उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांना

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरांना स्वच्छ, थंड पाणी देणे अावश्‍यक अाहे.
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरांना स्वच्छ, थंड पाणी देणे अावश्‍यक अाहे.

अचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. वाढत्या तापमानामुळे जनावरांचे व्यवस्थापन योग्यरितीने करण्यासाठी रितसर नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी हवामान बदलावर लक्ष ठेऊन दिवसाच्या उच्च तापमानापासून जनावरांना वाचविण्यासाठी चांगला निवारा व मुबलक पाणी यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. भारतीय उपखंडातील ऑक्टोबर महिन्यातील हवामानास ‘ऑक्टोबर हिट’ असे संबोधले जाते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांच्या दरम्यान सूर्य दक्षिणायनात असताना उत्तरेकडील कमी दाबचा पट्टा कमकुवत होत जाऊन त्याची जागा हळूहळू उच्च दाबाने घेतली जाते याच दरम्यान नैर्ऋत्य मोसमी वारे कमकुवत होत जाऊन हळूहळू मागे हटतात. ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीस मान्सून उत्तरेकडील मैदानातून मागे हटतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा उष्ण पावसाळा आणि कोरडा हिवाळा यांतील संक्रमण काळ असतो. मान्सून परतल्यानंतर आकाश निरभ्र होऊन तापमानात वाढ होते, या काळात दिवसाचे तापमान अधिक आणि रात्रीचे तापमान कमी व आल्हाददायक असते तसेच जमीन अजूनही ओलसर असते व दिवसा हवामान त्रासदायक होत जाते, यालाच ‘ऑक्टोबर हिट’ असे म्हणतात.

उष्ण हवामानात जनावरांचे व्यवस्थापन उच्च तापमानामुळे सर्व प्रकारच्या (उदा. गाय, म्हैस इ.) जनावरांवर ताण येतो, त्यामुळे मिळणारे उत्पादन कमी होते. या काळात जनावरांची खालील गोष्टींबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

खाद्य

  • जनावरांना चारा शक्यतो सकाळी व सायंकाळीच द्यावा. हिरव्या चाऱ्यामध्ये मका, लसूण घास, कडवळ यांसारखा पोषक चारा द्यावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
  • आहारात क्षार मिश्रणाचा वापर करावा, म्हणजे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.
  • पाणी

  • स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.
  • पाण्याची भांडी आकाराने मोठी व अशा ठिकाणी ठेवलेली असावीत ज्याठिकाणी सर्व जनावरांना सहजरीत्या पाणी पिता येईल. जर गायी व म्हशी मुक्तपणे संचार करत असतील तर (मुक्त गोठा) पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत.
  • गोठा

  • छोट्या, वयस्कर अाणि आजारी जनावरांना सुयोग्य निवाऱ्याची अधिक गरज असते.
  • जनावरांना सकाळी व सायंकाळी चरण्यासाठी न्यावे, दुपारची चराई टाळावी. या काळात जनावरांना सावलीत बांधावे.
  • गोठ्याचे छप्पर गवत, पालापाचोळा यांनी झाकून त्यावर पाण्याचा फवारा मारावा. त्यामुळे छप्पर थंड राहून उन्हाची झळ कमी होते, शक्य झाल्यास गोठ्यात पंखे, फाॅगर्स बसवून घ्यावेत.
  • गोठ्यात सभोवताली हिरवी झाडे असल्यास गोठ्यातील वातावरण थंड राहण्यास मदत होते, नसल्यास दुपारच्या वेळी वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. यामुळे गोठ्यात थंड वारा येतो व वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते.
  • जनावरांची हाताळणी

  • संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, उष्ण वातावरणात जनावरांची जास्त हालचाल झाल्यास त्यांच्या शरीराचे तापमान साधारणपेक्षा ०.५ ते ३.५ अंश सेल्सिअसने वाढते.
  • शरीराच्या वाढलेल्या तापमानामुळे जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते (उदा. एच. एफ. व जर्सी गाय) तसेच त्यांच्या नियमित शरीरक्रियांवर परिणाम होतो.
  • जनावरांची हालचाल करवयाची झाल्यास ती तापमान कमी असताना करावी जेणेकरून वाढत्या तापमानाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही (उदा. सकाळी एक तास लवकर व संध्याकाळी एक तास उशिरा दूध काढल्यास दुग्धोत्पादनात वाढ होऊ शकते).
  • जनावरांमधील उष्णतेचा ताण कसा ओळखवा

  • जीभ बाहेर काढून तोंडाने श्वास घेणे
  • श्वसनाचा दर वाढणे.
  • पाणी पिण्याचे प्रमाण वाढणे.
  • भूक मंदावणे
  • उदासिनता
  • तोंडातून जास्त प्रमाणात लाळ गळणे
  • उष्णतेचा ताण सहन न झाल्यास बेशुद्ध होणे.
  • उष्णतेच्या ताणाला बळी पडण्याचे प्रमाण विविध जातींमध्ये वेगवेगळे असते. जास्त दूध देणाऱ्या गायींवर उष्णतेचा परिणाम कमी दूध देणाऱ्या गायींपेक्षा तुलनेने जास्त होतो.
  • भाकड गायींपेक्षा दूध देणाऱ्या गायींवर उष्णतेचा परिणाम जास्त होतो कारण दूध देणाऱ्या गायींमध्ये चयापचय क्रियेदरम्यान अधिकची उष्णता शरीरात तयार होते.
  • उष्णता सहन करण्याची क्षमता जर्सी गायींपेक्षा होल्स्टेन गायींमध्ये कमी असते.
  • वजन जास्त असणाऱ्या गायी (४५० किलोपेक्षा जास्त) तुलनेने वजन कमी असलेल्या गायींपेक्षा उष्णतेला जास्त बळी पडतात.
  • नुकत्याच लोकर काढलेल्या मेंढ्या उष्णतेला जास्त प्रमाणात बळी पडतात.
  • संपर्क ः डॉ. मीनल पऱ्हाड, ९०११२३१२२९ (कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com