानुसार शेजारील गावातील तीन ते चार पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र केले.  त्यांना विक्री केंद्राची कल्पना समजावून दिली. भागीदारीत विक्रीची जबाबदारी घ्यायचे ठरवले.  मध्यवर्ती विक्री केंद्र ठरले फायदेशीर  गिरे यांनी आपल्या कल्पनेतील कोंबडी विक्री केंद्र नांदेडच्या मध्यवर्ती भागात भाडेतत्त्वावर घेतले आहे. तेथे व्यवस्थापकासह सुमारे तीन-चार जणांचा स्टाफ आहे. बाजारपेठेत दर दररोज बदलतात. मात्र ७० ते ८० रुपये प्रति किलोप्रमाणे पक्षांची विक्री केली जाते. दररोज सुमार ५०० किलोपासून ते एक, दोन टनांप्रमाणे खप होत असल्याचे गिरे यांनी सांगितले. हक्काच्या विक्री केंद्रांमुळे बाजारातील व्यापाऱ्यांच्या तुलनेने प्रति किलो १० रुपये तर प्रति पक्षामागे सुमारे २५ रुपये फायदा होतो. केंद्रांपर्यंत पक्षी पोचविण्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था उभारली आहे.  सुरवातीची गुंतवणूक  शेडची जागा स्वमालकीची आहे. मात्र स्ट्रक्चर, पिले आदी सुरवातीची गुंतवणूक अडीच लाख रुपयांपर्यंत करावी लागली. विक्रीचे केंद्र भाडेतत्त्वावर असले तरी दररोज खप जास्त असल्याने चांगली रक्कम हाती येते, असे गिरे यांनी सांगितले.  टप्प्याटप्प्याने घेतात उत्पादन  साधारण दोन बॅचेसमध्ये वीस दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळे वर्षभर पक्षी उपलब्ध करण्याचे नियोजन केले जाते. टप्प्याटप्प्याने गटातील शेतकऱ्यांचे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध होतात. श्रावणात काही प्रमाणात मंदीचा काळ वगळल्यास वर्षभर मागणी असते. त्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळत आहे.  गिरे यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • सध्या ६००० पक्ष्यांचे संगोपन 
  • १०० बाय २५ फूट व ११० बाय ३१ आकाराचे दोन शेडस 
  • अजून दोन हजार पक्ष्यांचे संगोपन सुरू करणार 
  • ब्रॅायलर जातीची पिले कंपनीकडून थेट शेडपर्यंत पोच केली जातात. 
  • मुख्य खाद्य म्हणून मक्याचा वापर. गावालगतच्या पक्षी निवाऱ्यात मक्यापासून खाद्यनिर्मितीसाठी छोटी गिरणी. येथे मका भरडून घेतला जातो. 
  • एक हजार पक्ष्यांच्या वाढीसाठी ४५ दिवसांमध्ये ३० क्विंटल मक्याची गरज 
  • पाण्यासाठी शेडजवळ बोअर. त्यालगत सिमेंटचा भूमिगत हौद. त्यात साठवण केल्यामुळे पाणी थंड राहाते. 
  • लोखंडी खांबांवर विशिष्ट उंचीवर प्लॅस्टिकची टाकी. त्यातून काढण्यात आलेल्या पाइपद्वारे 
  • पाण्याची व्यवस्था 
  • पशुवैद्यकाकडून पक्ष्यांची वेळोवेळी तपासणी व प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम. अन्य औषधोपचार 
  • पत्नी शारदाबाई यांची मोठी मदत मिळते. वैजनाथ आणि पंढरीनाथ ही मुले शिक्षण घेत आहेत. सुटीच्या काळात त्यांचीही मदत होते. 
  • शेतात वास्तव्याची व्यवस्था 
  • कोंबडीखतामुळे उत्पादकतेला हातभार   गिरे यांचे या व्यवसायातून उत्पन्न तर वाढलेच, शिवाय दुसरा मोठा झालेला फायदा म्हणजे कोंबड्यांची विष्ठा खत म्हणून वापरली जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळत आहे. रासायनिक खतांचा वापर त्यातून कमी किंवा बंद झाला आहे. कापूस, सोयाबीन तसेच अन्य पिकांच्या एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. कोंबडीखत स्वतःच्याच शेतीत वापरले जाते. अद्याप विक्रीचा विचार नसल्याचे गिरे म्हणाले.    संपर्क- मारुतीराव गिरे- ९८२३२२०९०७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com