जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा वापर टाळा

चाऱ्याची गुणवत्ता तपासूनच जनावरांना चारा द्यावा.
चाऱ्याची गुणवत्ता तपासूनच जनावरांना चारा द्यावा.

अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक जाऊ शकतात यापैकी प्रामुख्याने बुरशीयुक्त आहार हा महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेस सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी बुरशी किंवा अफ्लाटाॅक्सीन युक्त चारा अनावधानाने जनावरांना खायला दिला जातो. त्यामुळे जनावराचे आरोग्य धोक्यात येते. आहार देत असताना त्यामध्ये जनावरांना अपायकारक असा कोणताही घटक जात नाही याची काळजी घेणे अावश्‍यक असते.   अफ्लाटाॅक्सीन

  • अफ्लाटाॅक्सीन हा विषारी बुरशीजन्य घटक असून त्यामुळे जनावरांच्या अारोग्यावर अतिशय हानिकारक परिणाम होऊ शकतात.
  • अफ्लाटाॅक्सीनचे (१४ किंवा त्यापेक्षा जास्त) अनेक प्रकार आढळतात, त्यापैकी अफ्लाटाॅक्सीन बी १, बी २, जी १ आणि जी २ हे चार प्रकार जास्त धोकादायक अाहेत.
  • पशुखाद्याची अयोग्य पद्धतीने म्हणजे उबदार अाणि अोलसर ठिकाणी साठवणूक केल्यामुळे बुरशीची वाढ होते. जनावरांचा चारा किंवा पशुखाद्यामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असेल तसेच जास्त तापमानामुळे ही खाद्यामध्ये जास्त प्रमाणात बुरशी निर्माण होते. यामध्ये बऱ्याच प्रकारच्या बुरशीचा समावेश असतो परंतु अॅस्परजीलस फ्लेवस व अॅस्परजीलस पेरासीटीकस या जातीच्या बुरशी जास्त प्रमाणात मायकोटोक्सीन नावाचा विषारी पदार्थ तयार करतात.
  • दुष्काळी भाग, चाऱ्याची योग्य प्रकारे साठवणूक न केल्यामुळे तसेच अधिक उष्णप्रदेशामध्ये बुरशीची जास्त प्रमाणात वाढ होऊ शकते.
  • मायकोटाॅक्सीन मुळे मायकोटाॅक्सीकोसिस नावाचा आजार होतो. मायकोटाॅक्सीन एक प्रकार म्हणजे अफ्लाटाॅक्सीन होय.
  • याव्यतिरिक्त, अफ्लाटाॅक्सीन एम १(एएफम १) हा, अफ्लाटाॅक्सीन बी १ (एएफबी १) पदार्थाच्या चयापचय पदार्थापासून तयार होतो, आधिक अफ्लाटाॅक्सीनचा संसर्ग झालेल्या भागात ते दुधामध्येही आढळून येते. त्यानंतर मनुष्य ही त्याच्या संसर्गात येऊ शकतो, जसे की दूध आणि दुग्धजन्य पदार्थांद्वारे, दूध उत्पादनांसह, विशेषत: अशा ठिकाणी जेथे जनावरांना सर्वात कमी गुणवत्तेचे खाद्य दिले जाते.
  • खाद्यामध्ये बुरशी कशी तयार होते? पेंड

  • जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड, सरकी पेंड, अशा विविध प्रकारच्या पेंडी वापरल्या जातात.
  • पेंड तयार करत असताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालामध्ये बुरशी असेल तर पेंडीमध्येही बुरशी तयार होते.
  • कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याने त्याचे पेंडीत रूपांतर झाल्यावर सामान्यपणे बुरशी दिसत नाही. परंतु असे नमुने प्रयोग शाळेत तपासले तर त्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीपासून तयार होणारे हे विषारी पदार्थ जास्त प्रमाणात असू शकतात.
  • भरडा पशुखाद्याबरोबर जनावरांना भुसा किंवा भरडा दिला जातो. धान्य चांगल्याप्रकारे वाळवलेले नसेल किंवा धान्यमध्ये १२ ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असल्यास अशा धान्यामध्ये बुरशीची वाढ होते काही दिवसाने हा भाग काळासर पडतो. या काळ्या भागामध्ये बुरशीची वाढ जास्त प्रमाणात असते, अशा प्रकारचे धान्य जनावरांना भरडून दिले जाते.

    ओला चारा ३ ते ४ दिवसाचा हिरवा चारा साठवून ठेवला असेल तर अशा चाऱ्याच्या आतील भागातील तापमानात वाढ झाल्याने काही काळाने त्यात बुरशी तयार होते.

    सुका चारा सुका चारा पावसाळ्यात झाकून ठेवला जातो. परंतु चारा पूर्णपणे झाकून ठेवला गेला नाही तर भिजतो व अशा चाऱ्यामध्ये नंतर बुरशी तयार होते. अफ्लाटाॅक्सीन नावाचा विषारी पदार्थ बुरशीची वाढ झाल्यामुळे तयार होतो त्यामुळे चारा काळा पडतो. काहीवेळा चाऱ्याचा काळपट भाग वेगळा करून चांगला भागच जनावरांना खायला दिला जातो. परंतु काळपट भाग काढून टाकला तरी चाऱ्याच्या आतील बाजूस सुद्धा बुरशीची वाढ झालेली असते व ती बाहेरून दिसत नाही.

    संपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३, (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com