लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळख

पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध ‘हिंजवडी आयटी पार्क’लगत चांदे गाव आहे. येथील विविध कंपन्या व अन्य व्यावसायिकांची बागेसाठी ‘लॉन’ची असलेली गरज व व्यावसायिक संधी येथील शेतकऱ्यांनी ओळखली. आज गावातील ७० ते ८० हून अधिक शेतकरी लॉनसाठीच्या गवताची शेती करीत असून, त्यातून काही कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत गावाने मजल मारली आहे.
चांदे गावात लॉनसाठीच्या गवताची शेती
चांदे गावात लॉनसाठीच्या गवताची शेती

पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध ‘हिंजवडी आयटी पार्क’लगत चांदे गाव आहे. येथील विविध कंपन्या व अन्य व्यावसायिकांची बागेसाठी ‘लॉन’ची असलेली गरज व व्यावसायिक संधी येथील शेतकऱ्यांनी ओळखली. आज गावातील ७० ते ८० हून अधिक शेतकरी लॉनसाठीच्या गवताची शेती करीत असून, त्यातून काही कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत गावाने मजल मारली आहे.   मुळशी (जि. पुणे) तालुक्‍यातील चांदे गावची सुमारे १३०० लोकसंख्या आहे. पूर्वी गाव भात, ऊस पिकांसाठी ओळखले जायचे. येथील तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पिंपरी, चिंचवड, पुण्यात जाऊन नोकरी, व्यवसाय करायचे. गावातील प्रमोद मनोहर मांडेकर या तरुण शेतकऱ्याने मात्र गावाला पीकबदल व व्यवसायाचा नवा पर्याय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याबाबत पार्श्‍वभूमी सांगायची, तर हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्राचा विस्तार झाला. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला. कंपन्यांना आवारक्षेत्रात बाग व सजावटीसाठी ‘लॉन’ची गरज भासू लागली. त्या वेळी अनेक कंपन्या बाहेरून लॉन करून मागवायच्या. ही गरज हिंजवडी जवळील चांदे गावातील शेतकऱ्यांनी ओळखली. मांडेकर यांनी दीड एकरांत १५ वर्षांपूर्वी लॉनसाठीच्या गवताची लागवड केली. त्यांचा अनुभव व कंपन्यांची मागणी पाहून गावातील अन्य शेतकरी त्या शेतीत उतरले. अनेकांनी जम बसवत विविध नर्सरी तयार केल्या. आधुनिक माध्यमाचा वापर गावातील युवकांनी ‘वेबसाइट्‌स’ तयार केल्या. त्यावर लॉनविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होऊ लागली. बागबगीचा कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, ‘लॅन्डस्केपर्स’ आदींशी ते संपर्क साधू लागले. पुणे शहर, उपनगरे यांसह मुंबई, गोवा, गुजरात या राज्यांतील शहरातींल ग्राहकांशी नेटवर्क होऊ लागले. सध्या कोकण, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, सातारा, कोल्हापूर, बंगळूरपर्यंत चांदे गावातील शेतकऱ्यांना ग्राहक उपलब्ध झाले. त्यांना तत्पर सेवा देण्यात येते. सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी शाळा, समाज मंदिर, हॉस्पिटल अशा सार्वजनिक ठिकाणीदेखील लॉन तयार केले जाते. लॉनच्या शेतीविषयी सोळा फूट रुंदीचे आणि शेताच्या आकारानुसार लांबीचे वाफे तयार केले जातात. त्यात प्रत्येकी चार इंचाच्या अंतराने लॉनसाठीच्या गवताची रोपे लावली जातात. सुमारे पंधरा दिवसांनी रोपे फुटायला लागल्यानंतर सिमेंटचा पाइप किवा रोलर फिरवला जाते. त्यामुळे रोपांची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यानंतर सुमारे वीस दिवसानी यंत्राद्वारे रोपे एका समान पातळीवर आणली जातात. रोपांना अधूनमधून खतांची मात्रा व दर आठ दिवसांनी पाणी दिले जाते. दर सहा महिन्यांनी गवताची कापणी होते. एकदा लागवड केल्यानंतर दर सहा महिन्यांनी काही वर्षे कापणी करीत राहायचे. यंत्राद्वारे कापणी केली जाते. पुढे ठरावीक आकारात मातीसहित रोपांचे पॅडस व रोल तयार केले जातात. तैवान, सिलेक्शन नंबर वन, बर्म्युडा, अमेरिकन ब्ल्यू आदी विविध प्रकारच्या गवतांची लागवड करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात लॉनला मोठी मागणी असते. आश्‍वासक उलाढाल प्रति चौरस फूट ७ ते ९ रुपये लॉनपॅडचा दर असतो. नियोजित ठिकाणी लॉन तयार केल्यानंतर तेथेही त्याची व्यवस्थित देखभाल करावी लागते. व्यवसायाच्या माध्यमातून प्रति एकरी दोन, अडीच ते पावणेतीन लाख रुपर्याचे निव्वळ उत्पन्न मिळते. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन व विक्रीचा ‘व्हॉल्यूम’ असतो. गावात सुमारे ७० ते ८० हून अधिक शेतकरी या व्यवसायात गुंतले आहेत. त्यांचा गट तयार झाला आहे. गावातील सर्वांचे मिळून क्षेत्र २०० ते २५० एकरांच्या आसपास असावे. वर्षाला काही कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत आहे.   प्रतिक्रिया गेल्या १४ वर्षांपासून लॉन शेती करत आहे. त्यातून गावातील शेतकऱ्यांना उत्पन्न व इतरांना रोजगार मिळाला आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा वाहतूक व्यवस्था व्यवस्थित असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना लॉनची विक्री सुरू ठेवणे शक्य झाले आहे. -सागर रोहिदास मांडेकर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी सुरू केलेल्या लॉन शेतीचा आता गावात मोठा प्रसार झाला आहे. सुरुवातीला व्यवसाय वाढल्यामुळे स्वतःकडील तीतील क्षेत्र कमी पडू लागले. गावातील अन्य शेतकऱ्यांना मग व्यवसायासाठी प्रेरित केले. त्यांच्याकडील लॉनच्या विक्री स्वतः केली. शेतकऱ्यांचे मोठे नेटवर्क तयार करण्यात यशस्वी झालो. ‘ग्राहक देवो भव’ या उक्तीप्रमाणे कायम सेवा देण्यासाठी तत्पर राहतो. त्यामुळे या व्यवसायात यशस्वी झालो आहे. -प्रमोद मांडेकर, ९८५०४६९७६६ गावात भात शेतीचे क्षेत्र आता पूर्वीइतके राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी लॉन शेतीतून आर्थिक प्रगती केली आहे. अनेक शेतकरी विविध ठिकाणी विक्री करतात. त्यांनी एकत्र येऊन गटशेती केल्यास आणखी बळ मिळेल. -अशोक ओव्हाळ सरपंच, चांदे ९६०४८२६२५१   चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी लॉनशेतीकडे बघतात. या गवतावर किडी-रोगांची समस्या तेवढी नाही. लॉनशेतीबरोबर बांधावर फळबाग लागवड झाल्यास शेतकऱ्यांचा अजून फायदा होऊ शकतो. -दादाराम मांडेकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com